Sunday, January 29, 2017

प्रांजळ....

"प्रांजळ”- मला उमगलेले .....

कवी रवींद्र कामठे यांचा चपराक साहित्य महोत्सवात प्रकाशित झालेला  “ प्रांजळ “ हा काव्यसंग्रह नुकताच वाचला. प्रांजळपणे सांगायचे तर मी काही परीक्षक वगैरे नाही.माझ्या अल्पमतीला जो समजला  उमजला तो ‘प्रांजळ’ मधील प्रांजळपणा जेवढा मला भावला त्याबद्दल थोडेफार लिहिण्याचा हा प्रयत्न आहे....

श्री रवींद्र कामठेजी यांनी प्रेमापासून ते विरहापर्यंत आणि शेतीपासून ते अध्यात्मापर्यंतचे विषय या संग्रहात समर्थपणे हाताळले आहेत.इतिहास आणि काही प्रासंगिक विषयांवरील कवितांचाही या संग्रहात समावेश आहे.मी हा संग्रह मन:पूर्वक वाचला आणि मला या संग्रहात अतिशय आवडलेल्या जागा येथे देत आहे.

पहिल्याच कवितेत ते म्हणतात –

मांडले कवितेने भावही प्रांजळपणे,व्यक्त झाले अंत:करणापलीकडले!

या संग्रहात अनेक प्रेमकविता आहेत.त्यातील काही ओळींचा उल्लेख करावासा वाटतो –

-    चंद्रालाही वाटला तुझाच की रे हेवा,शुक्रतारे सारे,आसमंत तेजवून गेले .

-    हे स्वप्न मजला पडले का वास्तव हे,सडे मोगऱ्याचे पडले माझ्या बागेत होते.

-    पापण्या मिटल्यावरही तुझाच चेहरा दिसतो,स्वप्नातही तुझी साथ सोडवत नाही.

-    पाउस आला की प्रेम कसं उमलायला लागत,मनाचं पाखरू कसं बागडायला लागत!

या संग्रहातल्या लाजाळू,यौवन,सुखद आठवणी,तुझ्या काळजात राहणे आहे इत्यादी प्रेमकवितानी बहार आणली आहे.

प्रेमाबरोबरच द्वेष,वैर,देव,सुख, दैव इत्यादी विषयांवरच्या कविताही उल्लेखनीय आहेत –

-    सांगू ना सखे काय तुला होते हवे ,नव्हते का ग प्रेम मी पुरेसे केले?

द्वेषावर तुझ्या मी प्रेम पुरेसे केले!

किंवा

- पाण्यात राहून माशाशी केले वैर नाही ,असे फारसे काहीही केले मी गैर नाही!

- कोण देत कोण नेत मला माहीत नाही,जात्यातच नियतीच्या पुरा भरडलो!

- देताना तू छप्पर फाडून देतोस म्हणे, ओंजळीत मावेल इतकेच दे नशिबा आता!

- येवू नका सुखानो असे माझ्या दारी, मजवरी दु:ख जरा रुसले तरीही!

-कशाला घ्यावा शोध सुखाचा,दु:खातच सुख सापडले आहे !

-वेदना माझ्या कोणा मी आता सांगू कधी,फाटक्या आभाळास ठिगळे लावू कधी?

-ठेव ना रे पावसा साठवून हे थेंब तुझे, शिंपडेन मी ते आल्यावर भाग्य माझे!

- तूच घडवीशी ,जडवीशी,तूच मिळवीशी,अजूनही जमात राक्षसांची संपवीली नाही,

शिवरायांचा इतिहास आदळतो कानीकपाळी,दुज्या जिजाऊची कूस तू का उजवली नाही?

- मुर्तीतल्या देवा कर ना तू एक ठराव,राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव !

अशी वेगळी प्रार्थनाही आहे.

या शिवाय विविध विषयांवर रविन्द्रजी भाष्य करतात जसे –

दुर्गपुजा-

गडकोट हे आहेत दैवत आपुल्या स्वराज्याचे,पणाला लागले येथे सर्वस्व आपुल्या मावळ्यांचे!

दुष्काळ –

साकड घालितो आम्ही घेऊनिया माळ,नको सावट हे सदा सर्वकाळ!

भ्रष्टाचार-

कुठवर सहन करायचे हे सारे आपण, चला बदलून टाकू आपण आचार सारा!

भीक –

देशील का रे एक दान देवा आता,माणसात माणुसकी तू का भरली नाही?

बळीराजा –

-    बळ येवू दे आता बाहूत दहा हत्तींचे,राजा तुझ्यावर देशाची मदार आहे!

-    बळीराजाची आसवे वाया का घालविता,आसवांची शेती आता पिकवू नका!

शेती,शेतकरी,दुष्काळ,राजकारण,भ्रष्टाचार यावर या संग्रहात अनेक कविता आहेत.

वयाची पन्नाशी ओलांडल्यावर जे विषय कवितेत अचानक डोकावायला लागतात अशा विषयांवरही या संगहात भाष्य आहे.जसे की –

-    वेध मला आता लागले होते पैलतीराचे, तुझ्या एका झलकेच्या  अर्चना केल्या होत्या!

किंवा

-    जेव्हा आयुष्य माझे ढळायला लागले,तेव्हा आयुष्य मला कळायला लागले!

श्री रविंद्र कामठे यांचा हा “प्रांजळ” पणा नक्कीच रसिकांना आवडेल याची मला खात्री आहे,त्यांच्या भविष्यातील साहित्यसेवेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!

..... प्रल्हाद दुधाळ. पुणे (९४२३०१२०२०)

Monday, January 23, 2017

एका सस्पेंसची कॉमेडी

      एका एकांकिका स्पर्धेसाठी आमच्या ग्रुपने एक रहस्यकथेवर बेतलेली एकांकिका बसवली होती.आमच्याच ग्रुपच्या एकाने या एकांकिकेचे लेखन केले होते.एकांकिका त्यानेच दिग्दर्शित केली होती, एवढेच काय नेपथ्य, प्रकाशयोजना शिवाय एक प्रमुख भूमिका! अशी अष्टपैलू कामे तो स्वत:च करणार होता.सबकूछ 'मी'च या त्याच्या हट्टापुढे उघडपणे जरी कुणी काही बोलत नसले तरी ग्रुपमधे बरीच नाराजी होती.या एकांकिकेत नायिकेच्या भूमिका करणाऱ्या मुलीवर इंप्रेशन मारण्यासाठी आमचा हा मित्र हा सगळा खटाटोप करत होता हे उघड सत्य होते.एक मात्र निश्चित होते की त्याच्या लिखाणात दम होता.एकांकिकेची संहिता एकदम दमदार होती.जेव्हा प्रथम  वाचन झाले तेव्हाच सर्वानी त्याच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले होते.योग्य दिग्दर्शक मिळाला तर आमची ही एकांकिका पहिले बक्षीस मिळवणार् यात शंकाच नव्हती! पात्रांची निवड झाली आणि आमच्या मित्राच्या दिग्दर्शनाखाली तालमी सुरू झाल्या. एका रहस्यमय खुनाचा तपास अशा स्वरूपाचे हे कथानक होते.पंधरा दिवस अथक तालमी झाल्या.एकांकिका छानच बसली.आमचा मित्र या कथेतील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारत होता.एकांकिका स्पर्धेचा दिवस उजाडला आणि आम्ही संपूर्ण तयारीने आमची एकांकिका सादर करण्यासाठी रंगमंचावर गेलो.तीसरी घंटा वाजली आणि पडदा सरकला.
      स्टेजवर संपूर्ण अंधार होता.रातकिडे ओरडल्याचा आवाज आणि अचानक एका बाईची प्रचंड किंकाळी..
  एकांकिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.प्रवेशामागून प्रवेश सादर होत होते.थिएटरमधे पिनड्रॉप सायलेंस होता.पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.खरा खुनी कोण या रहस्याभोवती कथानक फिरत होते.सगळ्यांनी आपआपल्या भूमिका जीव ओतून केल्या होत्या.नाटकाच्या उत्कर्षबिंदूपर्यंत कथा पोहोचली होती.पोलीस इंस्पेक्टर आणि नायिकेमधील संवाद चालू होता.
"मँडम,मला समजलय हा खून कोणी केलाय!'
"कशावरून तुम्ही हे तुम्ही ठरवलं साहेब ?"
"माझ्याकडे तसा पुरावा आहे!"
 "पण तुमचा हा पुरावा खुनी नराधमाला शिक्षा देईल ना?"
  " हो नक्कीच,तुम्हाला दाखवतोच तो पुरावा!" संवाद बोलता बोलता इन्स्पेक्टर पुरावा बाहेर काढण्यासाठी आपला हात खिशात घालतो त्याची नजर मात्र नायिकेची भूमिका करणाऱ्या पात्राकडे होती.उभी असलेली नायिका खाली वाकून काहीतरी घेत होती आणि इन्स्पेक्टरचे लक्ष विचलीत झाले त्याला खिशात ठेवलेला पुराव्यांचा कापडाचा तुकडा काही सापडेना!
तो पुरावा हातात आल्याशिवाय पुढचा संवाद बोलता येणार नव्हता! रंगमंचावर असलेली दोन्ही पात्रे ब्लँक झालेली आणि इन्स्पेक्टर खिशात पुरावा शोधतो आहे.त्याला आता घाम फुटायला लागलेला!
 एकदाचा इन्स्पेक्टरला खिशातला कापडाचा तो तुकडा मिळाला आणि तो पुढचा संवाद बोलण्यापूर्वीच प्रेक्षक ओरडले...
"सापडला.😜😜😜😜"
प्रेक्षकांनी हसून थिएटर डोक्यावर घेतले!
आमच्या रहस्यमय नाटकाची कॉमेडी झाली होती !!!
   ..... @ प्रल्हाद  दुधाळ.

Tuesday, January 17, 2017

.....जामिन कुणा राहू नको !

.....जामिन कुणा राहू नको !

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनि बोज आपुला दवडुं नको
स्‍नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको

     अनंत फंदी यांचा हा  "फटका " आपण बऱ्याचदा रेडिओवर ऐकलेला असेल.या फटक्यात त्यांनी माणसाने कसे वागावे कसे वागू नये ते अगदी उत्तम पध्दतीने सांगितले आहे.एका ओळीत त्यांनी पुढे असेही सांगितले आहे की ..
...जामिन कुणा राहू नको!
पण समाजात रहात असताना आजच्या युगात आपण कुणाला जामिन राहायचे नाही असे कितीही ठरवले तरी शक्य होता नाही.याचे मुख्य कारण म्हणजे आपला भिडस्त स्वभाव!
   आपल्याला अनेक जीवश्च कंठश्च मित्र असतात,अनेक नातेवाईकाचे आपले अगदी घरचे/जिव्हाळ्याचे संबंध असतात.आपली संस्कृती "एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!" असे शिकवते; त्यामुळे कधी ना कधी आपण वरीलपैकी कुणालातरी, कधी जाणतेपणी तर कधी भिडस्तपणामुळे एखाद्या कर्जासाठी वा इत्तर कारणासाठी जामिन राहतो.
    माझंही असं बऱ्याचदा झालंय.ज्यांच्या कर्जासाठी आपण जामिन राहतो त्यावेळी आपण असे गृहीत धरतो की समोरची व्यक्ती सगळी देणी वेळेत देणारच आहे, त्यामुळे सही द्यायला काय हरकत आहे?
दोन हजार साली अशाच ऑफिसातल्या अगदी जवळच्या मित्राने मला गळ घालून एका सहकारी बँकेत नेले.त्याला पन्नास हजार कर्ज घ्यायचे होते .कागदपत्रे अगोदरच तयार होती.माझ्याआधी एका बाईनीं जामिनदार म्हणून सही केलेली होती.या मित्राची नोकरी तर होतीच ,शिवाय काही जोडधंदेही तो करायचा.दररोजच्या संबंधातला हा मित्र कायम थोडाफार आर्थिक अडचणीत असायचा.तसे माझ्या माहितीत तरी त्याने कुणाचे पैसे बुडवल्याचेही ऐकिवात नव्हते, त्यामुळे त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून जामिनदार म्हणून त्याच्या त्या कर्ज प्रकरणावर मी सही केली.
     पुढे माझी बदली दुसऱ्या विभागात झाली आणि त्याच्याबरोबरच्या गाठीभेटी बंद झाल्या .नंतर त्याने दुसऱ्या उपनगरात घर खरेदी केले. त्याची बायकोही सरकारी नोकरीत आहे.चारचाकीत फिरणाऱ्या या मित्राला कधीकाळी आपण जामिनदार राहिलो होतो हे तर मी पूर्णपणे विसरून गेलो होतो, पण एक दिवस बँकेने मला पत्र पाठवून याची ठळकपणे आठवण करून दिली!
      मला बँकेची नोटीस आली होती आणि त्या नोटीशीत असे स्पष्ट लिहिले होते की “सदर कर्जदाराने कर्जच काय पण व्याजही भरले नाही!” आता त्या पन्नास हजार रुपयांचे व्याजासहित नव्वद हजार झाले  होते! नोटीशीत वसुलीसाठी चांगलाच दम भरलेला होता.खिशात पैसे नसले तर उपाशी राहील,पण कुणापुढे हात पसरणार नाही, या बाण्याचा मी, त्या नोटीशीला चांगलाच घाबरलो! त्या मित्राला फोन केला आणि बरेच काही बोललो.त्याने मला झालेल्या त्रासाबद्दल माझी माफी मागितली.एकदोन दिवसात बँकेत जाउन काय असेल ते बघून टाकतो, असा त्याने मला शब्द दिला.आठवडाभरानंतर मी पुन्हा त्याला फोन केला तर त्याने बँकेत जावून आल्याचे सांगितले आणि मी निर्धास्त झालो.
या गोष्टीलाही आता पाच वर्षे झाली.मधल्या काळात दोनचार वेळा आम्ही भेटलोही!
   काल पोस्टाच्या पेटीत एक पत्र दिसले. मी पत्र खोलले ..
  बापरे,आता पन्नास हजार रुपयांचे एक लाख पचेचाळीस हजार झाले होते. कर्जदार आणि दुसरा  जामिनदार या दोघांचेही राहण्याचे पत्ते आता बदललेले होते त्यामुळे त्यांना अशी नोटीस मिळण्याचा प्रश्नच नाही पण मी त्याच पत्त्यावर राहतोय त्यामुळे मला मात्र नोटीस बरोबर मिळालीय! त्या मित्राला नोटीस वाटस अप केलीय.बघू या काय करतोय ते!
  आज अनंत फंदी यांच्या त्या ‘फटक्या”तला एकूणेक शब्द खरा आणि आचरणात आणावा असे वाटायला लागलंय!
  अशा लोकांमुळे माणसांचा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल.
  काय मत आहे आपलं?
    ............... प्रल्हाद दुधाळ.


Monday, January 16, 2017

"मना दर्पणा" पुस्तकाची प्रस्तावना

चपराक साहित्य महोत्सव 2017 मधे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे प्रकाशन गुरूवार दि.19 जानेवारी 2017 रोजी होत आहे. या महोत्सवात माझ्या " मना दर्पणा" या पुस्तकाचेही प्रकाशन होत आहे.या संग्राह्य पुस्तकाला घनश्याम पाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.माझ्या एकूण पंचवीस लेखांचा हा संग्रह या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येत आहे.माझे हे लेखन आपणास नक्की आवडेल अशी आशा आहे.आवर्जून वाचावे व संग्रही असावे अशा या पुस्तकाची आपण ऑनलाइन खरेदी करू शकता.
संपर्क..... चपराक प्रकाशन (020 24460909 )
माझा संपर्क क्रमांक.-- प्रल्हाद दुधाळ (9423012020 )

"मना दर्पणा" पुस्तकाची घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना खास माझ्या मित्रांसाठी....
प्रस्तावना
मानवी मन म्हणजे जणू अलीबाबाची गुहाच! या गुहेत काय काय दडवलंय हे भल्याभल्यांना कळत नाही. इतरांना सोडा पण खुद्द त्या व्यक्तिलाही माहीत नसते की आपण मनात काय काय साचवलंय. या ‘साचले’पणातूनच अनेक समस्या, प्रश्‍न उद्भवतात. म्हणूनच मन प्रवाही असायला हवं. त्यासाठी लागतो मनाचा निर्मळपणा, निरागसपणा. तोच दुर्मीळ होत चालल्याने समाजस्वास्थ्य धोक्यात आले आहे. एखादी ‘मनात’ली गोष्ट सांगितली की किती हलके हलके वाटते! तरीही अनेकजण हे ‘मणा मणा’चं ओझं अकारण सोबत वागवतात. त्यातूनच शारीरिक, मानसिक व्याधींना सामोरे जातात. आयुष्याचा अक्षरशः नरक होतो. का? तर मनातली ही घुसमट बाहेर न पडल्यानं! अशाच मनामनांचा आरसा दाखवण्याचं काम केलंय, पुण्यातील लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी!
दुधाळ हे मुळात कवी आहेत. त्यामुळे संदेदनशीलता ओघाने आलीच. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. बीएसएनएल मधील नोकरी सांभाळत ते उत्तमोत्तम लिहित असतात. त्यांचा हा लेखसंग्रह प्रकाशित होत असतानाच एका कादंबरीची आणि कथासंग्रहाची त्यांची तयारी सुरू आहे. ‘लिहित्या’हातांना आणखी काय हवं? नव्याने लिहिणारे आणि मुख्य म्हणजे गुणवत्तापूर्ण लिहिणारे हे लेखक मराठी भाषेची पताका खांद्यावर घेऊन बेधुंदपणे डौलत आहेत. त्यांच्या या ‘झपाटलेपणा‘ला आपण दाद द्यायलाच हवी.
‘मना दर्पणा’ या पुस्तकात छोटे छोटे लेख आहेत. ते आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपले प्रबोधन करतात. मनातील संकोच, नैराश्य पळवून लावून आत्मबळ वाढवतात. आजुबाजूची सामाजिक परिस्थिती समजावून सांगतात. वर्तमानाची तटस्थपणे माहिती देतानाच भविष्याची जाणीव करून देतात. हे करताना आपला भूतकाळीही विसरू देत नाहीत. हीच तर प्रल्हाद दुधाळ यांच्या लेखणीची खासीयत आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्‍लोक’ लिहिले. तोच धागा पकडून दुधाळांनी मनाचे विवेचन केले आहे. आपल्या पहिल्याच लेखात ते म्हणतात, ‘धीर धरा रे...!’ असा सल्ला त्यांना का द्यावासा वाटतोय? तर आजच्या पिढीला धीरच धरवत नाही. सगळे काही ताबडतोब हवे. ‘आम्ही पैसा फेकतोय ना? झाले! मग आम्हाला जे हवे ते मिळायलाच हवे’ असा काहीसा उतावीळपणा अनेकात असतो. त्यांना ‘सबुरी’चा सल्ला दिलाय. सहनशीलता हरवत चाललेल्या समाजाला जीवन सुखकर करण्यासाठी थोडा धीर धरायला ते सांगत आहेत.
दुधाळांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही. कोणीतरी आपल्याला वेदामृताचे डोस पाजत सुटलाय आणि आपल्याला त्यामुळे अजिर्ण होतेय असे त्यांच्याबाबत सुदैवाने घडत नाही. साध्या, सोप्या आणि संवादी भाषेत ते वाचकांशी सलगी साधतात. त्यात ‘मी कुणी फार मोठा लेखक आहे आणि सृष्टीच्या कल्याणाची जबाबदारी परमेश्‍वराने माझ्याकडेच दिलीय’ असा अहंकारी आविर्भाव नाही. त्यात सुलभता आहे. भाषा प्रासादिक आणि रसाळ आहे. अनेक ठिकाणी खुसखुशीत किस्स्यांची पेरणी केलीय. छोटीछोटी वाक्ये आहेत. त्यामुळे हे पुस्तक हातात घेतले की खाली ठेववणारच नाही. यातील अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती आपल्या आजुबाजूला आहेत, आपल्यात आहेत असे वाटू लागते. मग विचारांच्या पातळीवर आपण बरीच पुढची मजल गाठतो आणि स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा ‘माणूस’ म्हणून विचार करू लागतो.
दुधाळ म्हणातात, ‘आपणच आपले वैरी...’ स्वतःच स्वतःशी शत्रूत्व घेणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. असे होऊ शकते का? आपण आपल्याशी वैर धरावे? कशासाठी? आणि ते कधी संपणार? पण घडतंय खरं असं! तटस्थपणे विचार केल्यास दुधाळांच्या विधानातील सत्यता पटेल. आभासी स्वप्नांमागे धावताना आपण वस्तुस्थिती स्वीकारायला तयार होत नाही आणि मग सुरू होते हव्यासांची स्पर्धा... या स्पर्धेने आपण मेटाकुटीला येतो, जिकिरीला येतो, काहीवेळा नैराश्याकडेही जातो पण सुखी आणि समाधानी जीवनाचा राजमार्ग खुल्या मनाने पाहतच नाही... हा दोष कुणाचा? मोठी स्वप्ने अवश्य पहावीत. ती पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्नशीलही असावे, पण नशिबाला दोष देत निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी, कुणाच्या मागे पळण्याऐवजी आपण आपला मार्ग सजगतेने चोखंदळायला हवा. मनाचे दरवाजे उघडण्याचा मार्ग प्रल्हाद दुधाळ यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलाय.
सध्या एक होतंय, अनेक दहशतवादी संघटना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची जबाबदारी घेण्यासाठी धडपडत असतात. त्यातून त्यांना राजकारण साधायचे असते. समाजाला वेठीस धरायचे असते. मात्र सामान्य माणूस फक्त जबाबदार्‍या झटकायचा प्रयत्न करत असतो. ‘नकोच ती कटकट’ म्हणून ‘मी नाही त्यातला’ हे सूत्र तो अवलंबतो. स्वतःच्या अपयशाचे खापर कुणावर तरी फोडले की झाले! हजार पळवाटा तयारच असतात. म्हणून दुधाळ म्हणतात, यशस्वी व्हायचे असेल तर जबाबदारी घ्यायला शिका. ‘मी जबाबदार आहे’ हा मूलमंत्र त्यांनी वाचकांना दिलाय. दुसर्‍याकडे बोट दाखविण्याऐवजी आधी स्वतःकडे पहावे यासाठी त्यांनी काही चिंतनसूत्रे दिली आहेत. आपल्यावरील परिस्थितीला आपणच जबाबदार कसे असतो याची दहा कारणेच त्यांनी या लेखात दिलीत. ती मुळातून आणि गंभीरपणे वाचायला हवीत.
आपला देश कृषीप्रधान आहे. मग आपल्या शेतीची अवस्था नक्की कशी आहे. ‘वडिलोपार्जित शेती’ बिल्डरांच्या घशात घालताना पैशाच्या मागे लागून आपण नक्की कोणता करंटेपणा करतोय? त्याचे भवितव्य काय असणार आहे? शेतीच्या विक्रीतून अचानक आलेल्या मोठ्या पैशाने माणसाचे काय होते? आपली परंपरागत शेती विकून आयता पैसा मिळवायची लोकांची मानसिकता कशी व का तयार होतेय, हे सगळे चिंतन त्यांनी डोळसपणे मांडले आहे. आज सर्वत्र नागरीकरण झपाट्याने होत असताना अनेक शेतकर्‍यांनी जमिनी विकून कसा पैसा केला आणि पुढे त्यांची कशी वाताहत झाली याची अनेक उदाहरणे आपण बघितलेली आहेतच. म्हणजे दीडशे एकर जमिन एखाद्या कंपनीला विकल्यानंतर आलेल्या पैशातून ‘सर्व प्रकारची’ मौजमजा केली आणि आज त्याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेला एक दळभद्री इसमही मला माहीत आहे. दुधाळ नेमके हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. धरणीमायेचा आक्रोश त्यांनी समाजभान ठेवून प्रभावीपणे मांडलाय.
राग हा तर माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू! ‘विनाशक क्रोधभावनेने’ होत्याचे कसे नव्हते होते हेही त्यांनी डोळसपणे दाखवून दिले आहे. ‘साम, दाम, दंड, भेद असे सर्व पर्याय आपल्या वैर्‍यावर सूड उगवण्यासाठी वापरले जातात. असे करताना आपले वैयक्तिक नुकसान होत आहे हेच माणसे विसरतात. ती एकप्रकारच्या नशेत वावरत असतात’ हे सत्य दुधाळांनी अधोरेखित केले आहे. क्रोधभावना व त्यापायी होणारे मनोकायिक दुष्परिणाम टाळायचे असतील तर सारासार विवेकबुद्धी कायम जागृत असायला हवी. हे ‘जागे’ करण्याचे काम या पुस्तकातून साधले आहे.
नात्यातला सगळ्यात मोठा रोग कुठला? तर तो गैरसमज! या रोगामुळे अनेक साम्राज्ये खालसा झालीत. भाऊबंदकी होऊन मोठा रक्तपात घडलाय. अनेक मित्र पुढे कट्टर शत्रू बनलेत. गैरसमजाची लागण झाल्याने झालेल्या विनाशाची उदाहरणे कमी नाहीत. तरीही अनेकदा आपण मोकळेपणे बोलत नाही. हे स्नेहबंध जपताना कोणती काळजी घ्यावी याचा वस्तुपाठ दुधाळांनी घालून दिलाय. ते याचे काव्यात्म प्रगटीकरण करताना म्हणतात,
चुकलं चुकून काही, लगेच मागावी माफी
चुकलं कुणाचं काही, करून टाकावं माफ
बोलून टाकावं काही, खुपलेलं मनामनात
किल्मीष नकोच काही, आनंदी नातेसंबंधात...
मानवी मनाच आणि त्याच्या आनंदी, निरामय जीवनाचं सार इतक्या नेमकेपणे सांगणारे दुधाळ हे खरे संस्कृतीदूत आहेत. त्यांच्या लेखणीचा हा आविष्कार आपल्याला समृद्ध करतो.
या पुस्तकातील सर्वच लेख विचारप्रवर्तक आहेत. मात्र मला सर्वाधिक भावलेला लेख कोणता? तर, ‘नाही म्हणायला शिका!’ दुधाळांनी हा मंत्र दिला असला तरी हे काम नेमके मला कधीच जमत नाही. ‘नाही’ म्हणायला येत नसल्याने मी अनेक फटके सहन केलेत. अनेकदा उद्ध्वस्त झालोय आणि त्यातून पुन्हा पुन्हा सावरलोय. प्रांजळपणे आणि तटस्थपणे ‘नाही’ म्हणता आले असते तर मला हा ‘रिटेक‘ इतक्यावेळा द्यावा लागला नसता! पण स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. दुधाळांचा हा लेख वाचून मात्र मला आता स्वतःत काही बदल निश्‍चितपणे करावेत असे गंभीरपणे वाटू लागले आहे आणि हेच दुधाळांच्या लेखणीचे यश आहे. ‘प्रस्तावनाकाराचे’ विचार जो लेखक बदलू शकतो तो वाचकांच्या मनावर गारूड घातल्याशिवाय थोडेच राहील?
‘विचारांचा गुंता’, ‘ओळख स्वतःची‘, ‘कौतुक‘, ‘आयुष्यातील चिडचिड’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’, ‘अपेक्षा’, ‘आनंदी जीवन’, ‘संवेदनशीलता’, ‘माणसाची जडणघडण’, ‘मोठ्या मनाची माणसं’, ‘अहंकार’, ‘कृतज्ञता एक जादू’, ‘मनःशांतीसाठी’, ‘व्यसनाधीन’, ‘ताणतणाव’ हे लेखही वाचनीय आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘सुसंवाद-यशस्वी विवाहाचा पाया’ आणि ‘विवाह आणि जोडीदाराची निवड’ हे लेख तर आजच्या तरूण-तरूणींनी वाचायलाच हवेत. विवाहातून एक उत्तम सहजीवन फुलताना यशस्वी आणि आदर्श संसार कसा असावा हे त्यांनी नेमकेपणे सांगितले आहे. सध्या सर्वप्रकारच्या वैचारिक स्फोटांमुळे घटस्फोटांसारखे दुर्दैवी प्रमाण वाढले असताना दुधाळांचे शब्द त्यांना चार विधायक कानगोष्टी सांगतील.
एखादे लेखन वाचून माणूस घडतो असेही मला म्हणायचे नाही. घडण्या-बिघडण्यात आपल्यावरील संस्कार, आजुबाजूचे वातावरण, साथसंगत, परिस्थिती या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात! मात्र उमेद खचू नये, उत्साह वाढावा, एकमेकांविषयी प्रेम-आदरभाव वाढीस लागावेत, चांगुलपणाची शिकवण मिळावी यासाठी असे कसदार साहित्य वाचायला हवे. कसलाही अभिनिवेष न बाळगता किंवा ‘पंडिती’खाक्या न वापरता दुधाळांनी या लेखांची मांडणी केली आहे. त्यातून हे अर्थपूर्ण गुणात्मकदृष्ट्या अव्वल असणारे पुस्तक जन्मास आले आहे. आपण वाचावे, संग्रही ठेवावे, इतरांना भेट द्यावे असे हे पुस्तक आहे. त्याबद्दल प्रल्हाद दुधाळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि भावी साहित्य साधनेस शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092

Wednesday, January 11, 2017

युवा दिन ....एक विचार मंथन.

युवा दिन ....एक विचार मंथन.
आजचा युवक ....? एक सर्वसाधारण मत......दिशाहीन .....भरकटलेला...संवेदनशून्य....
खरच आहे का असे  .....साफ खोट आहे ते ....आहे तो जबाबदार..संवेदनशील!
....थोडाफार बिनधास्तही......मनात आलेलं ठोकून देणारा...उगाच भाडभीड नाही ठेवत तो!
त्याच्यासमोर उभी आहे.....अस्तित्वाची लढाई.....स्वत:ला सिद्ध करायचं त्याला!
.......दमछाक होतेय त्याची ....भयंकर शर्यतीत या अस्तित्वाच्या!
...त्याला निश्चित माहीत आहे ....जागतिकीकरणाच्या रेट्यात....मुक्त स्पर्धेच्या युगात  ........त्याला जीव घेऊन पळायलाच हवं....पर्यायच नाही ....कारण .... थांबला तो संपला!
त्याला आहे जाणीव ....पालकांनी त्याच्यासाठी केलेल्या कष्टाची...पाहिलेल्या स्वप्नांची....
...त्याच्यावर आलेल्या जबाबदारीची....तो पेलतोय ती .....पण ....तो दबून गेलाय ...
.....त्याच्यासमोर नाहीच प्रश्न ...स्वातंत्र्याचा ....अन्न वस्र निवाऱ्याचा......
...तुमच्यासमोरच्या   समस्या वेगळ्या होत्या ....त्याचे प्रश्न वेगळे आहेत ...काळाप्रमाणे ......त्याची लढाई आहे ....आहे ते टिकवण्याची .... अधिकाधिक मिळवण्याची.....हरवतोय तो .......लढताना ती ...कधी येतेय नैराश्य.....भावनाशुन्य तो दिसतोय कधी....सहनशक्ती कमी पडतेय!
....गोंधळ होतोय त्याचा,तोल सावरताना .......माणूसच शेवटी तो ....हाडामासाचा!
...पण निश्चितच तो, घेऊन आलाय ....प्रचंड उर्जा ....आधुनिक तंत्रज्ञान.....आयुष्याबद्दल व्हिजन!
...नाहीच तोलता येणार ते .........पारंपारिक तोकड्या तराजूत!.........तेव्हढा आवाकाच  असायला हवा....
.....नाहीच जोखता येणार त्याला....... पारंपारिक नजरेतून.......मन विशाल हव त्यासाठी!
....त्याच्या प्रचंड अपेक्षापर्यंत पोहोचण्यासाठी..... त्याच्या पंखांना बळ हवंय.......
...गरज असेल तेथे धीर,तर ........यशासाठी ... शाबासकीची थाप हवीय............
.....कधी पडलाच चुकून कमकुवत या लढाईत .....तर आधाराचा हात हवाय .....
.....पुन्हा नव्याने भरारीसाठी ........प्रोत्साहनाचा एक शब्द हवा........
....समजून घेवूया ....या प्रचंड उर्जा स्तोत्राला ..........आजच्या युवामनाला!
 .......एका नव्या नजरेने!
युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्या...
.......................................प्रल्हाद दुधाळ.

Sunday, January 1, 2017

संकल्प 2017

जानेवारीचा आज पहिला दिवस,2017 चे स्वागत करताना गेल्या वर्षी अनुभवलेल्या कडूगोड प्रसंगांची कितीही नको म्हटलं तरी मनात दाटी झालीय.काही अपवाद वगळता 2016 खूपच संस्मरणीय झालय.अनेक मित्र या वर्षी जोडले.अनेक आनंदी क्षण साजरे केले.मागच्या वर्षी या दिवशी मनाशी विचार  करत होतो सेवानिवृत्त व्हायला अजून साडेचार वर्षे आहेत;पण आज  त्यातलेही एक वर्ष कमी झाले.यापुढे साडेतीन वर्षानंतरच्या नियोजनाचा विचार करायला हवा.आजपर्यंतच्या आयुष्यात शून्यातून छोटेसे विश्व साकारताना मनातल्या अनेक आकांक्षांना मूरड घालावी लागली.कधी पैशाची तर कधी वेळेची गणिते जमली नाहीत.आता मात्र त्या राहून गेलेल्या गोष्टींची यादी करायला हवी असे मनापासून वाटायला लागले आहे.सामान्य जीवन जगणार्या माणसांचे बहूदा असेच होत असावे.जेव्हा प्रचंड वेळ आणि उत्साह असतो तेव्हा खिसा खाली असतो आणि आयुष्यात सगळ काही स्थिरस्थावर होईपर्यंत वयाचा एक असा टप्पा  पार केलेला असतो की हे आता आपण करू शकू का? ते आपल्याला  झेपेल का?या वयात काही पोरकटपणा केला तर कुणी आपली खिल्ली तर उडवणार नाही ना? "सब मनके खेल!"
   आपण तर ठरवलंय बुवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता मनात राहून गेलेल्या गोष्टी करून  टाकायच्या! अस नको व्हायला की "चने आहेत पण दात नाहीत" नाही का?
      ______ प्रल्हाद  दुधाळ.