Tuesday, February 13, 2018

आठवणीतली महाशिवरात्री....

आठवणीतली महाशिवरात्री....
माझ्या लहानपणी गावाकडे महाशिवरात्री जोरात साजरी व्हायची. गावाच्या वायव्येस रूद्रगंगेच्या काठी सिध्देश्वराचं एक पुरातन मंदिर होते.गोळे असे आडनाव असलेल्या ब्राम्हण कुटुंबाकडे या मंदिराचे पौराहित्य होतं.मंदिराभोवती या गोळे यांच्या वहिवाटीत असलेली हिरवीगार शेती होती.त्या काळी या शेतातली डाळींबबाग, मंदिराच्या आवारातली फुलांनी बहरलेली चाफ्याची झाडे. बाजूच्या शेतातील या सिझनला मोहरांनी लगडलेली आंब्याची झाडे, मंदिराभोवतीची जुन्या किंग साईझ भाजक्या विटात व चुन्यात बांधकाम केलेली पक्की भींत, छोटेखानी सुंदर मंदिर, त्यासमोर बसलेला नंदी आणि गाभाऱ्यातली महादेवाची पिंड या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षांनी सुध्दा आठवणींत ताज्या आहेत.
असं म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर होते पुढे पेशवे कालात त्याचा जिर्णोध्दार झाला असावा.
माझ्या लहानपणी या सिध्देश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहाने साजरा व्हायचा.अख्खे गांव शंभो महादेवाच्या दर्शनाला जमायचे. भल्या पहाटे अभिषेक पुजा व्हायची. गावकरी पिंडीवर वाहण्यासाठी बेल, फुले, आंब्याचा मोहोर,फळे, दुध,दही व उपवासाचे पदार्थ आणायचे.एरवी रिकामा असलेला मंदिर परीसर माणसांनी गजबजून जायचा.
गावातल्या लहान थोरांना त्या दिवशी उपवास असायचा.आठवणीतला तो पवित्र महाशिवरात्रीचा सण मी आजही जपला आहे....
आता ते जुने मंदिर इतिहास जमा झाले आहे. शेताच्या मध्यभागी असलेल्या सिद्धेश्वराला बांधावर एक छोटीशी खोली बांधून स्थलांतरित केले आहे.असे का केले गेले या बाबतीत लोकांमधे खूप विविध व विचित्र चर्चा आहेत.कुणी म्हणत गुप्तधनाच्या लोभापायी व त्या धनाच्या शोधासाठी ते जुने मंदिर जमीनदोस्त केले गेले , खर खोट त्या शंभूदेवालाच माहीत! एरवी अगदीच शुकशुकाट असलेल्या या मंदिरात सोमवार महाशिवरात्रीला शिवभक्त आवर्जून भेट देतात."हर हर महादेव" चा गजर अजुनही तेथे होतो; पण काहीतरी हरवलं आहे! आठवणीतली ती पावित्र्याची दरवळ जाणवत नाही.....
" हर ssहर ssमहादेव!"
महाशिवरात्री च्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा ..भोले बाबा सर्व मित्रांच्या मनोकामना पूर्ण करो...जय शिव शंकर ..
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment