Friday, January 31, 2020

स्वेच्छा सेवानिवृत्ती. एक संदेश

भारत संचार निगम लिमिटेड या माझ्या कंपनीतून आज 31 जानेवारी 2020 रोजी हजारो कर्मचारी व अधिकारी स्वेच्छानिवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी एक संदेश
.....प्रल्हाद दुधाळ पुणे.

नमस्कार मित्र मंडळी,
   आज आपल्या जीवनातल्या एका अत्यंत  महत्वपूर्ण अशा टप्प्यावर उभ्या असलेल्या सर्व  सहकर्मचारी व अधिकारी बंधू भगिनींना स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या मुक्त आनंदी पर्वासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
   मित्रहो उद्यापासून इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या दिनक्रमात बदल होणार आहे,आता ना सकाळची पळापळ, ना ऑफिसचे टेन्शन!खरं तर या पळापळीची ऑफिसमधल्या टार्गेट्स आणि इत्तर रुटीनची आपल्याला सवय जडली आहे.आपल्याला झोकून देऊन काम करायची सवय लागलेली आहे!
  कदाचित  इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या या दिनक्रमात अचानक असा बदल करावा लागेल अशी स्वप्नातही आपण कल्पना केली नसेल;पण उद्यापासून आपल्याला नोकरीसाठी बाहेर पडायचे नाही हे वास्तव आहे, आणि या वास्तवाचा जेव्हढ्या लवकर आपण स्वीकार करू तेवढे आपल्याला पुढील आयुष्याचे नियोजन करायला सोपे जाणार आहे हे लक्षात घ्या. फार भावनिक नं होता आता गरज आहे ती आपल्या जीवनाकडे तटस्थ्यवृत्तीने बघण्याची!
 "हे असं का घडलं?" "असं केलं असतं तर तसं झालं असतं", "अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी यांव केलं असतं आणि त्यांव केलं असतं!" असला विचारांचा किंवा चर्चेचा काथ्याकूट करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा 'आता आपण सध्याच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आहे आणि पुढील आनंदी आयुष्याचे तातडीने नियोजन करायचे आहे'  हे सत्य स्वीकारणे आपल्या मानसिक आणि पर्यायाने शाररिक आरोग्यासाठी हिताचे आहे याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधावी असं मला वाटतं.
    मिळणाऱ्या पैशाच्या गुणवणूकीच्या सुनियोजनाबरोबरच उद्यापासून हाताशी असलेल्या मुबलक मोकळ्या वेळेचे नियोजन करणेही अत्यावश्यक आहे!
     ज्यांच्याकडे वय आणि ऊर्जा आहे त्यांनी नक्कीच नव्या संधींचा धांडोळा घ्यावा;पण "आता बास, खूप वर्षें घासली" अशी मानसिकता असलेल्या मित्रांनी आपण आता नक्की वेळ कसा घालवणार आहोत याचा विचार आत्ताच सुरू करावा! आता आर्थिक सुबत्ता आहे त्यामुळे अर्थार्जन करण्यासाठी काही केले नाही तरी यापुढचा आपला दिनक्रम नक्की काय असेल यावर निदान प्राथमिक विचार तरी करायला हवा.
    आपल्या राहण्याच्या तीन चार किलोमीटर परिसरात आपल्याप्रमाणेच जे लोक निवृत्त झाले आहेत त्यांनी एकत्र येऊन बरेच काही करता येण्यासारखे आहे.
   आता "आपण कोणत्या पदावर काम केले", "कोणती अधिकारपदे भूषविली", "आपल्याला किती मान होता", "माझा किती रुबाब होता" या सगळ्या गोष्टीना फारसे महत्व नाही, तर "आपण आपल्या नोकरीतून सन्मानाने निवृत्ती घेतली आहे" आणि आता आपण एक "निवृत्त सरकारी कर्मचारी" आहोत हे एकदा का स्वीकारले की समाजात मिसळणे सहजसोप्पे होणार आहे हे लक्षात घ्या!
   यापुढे आपण आत्तापर्यंतच्या आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे  ज्या ज्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकलो नव्हतो त्या गोष्टींसाठी आता आवर्जून वेळ द्या. आपल्या छंदांसाठी वेळ द्या. बागकाम करुन बघा. भटकंती करा. स्वयंपाक करुन बघा.आपल्याशी ज्यांची वेव्हलेन्थ जुळते अशा मित्रमंडळीत जा, गप्पा मारा.
Connecting India  अशी टॅगलाईन असलेल्या कंपनीत आपण आजपर्यंत काम करत होतो त्यामुळे अनेक लोकांशी आपण जोडलेले आहोत आणि हे जोडलेले स्नेहबंध अजून घट्ट कसे होतील ते पहा.
लोकांना भेटत रहा मनातलं बोलत रहा....
जोडलेली नाती आणि जोडलेली मने, स्नेहबंध तसेच यापुढेही जोपासत रहा.एकमेकांचा आधार व्हा.आधार द्या, आधार घ्या....
   अर्थात, यापुढे जे जे करावेसे वाटते (व्यसने सोडून) ते ते करावे. शाररिक व्यायामाइतकाच महत्वाचा असा बौद्धिक व्यायामही  सातत्याने करा.
   अवेळी आलेली स्वेच्छानिवृत्ती ही आपत्ती न समजता नियतीने आपल्याला आनंदात जगण्यासाठी दिलेली संधी आहे हे लक्षात घ्या आणि या संधीचे सोने करुन आपले आयुष्य अधिक सुंदर करायचा ठाम संकल्प करूनच आज ऑफिसातून बाहेर पडा.
बाहेरचे मुक्त सुंदर जग आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
 स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
   ..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment