Wednesday, December 18, 2013

मयत.

                            मयत.
      रात्रीचे अकरा वाजलेले.पोटात चार घास ढकलून हळू हळू नेहमी च्या ठिकाणी टोळक जमू लागल. चौकडीचा तसा रिवाजच होता.दिवसभर पोटासाठी वणवण करून घराकडे निघता निघता रस्त्यातल्या देशी बारमध्ये दोन ग्लास ढकलायचे,घरी जाऊन घरच्यांची वटवट ऐकायची.सगळ सहनशक्ती च्या पलिकड गेल की हळूच नाक्याकडे निघायचं. वस्तीपासून थोड बाजूला रस्त्याच्या कडेच्या बस स्टाप च्या बाकड्यावर हा चौकडीचा अड्डा दररोज जमायचा! जीवाभावाचे चार दोस्त तिथे भेटायचे.एकमेकाची थोडी टिंगल टवाळी करायची.गप्पा झोडायच्या.दिवसभरातल्या गमती जमती सांगितल्या जायच्या.डोक्यातली अक्काबाई उतरत आली की जांभया देत घराकड निघायचं.सगळ जग झोपल की घरी येऊन पडवीत झोपायचं.पक्याचा हा दररोजचा दिनक्रम होता.दिवसभरात कमाई जरा बरी झाली असली तर या टोळक्याची थोडी जास्तीची ऐश व्हायची. आजचा दिवसही तसाच होता. पक्याबरोबरच शिरपा,दिलपा व यशवंता यांची ही चौकडी आजूबाजूला प्रसिध्द होती.त्याच कारणही तसचं होत, परिस्थितीने फाटके असले तरी त्यांच्यातली  माणुसकी जिवंत होती.कुणालाही अडचणीच्या प्रसंगी ही चौकडी मदतीला धावत असे. आजचा दिवसही तसाच होता! सगळ्यांनी आज बऱ्यापैकी डोक्यात  टाकलेली होती.एक एक जण अड्ड्यावर जमा झाला. हसण्या खिदळण्याला बहार आला होता. तेव्हढ्यात पलीकडील मैदानातून रडण्याचा आवाज आला. चौकडीच्या तोपर्यंत मैदानातल्या नवीन पडलेल्या पालाकडे लक्षच गेल नव्हत! पालाच्या बाजूनेच रडण्याचा आवाज येत होता. अंधार होता त्यामुळे शंभरेक मिटरवर असलेल्या या पालाकड गेल्याशिवाय कोण रडतय हे कळण्यास मार्ग नव्हता. चौकडीतल्या शिरपा ने सर्वाना पालाकडे चालायची सुचना केली.तसा तो या चौकडी चा लीडर होता.
  पालाच्या जवळ गेल्यावर दिसले की एक माणूस तिरडीवर ठेवलेल्या प्रेताकडे पाहून रडत होता.बाजूला एक बाई डोक्यावर पदर घेऊन दोन पायावर मुसमुसत बसली होती. प्रेत तिरडीवर बांधलेल्या स्थितीत होते.सफेद कापडात गुंडाळलेले  प्रेत,प्रेताच्या कपाळावर कुंकू फासलेल,प्रेताच्या तोडात कसला तरी बोळा.
पांढरे कापड अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत घट्ट बांधलेलं.आजूबाजूला अंधार.दूरच्या रस्त्यावरचा दिवा व मडक्यात भरण्यासाठी पेटवलेल्या धुर टाकणार्या गोवऱ्या यांचाच काहीसा उजेड! अगदी भयानक देखावा होता तो!
“काय झाल व पावन ?”
शिरपाने बाजूला बसलेल्या माणसाला विचारले. माणसाला हुंदका फुटला.
“शेट बघा ना माझ्या म्हातारीन दुपारी प्राण सोडला.आता मसणवटीत न्यायचं पण मी एकटा कसा नेऊ? आजच इथ पाल टाकल अन हे घडल! तुम्ही देवासारख आला बघा. आता तुम्हीच मदत करा. मी तिरडी बांधलीया.नदीकाठी सरपाण पण रचून आलोय पण खांदा द्यायलाच कुणी नाही.तुम्ही  फकस्त खांदे द्या म्हणजे म्हातारीच क्रियाकर्म तरी व्हइल नाय तर काय करू मी?लय उपकार होतील बघा.”
शिरपा ला परिस्थिती च भान आल.
आता चौकडी मधले समाजसेवक जागे झाले होते!
शिरपाने परिस्थिती चा ताबा घेतला.पक्या दिलपा पुढे व यशवंता व स्वत: मागे असे खांदे द्यायचे ठरले.माणसाच्या डोक्यावर घोंगड्या ची खोळ करून घातली.त्याला मडक्यात पेटत्या गोवऱ्या टाकून शिकाळे करून दिले व पुढे चालायला सांगितले. बरोबर इत्तर सामानाची पिशवी सुद्धा दिली.
“माग अजाबात बघायचं नाही.” माणसाला शिरपाने बजावले.
  “राम नाम सत्य है.” चा आवाज चौकडीन दिला. तिरडी उचलली व ही प्रेतयात्रा निघाली. मडके घेऊन माणूस पुढे व त्यामागे हे चौघे तिरडी घेऊन निघाले.पुढच्या बाजूला पक्या व दिलपा व मागे बाकी दोघे.
पक्याच लक्ष प्रेताच्या चेहर्याकडे होते. प्रेताचे लालभडक तोंड भयानक दिसत होते.पुढे मडकेवाला माणूस प्रेतयात्रा निघाली. पक्याला अचानक कसला तरी आवाज आला.
“चू चू “
पक्याला वाटलं भास झाला असेल. पुन्हा तसाच आवाज भास नक्कीच नव्हता! तो गपकन थांबला.अचानक थांबल्यामुळे बाकी तिघे परेशान!
दिलपा गुरकला “ये का थाबतो रे?”
पक्या ला घाम फुटलेला.आवाजाच्या दिशेने पक्याने दिलप्याला खुणावले.
“चू चू”
पुन्हा आवाज!
मागे न बघितल्यामुळे मडकेवाला माणूस बराच पुढे गेलेला!
पुढचे दोघे का थांबले म्हनून मागचे दोघे चिडलेले अंधारात प्रेत अजूनच भयानक दिसत होते.
पुन्हा आवाज
“चू चू “
आता मात्र पक्या व दिलापाची पूर्ण उतरली होती!
“आयला म्हातारी जिवंत तर नाही?”
दिलपा कुजबुजला.
पक्याची भीती ने गाळण उडालेली.
“आवाज नक्कीच प्रेतातून येतोय”
पक्याची तर खात्रीच झाली होती!
मागचे दोघे हे सारखे थांबतात का म्हणून पुढच्या दोघांना शिव्या देऊ लागले!
आता पक्याला वाटायला लागले कुठून दुर्बुद्धी झाली आणि खांदे द्यायला आलो. म्हातारी जिवंत असली तर काय ? का हा भुताटकीचा प्रकार आहे? त्या मडकेवाल्याला विचारायचे तर मडकेवाला तर बराच पुढे गेलेला.माग बघू नको सांगितल्यामुळे तो पुढे पुढेच चाललेला! पायातले त्राण गेल्यासारखे वाटत होते. मागचे दोघे सारखे करवादत होते.पक्याने विचार केला या दोघांना जर कळाले तर पळूनच जातील. काय करावे कळत नव्हते.हळू हळू पुढे चालणेच योग्य असा विचार करून घाबरत मधेच म्हातारीच्या तोंडाकडे बघत पुढे निघाले.
कसे बसे थांबत थांबत प्रेतयात्रा नदीपर्यंत आली.
तिरडी खाली ठेवल्याबरोबर शिरपाने पक्याचे गचुन्डेच पकडले.
“कशाला थांबत थांबत चालत होता रे ? साल्या काय मस्करी लावली होती?”
शिरपाच्या हाताला पक्याला फुटलेला घाम जाणवला.
“काय झाल रे?”
पक्याने प्रेताकडे बोट दाखवले.
“अरे म्हातारी जिवंत आहे बहुतेक.आवाज येतोय कसला तरी!”
आता चौघांनीही अंदाज घेतला
“चू चू चू चू “
आता मात्र चौकडीची घाबरगुंडी उडाली.
दुसऱ्या बाजूला असलेल्या मडकेवाल्या माणसाला काहीतरी गडबड झाली असल्याचे जाणवले
मडके बाजूला ठेऊन खोळ सावरत तो जवळ आला.
“काय झाल हो भाऊ?”
मडकेवाल्या माणसाने घाबरून विचारले.
“काय रे म्हातारी नक्की मेलीय ना? तिरडीतून आवाज कसा काय येतोय!
“ अरे तो आवाज व्हय?”
मडकेवाला हसायला लागला!
“अरे भाऊ तुम्ही मर्दासारखे मर्द, अन अस घाबराया काय झाल?”
हसत हसत त्याने प्रेताच्या डोक्या जवळचे कापड बाजूला केले!
चूSS चू S करत एक कोंबडीच पिल्लू बाहेर आले व पळायला लागले.
“अवो  भाऊ आमच्या जमातीत माणूस मेला की त्याच्या तिरडीमध्ये कोंबडीच पिल्लू बांधायची रीत आहे. अस केल्याने माणूस स्वर्गात जातो अस म्हणतात. कशापायी एवढ घाबरायचं म्हणतो मी ?”
“चला आता प्रेताला अग्नी देऊ!!!!!!”
चौकडी चे चेहरे पहाण्यासारखे झाले होते!
                                  ................प्रल्हाद दुधाळ.

   

No comments:

Post a Comment