Tuesday, March 28, 2017

कोरी करकरीत नोट.


कोरी करकरीत नोट.


      टेलिकॉम सेक्टरमधे कस्टमर रिलेशन्स हा माझा खरं तर खूप आवडता प्रांत, इथे काम करताना एक तर खूप माणसे भेटतात,शिवाय कस्टमरचे काम मार्गी लागल्यावर जे जॉब सॅटिसफॅक्सन मिळते ना ते काही औरच, पण माझे पहिले प्रमोशन झाले आणि माझी बदली मटेरिअल मॅनेजमेंट सारख्या माझ्या दृष्टीने अत्यंत रुक्ष अशा विभागात झाली. स्टोअर सप्लायचे ते काम मला मुळीच आवडायचे नाही. इथून कधी एकदा बदली मिळेल असे मला वाटायचे, तरीही माझे काम मात्र मी व्यवस्थित करत रहायचो. माझ्या काम करायच्या पध्दतीमुळे माझे साहेब माझ्यावर भलतेच खुश होते. मी मात्र माझ्या आवडीच्या विभागात बदलीसाठी प्रयत्न करत होतो.असेच एक वर्ष गेले आणि एक दिवस माझी बदलीची ऑर्डर निघाली. आता इथून सुटका होणार या विचाराने मला खूपच आनंद झाला; पण तो अल्पकाळच टिकला कारण साहेब मला सोडायला तयार नव्हते. मी साहेबाना भेटायला गेलो त्यांची विनवणी केली ...
" सर, खूप दिवसांनी मला माझ्या आवडीचे काम मिळाले आहे शिवाय माझे काम पहायला माझ्या बदली तुम्हाला माणूसही मिळालाय. मग मला का आडवता?"
साहेब अत्यंत शांत होते. ते म्हणाले ...
" मला एक गोष्ट सांगा, समजा तुमच्या खिशात दहा शंभराच्या नोटा आहेत आणि तुम्हाला त्यापैकी एक नोट दुसऱ्या कुणाला द्यायची आहे तर कोणती नोट द्याल?"
मला हे समजेना की साहेब माझ्या बदलीच्यासंबंधात न बोलता हे नोटांबद्द्ल काय बोलताहेत!
मी गप्प आहे हे पाहून तेच बोलायला लागले...
" मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय कराल ते!"
पुढे ते म्हणाले ...
" तुम्ही खिशातल्या सगळ्या नोटा हातात घ्याल, सगळ्या नोटा निट पहाल आणि त्यातल्या त्यात मळकी फाटकी नोट निवडून समोरच्याला द्याल, हो ना ?"
मी मान डोलावली.
" तर या नोटासारखेच आहे, माझ्याकडे असलेल्या सर्व दहा माणसात सगळ्यात स्वच्छ व प्रामाणिक तुम्ही आहात, सोडायचाच झाला तर मी माझ्याकडचा सर्वात बिनकामी व अप्रामाणिक माणूस सोडेल. तुम्ही म्हणजे माझ्या खिशातली एकदम कोरी करकरीत शंभरची नोट आहात. त्यामुळे तुम्हाला मी सोडणार नाही! राहीला प्रश्न तुमच्या आवडीच्या कामाचा,तर उद्यापासुन मी तुम्हाला माझ्याकडच्या तुम्हाला आवडेल अशा कामावर नेमतो !"
मी शंभर नंबरी नोट ! अंगावर मूठभर मांस चढले!
पुढे त्यानी मला माझ्या आवडीचे काम दिले आणि तेथे मी ते काम मनापासून केले व माझे कर्तुत्व सिध्द केले!
आज हे आठवायचे कारण म्हणजे व्यवहारातील जुन्या पाचशे हजाराच्या नोटांची किंमत शुन्य झाली आहे पण कोऱ्या करकरीत शंभरच्या नोटेचा भाव मात्र अबाधित आहे, नाही का ?
.....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 23, 2017

कोल्हा आणि आंबट द्राक्षे....

कोल्हा आणि आंबट द्राक्षे....


काल एक मजाच झाली....
    मित्राबरोबर एका गुरुजींकडे गेलो होतो, तसे माझे त्यांच्याकडे काहीच काम नव्हते;पण मित्र म्हणाला ‘चल बरोबर’ म्हणून गेलो.
   या गुरुजीचा जन्मपत्रिक, वास्तुशास्र तसेच भविष्यशास्राचा बराच अभ्यास असावा.आत गुरूजींच्या केबिनमधे मित्र एकटाच गेला आणि मी बाहेर वेटिंगरूममधे बसून राहिलो.
  अर्ध्या तासात त्याचे काम झाले आणि तो मला बोलवायला बाहेर आला.आता तो मलाही आतमधे घेवून गेला, आत गेल्यावर मित्राने माझी गुरूजीबरोबर ओळख करून दिली.पुढे अर्धा तास आमच्या फलजोतिष,जन्मपत्रिका,वास्तुशास्र  अशा  गोष्टींवर गप्पा रंगल्या.मला या शास्रातले काहीच माहीत नसल्याने मी आपला ऐकायचे काम करत होतो. माझी नक्की जन्मतारीख वा जन्मवेळ मला माहीत नाही अर्थात त्यामुळे माझी कुंडलीही काढलेली नाही.पत्रिका न बघताच माझे लग्न झाले आहे आणि गेली बत्तीस वर्षे व्यवस्थितपणे संसार चालू आहे.मी एक उत्सुकता म्हणून गुरूजीना विचारले-
 “माझी जन्मपत्रिकाच नाही तर मग माझे भविष्य कसे बघता येईल?”
 गुरुजी म्हणाले “माझा त्या गोष्टीचा सखोल अभ्यास नाहीये, पण तरी मी तुमच्या हस्तरेषा वाचून थोडेफार तुमच्याबद्दल सांगू शकेल.”
"आलोच आहे तर घेवू हात दाखवून!",  असा विचार करून मी गुरूजींच्यासमोर माझा हात धरला.
माझा हात उलटा पालटा करून गुरूजींनी हाताचे बारीक निरीक्षण केले. माझ्याबरोबर आलेल्या मित्राला त्यांनी बाहेर बसायला सांगितले.
  माझ्याशी संबंधीत मिळत्याजुळत्या अशा अनेक गोष्टी गुरूजींनी सांगितल्या.मी खुश झालो.मग गुरूजींनी थोडा खाजगी स्वरात विचारले. “एक गोष्ट तुम्हाला विचारावी की नको हा प्रश्न पडलाय!”
“ बिनधास्त विचारा हो!”
“ मला एक सांगा तुम्हाला दुसऱ्याच कुणाशी लग्न करायचे होते का?”
“म्हणजे?”
“ म्हणजे आत्ता तुमचा संसार एकदम सुखाचा आहे त्याबद्दल मला मुळीच शंका नाही हो,पण तुमच्या हस्तरेषा बघून मला विचारायाचेय की हे लग्न ठरण्यापुर्वी तुमच्या मनात दुसरेच  कुणीतरी होते का?”
आता मात्र मी चांगलाच विचारात पडलो!  कुणाबद्दल आपण त्यावेळी विचार करत होतो बर ?
मी मनापासून आठवायचा प्रयत्न केला आणि एकदम मला एक नाही सात आठ नावे आठवली की, ज्यांच्याशी मला खर तर लग्न करायचं होत!
 पण काय करणार?
“ कोल्ह्याला द्राक्षं आंबट!”
गुरूजींनी नकळत माझ्या हाताची दुखरी नसचं पकडली होती की!
मी कसनुस हसत तिथून सरळ काढता पाय घेतला!
( थोडं खर थोडं खोट!)
...... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, March 18, 2017

पत्र

#मित्राला_पत्र
 प्रिय ...
      खरं तर मला प्रश्न पडलाय; तुला मित्र म्हणू का नको!तसा तू आणि मी दाखवायला वेगळे आहोत कुठे?माझ्या आतच तर तू राहतोस. माझ्यातला  तू नेमका नको तेव्हा आपले रंग दाखवतोस आणि त्याची सगळी वाईट फळ मात्र मला भोगावी लागतात! बरं ते जावू दे,  मला कधी कधी असेही वाटते की जर तुझा माझ्यावर एवढा प्रभाव आहे तर मग तू  माझा शत्रू तरी कसा असणार नाही का? जाऊ दे: नेहमीप्रमाणे प्रश्नांच्या गुंत्यात अडकून पडायला नको!  तर,  माझ्या प्रिय मित्रा कदाचित माझ्या पहिल्या श्वासाबरोबरच तुझी माझी गट्टी जमली ती जमलीच, मी कितीही प्रयत्न केला तरी तू गोचडीसारखा मला कायमचा चिकटलेला आहेस.
    मला थोड थोड आठवत  मी फार तर महिन्याभराचा असेल नसेल मला बघायला आलेली एक बाई माझ्या आईला म्हणाली फारच बारकुंडा आहे ग तुझा बाळ, तेव्हाच माझ्या मनात तू शिरलास! हो मित्रा न्यूनगंड या दुर्गूणाच्या रूपाने तू कायमच माझ्या आत तू रहायला लागलास. आपल्यात व इत्तरांच्यात फरक आहे या न्यूनगंडापायी मी कधी बाळस धरलच नाही.थोडा कळता झाल्यावर या न्युनगंडात भरच पडली ती आपण गरीब आहोत या समजाची! शाळेत पहिल्या नंबराने पास व्हायचो पण आपल्या या हुशारीचे कौतुक करायला कोणी  जवळ आले नाही आणि माझ्यातल्या तुला अजूनच रूजायला चान्स मिळाला. आपल्याला आपल्या आर्थिक स्थितीमुळे फार मोठी स्वप्ने पाहणे परवडणार नाही या न्युनगंडाने माझ्यावर तू राज्य करायला लागला.तुझ्यामुळे ना मला बालपण उपभोगता आले ना कॉलेज जीवनात मी रमलो.तुझा माझ्यावर असलेल्या पगड्यामुळे जीवन नीरस झाले. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचा मला माझ्या आत असलेल्या तुझ्यामुळे उपभोग घेता आला नाही.आपण गावंढळ म्हणून शहरी मुलांच्यात कमीपणा, तब्बेतीने बारीक म्हणून आपली छाप पडणार नाही, दिसायला यथा यथा म्हणून सुंदर मित्र मैत्रीणींपासून लांब, आर्थिक स्थिती बिकट म्हणून उच्चभ्रू वर्गापासून दूर,आपल्याला शोभणार नाही म्हणून आवडत्या फॅशनपासून दूर असे अनेक समज गैरसमज तुझ्या मैत्रीमुळे आत पक्के बसले. परिस्थिती बदलली प्रगल्भता आली आता पुर्वीचे दिवस राहीले नाहीत आता सगळे न्यूनगंड खरं तर लांब पळायला हवेत पण तुझ्या मैत्रीत एवढा गुंतलोय की कितिही दूर जायचा प्रयत्न केला तरी मांजर आडवे गेल्यासारखा तू आडवा येतोच आणि खूप प्रयत्नांनी जमवून आणलेली उमेद हातातून निसटून जाते.
  मित्रा न्युनगंडा आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला,आता जे जे तुझ्या आस्तीत्वामुळे हातातून निसटले आहे ते मला परत मिळवायचे आहे त्यामुळे आता मला तुझ्या मैत्रीच्या आड लपलेल्या गुलामीतून कृपा करून मुक्त कर. आता मला माझ्या पध्दतीने जगू दे. थोडा उशीर झालाय पण असू दे, आता मी समर्थ आहे, माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे याची मला जाणीव झाली आहे तेव्हा आता तुझी माझी कायमची कट्टी! आता पुन्हा पायात घोटाळू नको, गेट आऊट, गो!
तुझा ( आता मित्र नाही म्हणणार)
..... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 12, 2017

शिमगा...

  शिमगा...

फाल्गून पोर्णिमेच्या दिवस म्हणजे शिमग्याचा दिवस.आजकाल मात्र या सणाला होळीचा सण म्हणूनच जास्त करून ओळखले जाते.भारतीय संस्कृतीमधे प्रत्येक सणाचे असे एक खास महत्व असते. होळीच्या सणाचेही असेमहत्व आहेच.पुराणातल्या कथा पुराणात जरी ठरवले तरी होळीच्या निमित्ताने मनात साठलेल्या वाईट भावना, आपापसातले हेवेदावे, मतभेद यांचे प्रतिकात्मक दहन होळीत केले जावे, परस्पर सामजस्य वाढावे यासाठी होळी साजरी केली जात असावी.भुतकाळात अजाणतेपणी माणसाच्या मनात कोणाहीबद्द्ल राग द्वेष वा इत्तर काही भावना साठलेल्या असतील तर वर्षातून एकदा त्या व्यक्तींच्या नावाने बोंब मारून त्या भावनांचा निचरा करून मनाची स्वच्छता करण्यासाठी शिमगा साजरा करण्याची कल्पना संस्कृतीत रुजवणार्या पुर्वजांना नक्कीच मानावे लागेल. होळीत अनिष्ट गोष्टींची आहूती देवून परिसराची स्वच्छता करण्याची प्रथा रूजली असावी. सण साजरा करण्याच्या पध्द्ती काळाप्रमाणे बदलत गेल्या होळीही त्याला अपवाद नाही.शहरात अनेक प्रांतातल्या पध्दतींची आजकाल सरमिसळ झालेली दिसतेआपल्याकडे होळीच्या दिवशी होळी पुजन करून पेटवली जाते,नारळ नैवेद्य होळीला अर्पण केले जाते.दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.रात्रभर जळत असलेल्या होळीच्या भोवती बाया बापड्या पाण्याच्या घागरी ओतून होळीला शांत केले जाई. होळीच्या भोवतीच्या मातीचा मस्त चिखल व्हायचा आणि मग या चिखलाने एकमेकाला माखण्याचा खेळ रंगात यायचा.आजकाल निसर्गोपचार करताना मडबाथ दिला जातो.वर्षातून एकदा प्रथा म्हणून मडबाथ करायला लाऊन शरीरशुध्दी करून देणारी ही पध्दत आज लोप पावली असली तरी त्या प्रथेमागे असलेली कल्पना नक्कीच अचंबीत करणारी आहे.आजकाल होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात.उत्तर भारतातील ही प्रथा आपल्याकडे आता रुजली आहे पण आपल्याकडे रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी! नैसर्गिक रंग एकमेकांना लावून पुढे येवू घातलेल्या उन्हाळ्यासाठी शाररीक तयारी करून घेण्याचा विचार यामागे असावा असे वाटते.आजकाल मात्र या सणांच्या निमित्ताने अनेक अनिष्ट गोष्टी घडताहेत.रंग लावण्याच्या निमित्ताने छेडाछेडीचे प्रकार होताहेत. काळे अथवा रूपेरी रंग लावून नशापाणी करून बिभत्स चाळे करत शहरातील रस्त्यांवर अनिर्बंध तरूणाई  रस्त्यावर धुडगूस घालताना दिसते तेव्हा मात्र या प्रथा कुठे भरकटत चालल्या आहेत याबद्दल खेदाची भावना दाटते. बहुतेक सणावारांची कमीअधिक प्रमाणात अशीच अवस्थ्या झाली आहे. होळीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने जगातल्या सर्व अनिष्ट प्रथा,अंधश्रद्धा, आतंकवाद, भेदाभेद यांचे उच्चाटन होवून मने स्वच्छ व्हावीत, सुसंवाद वाढून माणुसकी खोलवर रुजावी यासाठी प्रार्थना करू या!
   ..... प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, March 7, 2017

प्रगल्भता.

      प्रगल्भता.

     साधारणपणे असे मानले जाते की माणसाचे वय वाढले की त्याच्याकडे  प्रगल्भता आलेली असते, पण वयाप्रमाणे जे काही शहाणपण वा ज्ञान माणसाकडे येते त्याने प्रगल्भता येईलच असे नाही! वय वाढले म्हणून किंवा एखादी उच्च पदवी घेतली म्हणून येण्याची माणसात प्रगल्भताही आली असे होत नाही.कुणी असेही म्हणतात की एकदा दोनाचे चार हात केले की सुखी संसारासाठी आवश्यक तेव्हढी अक्कल आपोआप येते,हा विचार तर शुध्द वेडेपणा आहे! वयाबरोबर समजूतदारपणा वाढू शकतो पण समजूतदार माणूस आहे म्हणून तो प्रगल्भही आहे असे मानणे धाडसाचे होईल. मुळात परिपक्वता आणि अध्यात्मिक प्रगल्भता यात प्रचंड फरक आहे.आयुष्यात आनंदी सुखी व समाधानी असण्यासाठी माणसाकडे ही अध्यात्मिक प्रगल्भता येणे आवश्यक आहे. आपण सहजपणे म्हणतों की मी आता प्रगल्भ आहे, पण व्यावहारिक परिपूर्णता आणि प्रगल्भता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. अध्यात्मिक प्रगल्भता असणे म्हणजे नक्की काय आहे,याबद्दल कुठे कुठे वाचनात आले ते आपल्याशी शेअर करतो आहे.
कशी असते अध्यात्मिक प्रगल्भता? काय विशेष गुण असतात अशा प्रगल्भ माणसाकडे?
आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भता असलेला माणूस आजुबाजूच्या लोकांमध्ये बदल व्हायची वाट न पाहता  स्वत:मधे काय काय बदल व्हायला हवेत यावर विचार आणि कृती करतो! अशी प्रगल्भता लाभलेला माणूस समोरच्या माणसांना त्यांच्यातील गुणदोषांचसहीत सहजपणे स्वीकारतो.माणूस जसा आहे तसा स्वीकारण्याची वृत्ती असणे म्हणजे प्रगल्भता असणे! प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या बाबीबद्दल असलेलेले मत खोडून काढण्यात आपली उर्जा वाया घालवण्यापेक्षा असा परिपक्व माणूस प्रथम हे कबूल करतो की एकाच गोष्टीबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो! “झाले गेले विसरून जावू, नवी सुरवात हवी!”
अशा दृष्टीकोनातून होवून गेलेल्या गोष्टींकडे प्रगल्भ माणूस बघतो. माफ करून आणि माफी मागून जीवनात प्रगती साधता येते यावर प्रगल्भ माणसाचा विश्वास असतो.असे विचार करणारी  व्यक्ती कोणत्याही नात्यांकडून काही अपेक्षा ठेवत नाही, तर काही घेण्यापेक्षा काही देण्यातला आनंद त्याच्यासाठी महत्वाचा असतो.प्रगल्भ माणूस दुसऱ्यासाठी केलेल्या कोणत्याच गोष्टी दुसऱ्यासाठी केल्यात असे मानत नाही तर जे काही केले ते स्वत:च्या आनंदासाठी केले असे तो समजतो.असा माणूस आपण फार बुद्धिमान आहोत याची जाहिरात मुळीच करत नाही वा कुणी आपल्याला चांगले म्हणावे,सगळ्या गोष्टींचे श्रेय मिळावे अशी अपेक्षा ठेवत नाही वा आपल्या आयुष्याची कुणाशीही तुलना करत नाही. प्रगल्भ माणसाच्या जीवनात आत्मशांतीला सर्वोच्च स्थान असते.आपल्या खऱ्या गरजा आणि बाळगलेल्या इच्छा यांच्यातला फरक  प्रगल्भ माणसाला पक्का माहीत असतो.वेळप्रसंगी आपल्या अशा अवास्तव इच्छांना आवर घालण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असते. माणूस जेंव्हा आपला आनंद भौतिक सुखांमधे न शोधता आयुष्यातल्या छोट्या मोठ्या प्रसन्न क्षणांमध्ये शोधतो, कारणाविना जो समाधानी व आनंदी राहू लागतो तेंव्हा त्याला खऱ्या अर्थाने अध्यात्मिक परिपक्वता आली असे म्हणता येईल.
आहात का तुम्ही अशा प्रकारचे प्रगल्भ ?

    ..... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 5, 2017

नशीब

     परवा मार्केटमधे फिरत होतो,अचानक एक जुना मित्र दिसला.मी त्याला हाक मारली.मग लक्षात आले की अरे याच्याकडून उसने घेतलेले पैसे आपण परत केलेले नाहीत. तो समोर आला आणि म्हणाला" अरे बरा सापडलास!" 'आ बैल मुझे मार' असेच झाले की! आता 'हात दाखवून अवलक्षण' करून घेतले होते त्यामुळे त्याच्याशी बोलावे लागणारच होते!त्याने माझी इज्जतच काढली की,म्हणाला " गप्पा तर श्रीमंत असल्याच्या मारतोस, मग पैसे का देत नाहीस ? तुझी परिस्थिती म्हणजे 'उंची दुकान फिकी पकवान' सारखी आहे! हे म्हणजे मी नकळत 'विकतचे दुखणे 'घेतले होते! काहीतरी थाप मारून सुटका करून घेतली! हल्ली बऱ्याचदा आमचं हे असं 'आता मला पहा आणि फुले वहा' असं व्हायला लागलंय बघा, नशीब खराब बघा आपलं !
.... प्रल्हाद दुधाळ.
LikeShow more reactions
Comment