Tuesday, December 27, 2016

तरुणाई.

तरुणाईला का झोडपता?
    माझ्या ऑफिसातल्या  बहुतेक मंडळीनी वयाची पन्नाशी पार केलेली आहे.काहींच्या पाल्यांचे शिक्षण चालू आहे तर काहींची मुले नोकरी धंद्यालाही लागली आहेत.दोनतीन जणांच्या मुलांचे तर दोनाचे चार हातही झाले आहेत.गप्पांमध्ये साहजिकच मुलाबाळांचा विषय असतो! मी एक गोष्ट कायम बघत आलो आहे की, अशा गप्पांमधे क्वचितच कुणी आपल्या मुलांबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलतो.बहुतेकजण मुलांच्या तक्रारींचा पाढाच जास्त करून वाचत असतात! या तक्रारींमध्ये साधारणपणे काही समान मुद्दे असतात.या लोकांचे म्हणणे असते -“आपल्या मुलांसाठी आपण कितीतरी खस्ता खाल्ल्या,आयुष्यात काटकसर केली,प्रसंगी हौसेमौजेला मुरड घालून मुलांसाठी काय काय केले याची यादीच मग वाचली जाते. सध्याची तरुण मुले-मुली कशी बेजबाबदार आहेत आणि यांच्या वयात आपण किती आणि कसे वडिलधाऱ्यांच्या धाकात रहायचो ,किती जबाबदारीने वागत होतो याचे दाखले देत आजची तरुणाई कशी स्वैर वागते याची सोदाहरण चर्चा होत रहाते”
     अशावेळी साधारणपणे एका बाबीवर या पालक मंडळींचे एकमत होत असते की, “सध्याच्या तरुणाईला विनाकष्ट सगळ्या सुखसोयी मिळाल्या आहेत.फारशी झळ न लागता व सहजासहजी सर्व हवे ते मिळाल्यामुळे या तरुण मुलांना पैसा आणि नातेसंबंध या दोन्हीचीही मुळीच किंमत नाही.”
थोडक्यात काय तर आजची तरुणाई काही अपवाद सोडले तर पार बिघडलेली आहे!
     जरा शांतपणे विचार करून बघा, खरच आजची तरुणाई एवढी बेजबाबदार आहे?
मला वाटते हे बरोबर नाही! आम्ही समजतोय तेवढी वाईट परिस्थिती नक्कीच नाही.आजचा तरुण वर्ग थोड्या मुक्त विचारांचा आहे तो वास्तव जगात वावरतो हे खरे असले तरी एवढ्यावरून तरुणाईला ‘स्वैर’,’बेजबाबदार’ किंवा ‘उध्दट’ अशी लेबले लावणे चुकीचे आहे .प्रचंड बुध्दिमत्ता,कल्पकता, तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता व अमर्यादित उर्जा असलेल्या आजच्या तरुणाईकडे गगनाला गवसणी घालण्याची क्षमता आहे हे कबूल करायलाच हवे.तरुणाईचे मूल्यमापन करताना आधीची पिढी चुकीचे मापदंड वापरते आहे असे मला वाटते. त्यातूनही काही प्रमाणात दोष तरुण पिढीत आहेत असे गृहीत धरले तर या दोषांसाठी कोण जबाबदार आहे ? मला असे वाटते की मुळात आजची पन्नाशीच्या पुढची पालक पिढी आणि आजची तरुणाई यांच्या जीवनाची तुलनाच होवू शकत नाही कारण या दोन पिढ्या संपूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या आहेत.तीस चाळीस वर्षापूर्वीची तरुणाई आज जी पालकांच्या भूमिकेत आहे त्यांच्या वेळची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्णत: भिन्न होती त्यावेळच्या समस्यांचे स्वरूप वेगळे होते आयुष्याच्या  प्राथमिकता वेगळ्या होत्या आजच्या तरुणांना ज्या गोष्टीना सामोरे जावे लागते आहे त्याचा त्या काळात मागमूसही नव्हता हे वास्तव प्रथम मान्य करायला हवे.त्या काळी शिक्षणाचा प्रसार आजच्या मानाने मर्यादित होता.आज सर्व क्षेत्रात पदोपदी जाणवणारी स्पर्धा त्या काळात फारशी नव्हती.माणसांच्या मुलभूत गरजा कमी होत्या आणि उपलब्ध साधनसामग्रीमधे त्या भागत होत्या.त्या वेळी एकत्र कुटुंबात कुटूंबप्रमुख सर्वासाठी निर्णय घ्यायचे आणि कुटुंबातील इत्तर सदस्यांवर शक्यतो त्या बाबतीतला ताण पडायचा नाही.आज नोकरी धंद्यानिमित्त झालेले स्थलांतर तसेच इत्तर अनेक कारणास्तव कुटुंबे छोटी झाली.हम दो हमारे दो चा जमाना मागे पडला आणि एकुलत्या एका अपत्यावर लोक समाधानाने राहू लागले.माणसे आत्मकेंद्रित झाली. चाळसंस्कृती अथवा वाडा संस्कृतीचा ऱ्हास झाला.घरे छोटी कुटूंब छोटे आणि मनेही संकुचित झाली ती याच काळात! आज पन्नाशी-साठीत असलेल्या मंडळीनीच या बदलाचा त्यावेळी अंगीकार केला.त्यावेळी थोडेफार शिकलेल्या व्यक्तीला सहज नोकरी मिळायची.सरकारी नोकऱ्या मुबलक उपलब्ध होत्या.पुढच्या  काळात  मनुष्यबळावर जी कामे व्हायची ती संगणकावर  होवू लागली आणि सुरक्षित नोकऱ्यांच्या संधी कमी कमी होत गेल्या.प्रचंड संख्येने  शिकून बाहेर पडलेल्या तरुणांना केवळ खाजगी नोकऱ्यांचा पर्याय समोर होता.उपलब्ध नोकऱ्या आणि प्रचंड इच्छुक यामुळे प्रचंड प्रमाणात स्पर्धा आली या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे तर आपले ज्ञान अद्यावत पाहिजे त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.आयटी व तत्सम नोकऱ्यांचे त्यामधील पगाराच्या आकर्षक आकड्यांमुळे आकर्षण वाढले. हातात प्रचंड पैसा आल्यामुळे आपोआपच राहणीमान सुधारले आणि हे राहणीमान त्याच स्तरावर टिकून ठेवण्यासाठी ’पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी जीवघेणी शर्यत सुरू झाली. धकाधकीच्या जीवनात ताण तणाव वाढले. तरुणाई या ताणाची पहिली शिकार झाली.विलक्षण  बुद्धीमत्ता लाभलेल्या या तरुणाईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पळावे लागते आहे.बारा ते पंधरा तास बौद्धिक स्वरूपाचे काम केल्यानंतर दमछाक तर होणारच.या स्पर्धेत आपल्या पाल्याचा  निभाव लागायला हवा म्हणून पालक मंडळीनीच फक्त मार्कांना महत्व दिले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा,त्याला मूल्याधिष्ठित संस्कार मिळायला हवेत या बाबींपेक्षा त्याला या रेससाठी तयार करण्याचे काम याच पालक मंडळीनी केले. या संस्कारात तयार झालेली आजची तरुणाई भरपूर शिकली, पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मुबलक पैसा कमवायलाही  लागली. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास केला केला म्हणूनच तुम्हाला अपेक्षित असे त्यांचे करिअर घडले.तुम्ही जसे त्यांना घडवले तसेच ते घडले मग आता ते बिघडले असे तुम्ही कसे काय म्हणू शकता?
     म्हणून मला वाटते की आजच्या तरुणाईला स्वत:च्या तराजूत तोलू नका त्यांना कोणताही दोष देण्यापूर्वी विचार करून पहा की आपण त्याची जोपासना करताना काय काय द्यायला विसरलो! एकुलता एक म्हणून त्याचे नको इतके लाड कुणी केले? आपल्याला लहानपणी मिळाली नव्हती असा विचार करून त्याने हट्ट केलेली प्रत्येक वस्तू कुणी घेवून दिली? अभ्यासात व्यत्यय नको म्हणून खेळायला किंवा त्याच्या आवडत्या छंदाला लगाम कोणी घातला? बिघडेल म्हणून आजूबाजूंच्या मुलांमध्ये जायला त्याला कोणी रोखले? आपल्याला मिळाला नव्हता म्हणून भरपूर पोकेटमनी त्याला कोणी दिला? तुम्हाला त्याला द्यायला वेळ नव्हता,त्याच्यासाठी सकस जेवण तयार करून द्यायला वेळ नव्हता म्हणून बाहेरचे खायला  त्याला कुणी सांगितले? सुट्टीत आजीआजोबा किंवा नातेवाईक यांच्यात सोडण्याऐवजी त्याला कुठल्यातरी संस्कार वर्गात/वेकेशन क्लासला घालायचा अट्टाहास कुणी केला?
    मान्य आहे की तुम्ही शून्यातून तुमचे विश्व साकारले.काडी काडी जमवून घरटे सजवले.कवडी कवडी काटकसर करून मुलांना शिकवले, स्वत:च्या पायावर उभे केलेत मग आता तुम्ही त्यांनी तुमच्यासारखे वागायला हवे,काटकसर करायला हवी अशी अपेक्षा का करताय? तुम्ही पंख दिलेत आता त्यांना त्यांच्या पद्धतीने उडू द्या की! तिथेही तुम्ही त्यांना अडथळा का ठरता? उलट भव्य भरारी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.त्यांच्या कर्तुत्वाला वाव द्या.चुकतील तेथे मार्गदर्शन करा पण असेच वाग म्हणून अट्टाहास करू नका. ही तरुणाई हुशार आहे, त्यांच्या हुशारीला दाद द्या आणि बघा आयुष्यातली सगळी आव्हाने ते किती लीलया पेलाताहेत!

      ................ प्रल्हाद दुधाळ. (९४२३०१२०२०)

Sunday, December 11, 2016

दौलतजादा .

पुर्वी गावाकडे नवरात्रात देवळासमोर लोककलावंत आपली हजेरी लावायला यायचे. त्या दहा दिवसाच्या उत्सवात तमाशा कलावंतही लोकांच्या मनोरंजनासाठी नाचगाणी करत असायचे. एक ढोलकीवाला, एक पेटीवादक व दोन तीन कलावतीणी असा हा ताफा असायचा .काही  शौकीन मंडळी तेथे नाचनाऱ्या व गाणाऱ्या त्या तमाशा कलावंतीना दौलतजादा करायचे. हे शौकीन हातात त्या काळी रुपया दोन रुपयांचे बंडल घेवून बसायचे. कलावंतीण नाचत आणि लावणी म्हणत त्या शौकीन धेंडासमोर यायची, तो एकावेळी एकच नोट तिच्या हातावर ठेवायचा ती नोट घेवून ती नाचत नाचत जावून पेटीवादकाच्या जवळ ठेवायची.पुन्हा गाणे  गात व नाचत त्या शौकिनासमोर जायची. तो आनखी एक नोट  तिच्या हातात सरकावायचा,परत ती नाचत नाचत पेटीवाल्याकडे यायचीत्या शौकीन माणसाकडील सगळ्या नोटा  संपेपर्यंत हा खेळ ( का छळ!) चालत रहायचा! मग दुसरा एखादा शौकीन हाच खेळ करत रहायचा! मध्यरात्रीपर्यंत त्या कलावंतीणीची पार दमछाक झालेली असायची! सध्या सामान्य  लोकांची अवस्था नेमकी त्या नाचगाणी करणाऱ्या कलावंतीणी सारखी झाली आहे. पळत पळत बॅंकेत  किंवा पैसे असतील त्या एटीएमवर जायचे दोन हजाराची नोट मिळवायची नाचवत नाचवत घरी न्यायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच तिकीटावर(डेबीटकार्ड  / क्रेडीटकार्ड/ चेकबूक) तोच खेळ!
गेला महिनाभर कधी नोट मिळतेय तर कधी रिकाम्या हाताने पळावे (नाचावे) तर लागतेच आहे! हो की नाही?
....... प्रल्हाद दुधाळ .

एका जिध्दीची कहाणी

  एका जिद्धीची गोष्ट...
       ही गोष्ट एकोणिसशे एकोण्णवदची आहे.माझ्या टेलिफोन इन्स्पेक्टर या पदावर झालेल्या  प्रमोशननंतर  मला मुंबईत बांद्रा येथे सहा महिन्याचे एक ट्रेनिंग पुर्ण करावे लागणार होते. खात्यातर्फे आमची  या ट्रेनिंगच्या काळात रहाण्याची सोय सहारा येथील खात्याच्या क्वार्टर्समधे केलेली होती.
  चार जणात आम्हाला दोन बेडरूमची एक क्वार्टर रहायला  दिलेली होती. मला ज्या क्वार्टरमधे जागा मिळाली होती  तेथे माझ्याबरोबर एक सिल्वराज नावाचा तामीळभाषीक व्यक्ती रहाणार होता. टिपिकल मद्रासी असलेल्या या सिल्वराजला फक्त  तामीळ भाषा  व काही प्रमाणात इंग्रजीशिवाय  कोणतीच भाषा येत नव्हती.
     सिल्वराजला हिंदी भाषेचा किंचितही गंध नव्हता त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे आम्हालाच काय; पण बांद्रा ट्रेनिंग सेंटरच्या इन्स्ट्रक्टर लोकांनाही अवघड जात होते.त्यात तो नेमका माझा रूममेट होता, त्यामुळे त्याला माझ्याशी आणि मला त्याच्याशी बोलणे अगदी  आवश्यकच  झाले होते!.
    तो त्याच्या त्या तामीळी हेलात व मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत मला सतत काहीतरी विचारत राहायचा आणि मी माझ्या मराठी स्टाईल इंग्रजीत त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचो!
    लवकरच अशा तोडक्या मोडक्या का होईना होणाऱ्या संवादामुळे आम्ही दोघे चांगले मित्र झालो.त्याला उत्तम तांत्रिक ज्ञान होते;पण भाषेची समस्या त्याला चांगलीच सतावत होती.त्याचे प्रमोशन हे महाराष्ट्र सर्कलच्या वेकन्सी साठी होते त्यामुळे ट्रेनिंग नंतर त्याला  महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात राहून काम करावे लागणार होते!
     याला मराठी वा हिंदी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात कसे काय काम करता येणार? तो पब्लिकशी कसा बोलेल? बोलताना काय काय मजेशीर प्रसंग घडतील? यावरून सगळे ट्रेनीज त्याची चेष्टा करायचे आणि खो खो हसायचे. त्याला आमची भाषाच समजत नसल्याने   केलेली मस्करीही त्याला समजायची नाही, आणि तोही आम्ही हसतोय ते पाहून काहीतरी जोक झाला असेल असं समजून हसायचा!
     एकदा ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला भर क्लासमधे येवून हिंदी येत नाही यावरून  भरपूर फायरिंग केले.ते त्याला चांगलेच फटकारत होते...
" इफ यू आर नॉट एबल टू  अंडरस्टॅन्ड लोकल लॅंग्वेज; देन हाऊ यू कॅन वर्क इन व्हिलेज? यू मस्ट लर्न हिंदी, ऑदरवाईज यू विल बी सेंट बॅक टू चेन्नई ऑन युवर ओरिजनल पोस्ट, यू विल नॉट गेट प्रमोशन!"
   हे फायरिंग सिल्वराजच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.त्या दिवशी  तो रात्रभर खूपच अस्वस्थ होता. सकाळी मी त्याला समजावले ..
" यू कॅन लर्न हिंदी इजिली, डोंट टेक टेंशन,व्हाटएव्हर आय कॅन डू फॉर यू,आय विल हेल्प यू फॉर द सेम !"
  मी दिलेल्या मानसिक आधाराने तो थोडा शांत झाला.
       दुसऱ्या दिवशी तो मला घेवून मुंबईच्या फोर्ट एरियात गेला.त्याने पुस्तकांच्या दुकानातून व फुटपाथवरून माझ्याशी सल्लामसलत करून हिंदीची अगदी प्रायमरी लेवलची व  देवनागरी लिपीच्या अक्षरओळखीपासूनची पुस्तके खरेदी केली.हिंदी अंकलिपी,इंग्रजी ते हिंदी दररोजच्या वापरातला शब्दकोश तसेच सोप्या सोप्या भाषांतराची तसेच चित्ररूप गोष्टींची अशा भरपूर पुस्तकाची खरेदी त्याने त्या दिवशी केली!
   दुसऱ्या दिवशी त्याने ट्रेनिंग क्लासमधे समोर जाऊन डिक्लेअर केले ...
" लिसन, आय टेल यू विथ चॅलेंज दॅट- आय विल स्पिक फ्ल्युएंट हिंदी विथिन ए मंथ!"
सगळा क्लास त्याच्या त्या चँलेंजने चिडीचूप झाला....
    आणि मग सिल्वराजने ट्रेनिंगचा अभ्यास सोडून रात्रंदिवस फक्त हिंदीच शिकायचा ध्यास घेतला. क्लासमधे भेटेल त्याला इंग्रजी शब्दांचे हिंदी प्रतिशब्द,त्या शब्दांचे वाक्यात उपयोग इत्यादी गोष्टी विचारत होता.जे काही समजेल ते आत्मसात करत होता.प्रश्न विचारून विचारून त्याने मला आणि बाकी रूम पार्टनर्सना अगदी भंडावून सोडले होते...
   खरं सांगतो ,त्याच्या त्या इंग्लिश टू हिंदी आणि हिंदी टू इंग्लिश कसरतीमुळे मलाही दोन्ही भाषांचा चांगलाच सराव झाला!
     पंधरावीस दिवसातच तो दिसेल त्याच्याशी मोडके तोडके हिंदी बोलू लागला.
     एकेकाळी हिंदीचा बिल्कूल गंध नसलेला सिल्वराज लवकरच चांगले हिंदी बोलू लागला, समजू लागला.त्याची ती जिध्द खरच वाखाणण्याजोगी होती!
    कमाल म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी  सिल्वराजने चक्क हिंदीतून आपले मनोगत व्यक्त केले!
   ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्या या प्रगतीचे खास कौतुक केले!
         पुढे त्याचे पोस्टींग गोव्यात झाले.पाचेक वर्षे तो महाराष्ट्र सर्कलमध्ये राहीला आणि पुढच्या प्रमोशनच्या वेळी तामिळनाडूला बदली घेवून गेला....
    त्याच्याशी पुढे संपर्क राहिला नाही;पण जिद्ध असेल तर माणसाला अशक्य काहीच नाही याचं जितंजागतं उदाहरण म्हणून सिल्व्हराज कायमचा लक्षात राहिला...
    ©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, December 8, 2016

एका फोटोचा किस्सा .

एका फोटोचा किस्सा ....
आज सकाळी सकाळी मोबाईलवर एक कॉल आला. अनोळखी नंबरवरून तो आला होता.
मी फोन घेतला " हॅलो"
" आपण प्रल्हाद दुधाळ बोलताय का?"
" हो आपण कोण?"
" मी xxx मासिकाचे जुने अंक चाळत होतो त्यात तुम्ही लिहिलेली " ठेविले अनंते" ही कथा वाचली. छान लिहिली आहे."
" धन्यवाद." मी आभार मानले.
" मला सांगा, ही काल्पनिक कथा आहे की खरचं घडलेली आहे?"
" मी शाळेत असताना अशी घटना घडली आहे त्यामुळे ती सत्यकथाच आहे पण थोडाफार मसाला लावून व स्थळ व नावे बदलून ती लिहिली आहे ." मी.
" खूप छान उत्कंठावर्धक कथा आहे तुमची! शेवट तर एकदम कलाटणी देणारा आहे. तो किर्तनकार दरोडेखोरांना सामील म्हणजे खरचं अध्यात्माला काळीमाच की!"
" धन्यवाद, आपण आवर्जून प्रतिक्रिया कळवलीत,खूप आनंद झाला, मी खूप आभारी आहे आपला."
" छानच आहे कथा,  बरं आता मला अजून एक सांगा, कथेच्या बाजूला तुम्ही फोटो छापला आहे तो तुम्ही कोठून घेतलाय?"
" कथेवर ना माझाच  फोटो आहे की ?"
" तो नाही हो, तो दुसरा फोटो म्हणतोय मी!"
" तो किर्तनकाराचा का? तो मी नाही दिलेला,कथेला साजेसा म्हणून संपादकानी निवडला असेल तो, किंवा  गूगलवरून घेतला असेल, का हो?"
" काही नाही, मी एक किर्तनकार आहे  आणि काही महिन्यांपुर्वी माझा बालगंधर्वमधे किर्तनाचा कार्यक्रम झाला होता , त्या वेळचा माझा फोटो आहे तो! थोडा अस्पष्ट करून तो घेतलाय त्यामुळे इत्तराना समजणार नाही पण माझा फोटो मी ओळखारच ना !"
एकंदरीत मोठाच  प्रॉब्लेम झाला होता.आता काहीतरी सारवासारव तर करायलाच हवी होती. मी थोडा दिलगिरीचा सुर लावला ...
" बाप रे, तो तुमचा फोटो आहे! तुम्ही हर्ट झाला असाल तर संपादकांच्या वतीने मी माफी मागतो, पण मला वाटते की त्यांचाही हेतू वाईट नसावा, कथेला पुरक म्हणून कीर्तनकाराचे  एक चित्र एवढाच त्या फोटोला अर्थ आहे शिवाय त्या फोटोतला चेहरा एकदम अस्पष्ट आहे ."
" नाही ते ठिक आहे. दिलगीरी नको , माझा फोटो कितीही अस्पष्ट असला तरी मला ओळखता येणारच ना ! फोटो  पाहून प्रथम मला वाटले की तुम्ही माझ्यावर लेख लिहिलाय,पण प्रत्यक्षात ही वेगळीच कथा निघाली! बाय द वे पुस्तक बिस्तक छापलय की नाही कथांच ?"
" दोन कविता संग्रह झालेत बघू भविष्यात कथासंग्रहही होईल!"
" तुम्हाला शुभेच्छा, बर झाल त्या निमित्ताने ओळख झाली, बाय द वे मी कीर्तनकार देव , सेव करून ठेवा नंबर"
" हो सर, धन्यवाद!"
यापुढे असा कुणाचा फोटो वापरायचा तर विचार करायला हवा !
 तो माणूस चांगला होता म्हणून ठिक,नाही तर ....

..... प्रल्हाद दुधाळ.