Saturday, September 5, 2015

शिक्षकदिनाच्या निमित्ताने ......

शिक्षकदिनाच्या निमित्ताने ......
कविवर्य नामदेव ढसाळ आपल्या एका कवितेत म्हणतात ..
“ वह्या पुस्तकाची ओझी वाहिली नसती तर गावची गुरे वळली असती!”
शिकलो नसतो तर माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्याचे काय झाले असते ते सांगणारी ही ओळ आहे.जर शाळेत गेलोच नसतो तर नक्कीच गावची  गुरे वळली असती!
ही गोष्ट १९६५ च्या दरम्यानची आहे त्यावेळी आमच्या गावात “शेती शाळा परिंचे” ही  जिल्हा परिषदेची शाळा होती.शाळेचे तिसरीपर्यंतचे वर्ग शाळेच्या कौलारू इमारतीत व रामाच्या देवळात भरायचे.चौथी ते सातवीचे वर्ग मात्र गावातल्य  दोन मजली भल्यामोठ्या परांजपे वाड्यात भरायचे.विशेष म्हणजे या शाळेची शेतीही होती.
       गावातली कोणती कोणती मुले सहा वर्षाची झाल्यासारखी वाटतात यावर शाळेच्या शिक्षकांचे बारीक लक्ष असायचे.जून महिन्याच्या सुरुवातीला अशा पोरापोरींचा शोध घेऊन त्यांना पहिलीच्या वर्गात घातले जायचे.बहुतेक मुलांची जन्मतारीख शिक्षक स्वत:च ठरवायचे व रेकॉर्डवर लिहिली जायची, साधारणपणे एक जून आणि सहा वर्षापुर्वीचे साल टाकून द्यायचे! अशाच एका मोहिमेत आमचा शाळाप्रवेश झाला! 
       पहिल्या दिवशी रिकामाच शाळेत गेलो होतो. माझ्यासारखीच बरीच मुले व मुली वर्गात होती.शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसवले होते.एक खापराची पाटी आणि पेन्सीलचा तुकडा या  वस्तू मला “कुचेकरबाई” ज्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या, त्यांनी दिल्या.हातात प्रथमच पाटी पेन्सिल मिळाली होती,त्यावर इतर मुलांचे बघून रेघोट्या ओढत बसलो.कुचेकर बाईनी फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘अ ‘ काढून ठेवला होता व त्या प्रत्येकाने पाटीवर तसा अ काढावा म्हणून सांगत होत्या पण वर्गात एवढा गोंधळ चालू होता की त्या काय सांगताहेत ते कळत नव्हते.माझ्या जवळ येऊन बाईनी माझ्या हातात पेन्सिल धरायला लावली  व माझा हात धरून  पाटीवर मोठा ‘अ ‘ काढला,ती माझ्या आयुष्यातली  पहिली अक्षर ओळख! बहुतेक माझा शिकायचा वेग बरा असावा,कारण लवकरच मी कुचेकर बाईंचा लाडका विद्यार्थी झालो होतो! दुसरीत गेलो आणि बाईंची बदली झाली.मग मला माझे दुसरे शिक्षक म्हणून मिळाले “वसंत गुरुजी” व ‘दीक्षित बाई”! मग तिसरी पर्यंत तेच माझे शिक्षक होते.अभ्यासाकडे त्यावेळी माझा नैसर्गिक ओढा असावा,कारण लवकरच माझे अक्षर वळणदार झाले.शिकवलेले लगेच आत्मसात केले जायचे.पाढे व सगळ्या कविताही पाठ असायच्या.चौथी ते सातवी शिकवायला आम्हाला दोन शिक्षक होते.एक होते “भुजंग गुरुजी” (भुजंगराव जाधव) व “नवले गुरुजी”.ते दोघे आळीपाळीने आम्हाला सगळे विषय शिकवायचे.पांढरे धोतर.पांढरा शर्ट व गांधी टोपी असा या दोघांचा पेहराव असायचा.या दोन्ही शिक्षकांनी माझ्यावर भरपूर मेहनत घेतली त्यामुळेच मी पी.एस.सी. परीक्षेत केंद्रात पहिला आलो.मला हायस्कूल स्कॉलरशिपही मिळाली.पुढे आठवीसाठी गावातच रयत शिक्षण संस्थेच्या  ‘कर्मवीर विद्यालयात” गेलो.त्यावेळी आठवीपासून इंग्रजी हा विषय होता.इंग्रजी शिकवायला आडनावच “विद्यासागर” असणारे शिक्षक लाभले.त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे इंग्रजीची भीती कुठच्या कुठे पळाली.आठवी ते दहावी तीन वर्षे ते माझे या विषयाचे शिक्षक होते व त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे मी इंग्रजी विषयात बोर्डात पहिल्या पाचात होतो! त्यांनी मला इंग्रजीच शिकवले असे नाही तर मराठी वाचनाची आवड लावली.नटसम्राट,अश्रूंची झाली फुले सारखी नाटके त्यांनी साभिनय म्हणून दाखवली होती.अनेक गाजलेल्या कवींच्या कविता त्यांनी अभ्यासक्रमात  नसतानाही  इंग्रजीच्या तासात शिकवल्या! माझ्यावर त्यांच्यामुळे सकस वाचनाचे व पुढे थोडेफार लिखाणाचे संस्कार झाले.याच काळात शाळेत शिकत असताना आदरणीय असे श्री ससे,अरणकल्ले,कदम,सगरे,बर्गे,पडवळ,जगताप,साळुंखे असे आपापल्या विषयातले निष्णात अत्यंत सेवाभावी शिक्षक लाभले.त्यांनी नुसतेच शिकवले नाही तर वेळोवेळी आर्थिक,मानसिक मदतही केली म्हणून आज जो काही आहे तसा मी घडलो.पुढच्या आयुष्यात शिकणे थांबेल की काय अशी परिस्थिती तयार झाली आणि निरेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसलेसर देव होवून मदतीला धावले. त्यांनी फी तर माफ केलीच; पण शाळेतर्फे भाड्याने खोली घेवून दिली.'रयत' च्या शिक्षकांनी त्या संस्कारक्षम वयात जे स्वाभीमानाचे व स्वावलंबनाचे धडे दिले ते पुढे आयुष्यभरासाठी उपयोगाला येत आहेत! काँलेजात व नोकरीत अनेक प्राध्यापक व अधिकारी मार्गदर्शकाच्या भुमिकेत भेटले. आयुष्याची लढाई कशी लढायची याचे ज्ञान देणारे गुरुजन व गुरूतुल्य मित्र भेटले त्यांनी मन लावून निस्वार्थीपणे जगणे शिकवले म्हणूनच जगाचा व्यवहार  शिकू शकलो.शालेय शिक्षण चालू असताना संस्कारक्षम वयात भेटलेल्या त्या शिक्षकांचे आयुष्यात स्थान सर्वोच्च  आहेच;पण आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शक म्हणून भेटलेली सगळी माणसे म्हणजे माझे शिक्षकच की!
आजच्या या शिक्षकदिनी माझे आयुष्य घडण्यात ज्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे 'त्या' तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्रिवार वंदन!      
     ....प्रल्हाद दुधाळ. (०५ सप्टे.).

No comments:

Post a Comment