Sunday, May 7, 2017

माझे बदलते आदर्श ..

माझे बदलते आदर्श ..
   लहानपणी थोडफार कळायला लागलं की संस्कारक्षम लहान मूल आजूबाजूच्या माणसांचं अनुकरण करायला लागतं. शेतकऱ्याच मूल शेतात व घरात चालणाऱ्या कामांच निरिक्षण करत रहातं आणि मग अनुकरणाच्या टप्प्यावर ते जे खेळ खेळते त्यात  बैलगाडी, नांगरणी, खुरपणी, गुरांच्या धारा काढणे, गोठ्यातल्या जनावरांना चारा टाकणे वा  पाणी पाजणे अशा शेतकामाशी संबंधीत बाबीवर आधारीत असतात. एखाद्या दुकानदाराच्या पोराने लहानपणापासून दुकानातले वाणसामान खरेदीसाठी  येणारी गिर्हाईक तसेच  मालाच्या बदल्यात मिळणारा पैसा पाहीलेला असतो, मग तो मित्रांशी खेळताना दुकान दुकानच खेळताना दिसतो! एखाद्या नोकरीला जाणाऱ्या पालकाच्या मुलाच्या खेळण्यात त्याने त्याच्या वडीलांची ऑफीसला जाण्याची नक्कल हुबेहूब उतरवलेली आपण बघत असतो.घरात जसे बोलले वागले जाते याचा कळत नकळत परिणाम घरातल्या लहान मुलाच्या जडणघडणीवर होत असतो; किंबहूना त्याला दिसणारी त्याच्या भोवती वावरणारी माणसे  त्या त्या वयात त्याच्यासाठी आदर्शवत असतात.मग एखादा मुलगा आपल्या बापाची नक्कल म्हणून तंबाखू  मळायची  व  तोंडात टाकायची लकब  सहजपणे आत्मसात करतो. या  आदर्श लोकांसारखे बनायचा प्रयत्न मग केला जातो.लहान  मुली स्वयंपाक घरातल्या ॲक्टीविटी बघून भातुकलीचा खेळ  खेळत असतात. मुले जशी जशी मोठी होतात तशी त्यांची समज वाढत जाते आणि अर्थातच त्यांचे आदर्शही बदलत जातात.
 माझे लहानपण खेड्यात गेले शेतात चालणारी कामे पहात पहात मी मोठा झालो.त्या काळी आमच्याकडे पानमळे असायचे.मळ्यात लावणी बांधणी पानांची खुडणी पाणी देणे आणि उतरण अशी विविध कामे चालायची.यातली सगळीच कामे ही कुशल हातांची कामे मानली  जायची त्यातले खुडणीचे काम मला खूप आवडायचे त्यामुळे आपण मोठे झाल्यावर पानमळ्यातले खुडणीचे काम करायचे हे मी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ठरवले होते.पुढे शालेय वयातल्या वाढत्या इयत्तेप्रमाणे हे आदर्श बदलत गेले.सुरुवातीला गावातल्या मारवाड्याच्या दुकानातला माल पाहून शिवाय लोक त्याला पैसे देतात हे बघून आपण दुकानदार व्हायचे असे ठरवले तर पहिला एसटीचा प्रवास केल्यावर आपणही कंडक्टर व्हावे असे वाटायला लागले.गावात एक धुमाळ नावाचे टेलर्सचे  दुकान होते.त्या धुमाळभाऊचे राहणीमान बसायला स्टूल आणि त्याचे ते ऐटीत मशीन चालवणे पाहून आपणही टेलर व्हायचे ठरवून टाकले आणि त्याची पूर्वतयारी म्हणून घराच्या बाहेर पडलेल्या पत्र्याच्या मोटेवर खडूने दुधाळ टेलर्स असे लिहूनही टाकले!अर्थात हा आदर्श पुढे फार काळ टिकला नाही,काही दिवसातच ते आदर्शाचे भूत उतरले.आम्हाला एक विद्यासागर नावाचे शिक्षक आठवीत असताना लाभले.ते इंग्रजी तर जीव लावून शिकवायचेच पण त्यांचा मराठी साहित्याचाही गाढा अभ्यास होता.त्यांची वत्कृत्वशैली एकदम भन्नाट होती.ते एकदा शिकवायला आले की शाळेचे लिखित असलेले वेळापत्रक कोलमडून पडायचे.ते बोलायला लागले की तीन तीन तास अख्या वर्गाला खिळवून ठेवायचे! वर्गातली दंगाखोर मुलेही एकदम शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेत असत! लवकरच मला ते आदर्श म्हणून आवडायला लागले आणि आपण मोठे झाल्यावर सरांसारखा अभ्यासू  शिक्षक म्हणून नाव कमवायचे असे ठरवून टाकले ! शालांत परीक्षा पास झाल्यावर पुढे काय शिकायचे हे निश्चित होत नव्हते.त्या दरम्यान आमच्या शाळेचा एक विद्यार्थी पुढे इंजिनयरिंग चा डिप्लोमा होवून विदेश संचार निगमला नोकरीत रुजू झाला आणि मलाही आपण डिप्लोमा करावासा वाटायला लागले! त्यासाठी अर्ज केला आणि विशेष म्हणजे मला कराड च्या सरकारी संस्थेत प्रवेशाचे पत्रही आले पण पैशाची गणिते जमली नाही आणि शेवटी सायन्सला प्रवेश घेतला.माझ्या आदर्श शिक्षकांच्या बंधूने रसायन शास्रात एम एस्सी केले आणि तो पुणे विद्यापीठात लेक्चरर झाला.आता तो मला आदर्शवत वाटायला लागला आता आपण प्रोफेसर व्हायचं असं ठरलं; पण पुन्हा माशी शिंकली आणि बी एस्सी च्या दुसऱ्या  वर्षात असताना नोकरी पकडली.मधल्या काळात बरेच वाचन केले होते.कथा कादंबऱ्या मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचनात आली आणि आदर्शही बदलत राहिले. कधी आपण कवी व्हावे तर कधी मोठे लेखक व्हावे असे वाटायला लागले. नोकरी करता करता बी एस्सी झालो पण पुढे मात्र शिकता आले नाही.प्रोफेसर व्हायचं राहून गेलं! कुणीतरी खायांतर्गत परीक्षेबाबत सांगितलं आणि पहिलीच परीक्षा पास होवून टेलिफोन इन्स्पेक्टर झालो. पोलीस इन्स्पेक्टर राहू दे निदान नावापुढे इन्स्पेक्टर हे पद लावले गेले यातच समाधान होते! या पदाला समाजात चांगला मान होता. अजून वरच्या पदाच्या परीक्षा देत राहिलो आणि वर्ग दोन अधिकारी झालो.मनातली  आपण इंजिनिअर व्हावे ही सुप्त असलेली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अजून पुढे परीक्षा दिली आणि सबडीव्हीजनल इंजिनिअर हे बिरूद लागले!
   आयुष्यात एका आदर्शवत ध्येय्याचा पाठपुरावा मला आयुष्यात नाही करता आला पण समोर आलेल्या अनेक आदर्शवत लोकांपैकी एकासारखेतरी मी बनू शकलो याचा आनंद आणि अभिमानही आहे. आदर्श जरी वेळोवेळी बदलत गेले तरी त्या त्या आदर्शवत व्यक्तीच्या स्वभावातले चांगले चांगले गुण मात्र मी नक्की उचलले आहेत!
     .......प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment