Sunday, March 18, 2018

स्मरण आईचे.

स्मरण आईचे.
१८ मार्च १९९४चा तो दिवस! माझी आई आजारी असल्यामुळे मी ऑफिसातून रजा घेऊन गावाकडेच मुक्कामी होतो.सहाच दिवसापूर्वी म्हणजे १२ तारखेला कॅंटोन्मेट टेलिफोन केंद्राचे फॅटेक्स इलेक्ट्रॉनिक केंद्रात परिवर्तन करण्यात आले होते. त्या केंद्राच्या बाह्य विभागातल्या तांत्रिक बाबींची जबाबदारी माझ्यावर असल्याने वरिष्ठांनी रजा देतानाच हे बजावले होते की गरज लागली तर लगेच कामावर यावे लागेल.
     त्या दिवशी सकाळीच गावाकडच्या एकमेव लॅंडलाईनवर साहेबांनी फोन केला व कामावर यायची विनंती केली. तशी आईची तब्बेत आज थोडी बरी होती त्यामुळे मी तिला पुण्याला जाऊ का विचारले." जा तू , आता मला बरं आहे.माझी काळजी करू नको " तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला. मी स्कूटरला किक मारली व पुणे गाठले. ऑफिसमधे खरचं माझी गरज होती. मी कामाला सुरूवात केली. पाच वाजेपर्यंत डोके वर काढायला वेळ झाला नाही. पाच वाजता टेबलावरचा फोन वाजला,फोनवर चुलत भाऊ होता. त्याने आई गेल्याचा निरोप दिला आणि माझ्या हातापायातले बळच गेले.कसबस स्वत:ला सावरलं आणि गाडी करून गाव गाठलं.
आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जी माऊली हसमुखाने राब राब राबली, हाळीपाटी करून भाज्या विकल्या, लोकांच्या कुरड्या शेवया केल्या,गोधड्या शिवल्या, सुईण होऊन बाळंतपणे केली, अडल्या नडल्याना मदतीसाठी खंबीरपणे उभी राहीली, स्वत: शाळेचे तोंड पाहिले नव्हते पण आम्हा भावंडांनी शिकावे म्हणून आग्रह धरला त्या माझ्या आईच्या शेवटच्या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी मी गावाला आलो.
      आज मागे वळून मी माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा माझ्या जीवनातल्या काही गोष्टींबद्दल माझे मलाच आश्चर्य वाटते. सामान्यपणे असे म्हटले जाते की माणसाचे घडणे वा बिघडणे हे तो कुणाच्या पोटी जन्माला आला, लहानपणी त्याचे पालनपोषण कोणत्या परिस्थितीत झाले,त्याचे मित्र कसे होते,त्याच्यावर शिक्षणाचे संस्कार करणारे गुरुजन कसे होते,याबरोबरच त्याची स्वत:ची बुध्दिमता आणि ग्रहणशक्ती यावर अवलंबून असते. माझ्या बाबतीत म्हणाल तर वर सांगितलेल्या बाबींपैकी बहुतांश बाबी या माझ्या जडणघडणीमधे प्रतिकूल परिणाम करू शकत होत्या अशा होत्या,तरीही मी जीवनात बिघडण्यापेक्षा घडलो ते माझ्या आईने माझ्यावर नकळत केलेल्या संस्कारांनी! माझी आई किंवा वडील कधी कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. दोघेही अशिक्षित सहीच्या जागी डाव्या हाताचा निशाणी अंगठा उठवणारे होते. माझ्या एकूण सहा भावंडात मी शेंडेफळ होतो.मी हायस्कूल पर्यंत पोहोचेपर्यंत सगळी भावंडे आपल्या मार्गाने गाव सोडून गेलेली होती.माझे पालक अल्पभूधारक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर काबाडकष्ट केल्याशिवाय कुटुंबात दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती.तशात होती नव्हती ती शेतीही सावकाराकडे गहाण पडलेली होती.अशा परिस्थितीत सत्तरच्या त्या दशकात, एका आडगावात राहून स्वत: अशिक्षित असूनही माझ्यासाठी शिक्षणाची स्वप्ने पहाणारे पालक लाभणे म्हणजे माझे थोर भाग्यच की!
    वडील तसे कायम आजारीच असायचे त्यामुळे घराचा सगळा डोलारा माझ्या आईच्या खांद्यावर उभा होता.मी आठवीत असताना वडीलांनी या जगाचा निरोप घेतला त्यानंतर तर तिच्या कष्टाला पारावार उरला नाही.मला आजही आठवते ती माझ्यासाठी सतत राबणारी आई.......
कोंबड आरवायच्या आधीच तिने घेतलेली असायची डोक्यावर माळव्याची पाटी,
चालत रहायची अनवाणी, नसायची अंधाराची अथवा विच्चूकाट्याची भीती
मनात एकच ध्यास  दिवस वर येण्यापूर्वी पाटीतला भाजीपाला खपायलाच हवा...
परत धा वाजता कुणाच्यातरी शेतावर मजुरीसाठी पोचायला हवं...
तिच्या त्या ढोर मेहनतीत  तिने पेरली होती माझ्या उज्वल भविष्याची स्वप्ने...
आज ना उद्या या घामावर  सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल!
जीवनात कधीच दिसली नाही हतबल,सदा धीरोदात्त,कायम हसतमुख...
तिचे ते अहोरात्र राबणे सतत देत होते मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव....
जर बदल हवा असेल तर बेट्या, तुझ्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आज सुखदु:खात कायम स्मरते  माझी सतत राबणारी प्रेरणादायी आई!

     समोर प्रचंड संकटे असताना तिने मला शिकायला स्वत:च्या पायावर उभे रहायला प्रोत्साहन दिले. बऱ्याचदा स्वत: उपाशी राहून कोंड्याचा मांडा करून मला पोटभर खायला दिले.....

ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा.
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!

 माझी आई पहाटे उठून जात्यावर धान्य दळायची. दळताना ती जात्यावर छान छान ओव्या रचून म्हणायची.मी भान हरपून त्या ओव्या ऐकत रहायचो....प्रत्येक ओवीत तिने माझ्या भविष्याचे स्वप्न पेरलेलं असायचं!

अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
लेक चालला साळला संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची मोठ्या पैक्याची नोकरी!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली ती आईने लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्या बोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले की त्याचे चांगले फळ मिळतेच मिळते,
मोठी स्वप्ने बघायची पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते त्यामुळे कधीही कोणतेच व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिची ती शिकवण जशी जमेल तशी आचरणात आणत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी समोर हात जोडून उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा मोह कधीच झाला नाही.कुणी याला माझा वेडेपणा म्हणून मला हिणवले;पण ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता’अशा कोणत्याच गोष्टीचा मला कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली एनर्जी तेथे वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! मी जीवनात यशस्वी आहे की नाही माहित नाही;पण आनंदी नक्कीच आहे आणि याबद्दल मी त्या सर्वशक्तीमान निर्मिकाचा कायमच आभारी आहे.
     आज अठरा मार्च ; माझ्या आईचा चोवीसावा स्मृतीदिन आहे.ती मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली:पण आजही माझ्या जीवनावर माझ्या आईचा प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत प्रगतीच्या दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील.
  माझ्या पूज्य आईला तिच्या चोविसाव्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!!!

     ...... प्रल्हाद दुधाळ .

No comments:

Post a Comment