Saturday, November 18, 2017

ड्रायव्हर....

ड्रायव्हर....
शिंगटेआण्णा म्हणजे अफलातून माणूस! हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून सरकारी खात्यात चिकटला.
सगळ्याच सरकारी खात्यात मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फारच रूबाब असतो. अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही, त्याची बरीच कारणे असतात! त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला, कुणाकुणाला भेटला हे सगळ फक्त त्याच्या ड्रायव्हरलाच माहीत असते आणि त्यातली काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात! आपली गुपिते ड्रायव्हरने कुणाला सांगू नयेत म्हणून मग साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला खूप जपतात, विश्वासात घेतात! साहेबाची अशी बरीच खाजगी गुपिते ड्रायव्हर स्वत:जवळ बाळगत असल्यामुळे साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला वचकून असतात.
तर आपला हा शिंगटेआण्णाही अशाच एका बड्या अधिकाऱ्याच्या दिमतीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. साहेबाचा जवळचा माणूस म्हणून त्याला अख्ख्या खात्यात सगळे टरकून असायचे.मुळात आण्णा दिसायला एकदम गोरागोमटा होता शिवाय एक्स सर्व्हीसमन असल्याने त्याचे राहणीमान कडक होते.दररोज गुळगुळीत दाढी करून कडक इस्त्रीचा सफारी घातलेल्या आण्णाची छाप समोरच्या माणसावर अशी काही पडायची की कधीकधी साहेबच याचा ड्रायव्हर असावा असे वाटायचे!
एकदा काय झालं, दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून एक व्हीआयपी अधिकारी इन्स्पेक्शनसाठी पुण्याला यायचा होता.या बड्या अधिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करून हॉटेलवर घेवून जायची सूचना साहेबाला मिळाली.ठरलेल्या वेळी शिंगटे आण्णाला घेवून साहेब रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आण्णाने आज नवीन सफारी घातला होता. 
फलाटावर आण्णा पुढे आणि साहेब मागे असे उभे राहिले.साहेबाच्या हातातला त्या बड्या अधिकाऱ्यासाठी बनवलेला स्वागतफलक आपल्या हातात घ्यायला हवा हे आण्णा विसरून गेला. 
गाडी फलाटावर आली. तो बडा अधिकारी फलाटावर उतरला.आल्या आल्या त्याने कडक सफारीतल्या आण्णाशी हस्तांदोलन केले.आपली व्हीआयपी सुटकेस त्या अधिकाऱ्याने आण्णाच्या साहेबाच्या हातात दिली! हे एवढे पटकन झाले की साहेबाला काही बोलायचे सुचलेच नाही.आण्णाने साहेबाच्या हातातली सुटकेस पटकन काढून घेतली आणि स्टेशनबाहेरच्या गाडीत ड्रायव्हरसीटवर जावून बसला!
दोन्ही अधिकारी कानकोंडे होत काही न बोलता गाडीत येवून बसले.
आण्णाने साहेबाच्या तोंडाकडे बघायचे टाळत हॉटेलकडे गाडी पिटाळली. 
दुसऱ्या दिवशी साहेबाने आण्णाला यापुढे दररोज खाकी युनिफॉर्म घालायचा आदेशच काढला!
...... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment