Wednesday, July 29, 2015

आठवणीतला बेंदूर

आठवणीतला बेंदूर
  आज गावाकडे बेंदूर साजरा होतोय अशी बातमी वाचली.आणि बेंदूर या सणाबद्दल लिहावेसे वाटले. आपल्या शेतात वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सण साजरा केला जात असावा.काही ठिकाणी तो बैलपोळा म्हणून श्रावण अमावास्या  या दिवशी तर काही ठिकाणी भाद्रपद अमावास्येला साजरा केला जातो.कालौघात आता शेतीच्या कामांचे यांत्रिकीकरण झाले आहे आणि बैलांचे महत्वही ,पण एक काळ  असा होता की शेती पूर्णपणे बैलांवर अवलंबून होती. मोटेला बैल जुंपून शेताला पाणी दिले जायचे.नांगरणी,पेरणी,कोळपणी इत्यादी कामे बैलाकडून करून घेतली जायचीच पण त्या काळी  बैलगाडी वा छकडा हे वहातुकीचे महत्वाचे साधन होते.थोडीफार शेती असलेल्या शेतकऱ्याच्या दावणीला खिलारी बैलजोडी हमखास असायची! अजूनही काही शेतकरी बैल पाळतात. माझ्या लहानपणी गावात बेंदूर अगदी धुमधडाक्यात साजरा व्हायचा. तो थोडाफार आठवणीत असलेला बेंदूर आजच्या दिवशी आठवला त्याची ही उजळणी .......
      आषाढ महिन्यात पावसाची संततधार चालू असायची.शेतात उगवलेल्या पिकाने  हळूहळू बाळसे धरायला सुरवात केलेली असे.डोंगरदऱ्या,शेते व माळराने हिरव्या रंगात न्हालेली असत.नदीनाल्यांना पूर आलेला असायचा आणि मग बेंदूर सणाची चाहूल लागायची. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आणि या मित्रासाठी बेंदराच्या निमित्ताने बाजारातून बेगडाचा कागद,फुगे,रंगीत गोंडे,जलरंग व ऐटबाज झुलीची खरेदी व्हायची.लहान मुले कुंभारवाड्यातून मातीचे खिलारे  बैल घेवून त्यांना सजवत असत.बेंदराच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत असायचा. शेतकरी पहाटे उठून बैलाच्या खांद्याला तेल/तूप व हळद लावून मालिश करत त्याला प्रमाणे न्हावू घालत.बैलाच्या अंगावर वेगवेगळे रंगीत छाप उठवले जायचे.शिंगाना हिंगुळ लावून ती रंगवली जायची. मग शिंगांना रंगीत बेगड, गोंडे व फुगे लावून दिमाखात सजवले जायचे.पाठीवर रंगीत कलाकुसर व आरसे असलेल्या झुली टाकल्या जायच्या. प्रत्येकजण आपला बैल मिरवणुकीत चांगला दिसायला हवा म्हणून प्रयत्न करत असे.ठरलेल्या वेळी सगळे शेतकरी आपल्या बैलजोड्या घेवून मिरवणुकीला येत. वाजंत्री, ढोलताशाचा गजर होवून मिरवणूक सुरू व्हायची. कधी कधी मिरवणुकीत कुणाची बैलजोडी पहिली उभी रहाणार यावरून वादही  व्हायचे.एखाद्या वर्षी अगदी मारामाऱ्या सुध्दा व्हायच्या.जाणकार प्रतिष्ठीत लोक अशावेळी मध्यस्ती करून भांडणे मिटवत व मिरवणूक सुरू होत असे. प्रथम वाजंत्री मग ढोलताशा, लेझीमपथक, गावाच्या मुख्य रस्त्याने धुमधडाक्यात ही मिरवणूक निघायची.उखळी दारूचे आवाज घुमायचे,फटाक्यांच्या माळा पेटवल्या जायच्या.मिरवणुकीतील बैल अशा आवाजांना बुजायाचे आणि मालकांना आपले बैल सांभाळणे मुश्कील होवून जायचे.आख्खे गाव ही मिरवणूक बघायला रस्त्याच्या दुतर्फा उभे असायचे.मुले नाचायची, सर्वजण मिरवणुकीची मजा लुटायचे.
      दीडदोन तास ही मिरवणूक चालायची ग्रामदेवतेचे दर्शन घेवून मिरवणुकीची सांगता व्हायची. बैलजोडी घरी येताच बैलांच्या पायावर पाणी घातले जायचे.घरातील महिला बैलांना पंचारतीने ओवाळत त्यांना पुरणपोळी खायला घालत व मग घरात सर्वजण पुरणपोळीचा आरामात आस्वाद घेत असत.तर अशा प्रकारे बळीराजा आपल्या मित्राची बैलाची वर्षातल्या बेंदराच्या  सणाला कृतज्ञतापुर्वक पूजा करत असे.अजूनही बेंदूर साजरा होतो पण आता बैलजोडी पाळणारे शेतकरी कमी झालेत!पण आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेल्या या सणाला तोड नाही!

                                          .....प्रल्हाद दुधाळ.(२९ जुलै  २०१५)      

3 comments: