Friday, July 29, 2016

चिल्लर

मला  पुण्याच्या पी एम पी एल मधून फार क्वचित प्रवास करावा लागतो. काल तब्बेत बिघडल्यामुळे ऑफिसातुन लवकर निघालो. बस ने घरी जावे म्हणून बसस्टॉप ला आलो. माझे ऑफिस तसे ऑड ठिकाणी असल्याने तीन बसेस बदलून घरी जावे लागणार होते. साधारण दहा मिनिटात पुणे मनपा ची बस मिळाली. आत गेल्या गेल्या वाहक महाशयांनी आदेश दिला "सुट्टे पैसे काढा." मी खिशात चाचपले सुट्टे पैसे नव्हते. मी पन्नासची नोट दिली.
" सुट्टे द्या हो पाच रूपये!" तो खेकसला.
" पाच नाहीत "
माझ्याकडेही नाहीत!" पंचवीस रुपयाचे तिकिट व वीस रूपये त्याने माझ्या हातात कोंबले.पुढे गेला .
मला पुढच्या स्टॉपला बसायला जागा मिळाली. मी बसल्या बसल्या वाहकाकडे बघत होतो. तो प्रत्येकाला सुट्ट्या पैशासाठी ओरडत होता. अनेक  पॅसेंजर  त्याला  सुट्टे  पैसे देत होते  तो अशी आलेली चिल्लर पॅंटच्या मागच्या खिशात  टाकत होता. अशा प्रकारे त्याने निदान सतरा अठरा लोकांचे पाच पाच  रूपये  मागे ठेवले होते. कुणी जर पैसे मागितले की तो म्हणायचा " द्या सुट्टे पाच,आणि  दहाची नोट घ्या!"
पाच रूपयांसाठी कशाला वाद म्हणून बरेच पॅसेंजर आपला स्टॉप  आला की उतरून जात होते.
मी विचार करत होतो. पाच पाच रूपयांप्रमाणे दिवसभरामधे हा वाहक बरेच पैसे कमावत असेल, नाही का ? लोकानी तिकिटाचे  नेमके पैसे दिले तर असा प्रश्नच उद्भवला नसता, पण हल्ली ए टी एम मुळे चिल्लर फारशी दिसतच नाही.माझा स्टॉप जवळ आला तसे मी वाहकाला  पाच रूपये परत  देण्याबद्द्ल खुणावले. त्याने खुणेनेच तुम्हीच पाच द्या, मी दहा देतो खुणावले. मी उठून त्याच्या जवळ गेलो.
" अहो नाहीत पाच रूपये !" आता तो तोंडाने बोलला.
" बघा आले असतील की !" मी.
" अहो असते तर, कशाला ठेवले असते!"
" बर पाच रूपये तुमच्याकडे नाहीत ना, मग मला पाच रूपयाचे  एक तिकिट  द्या बर!" मी शांतपणे त्याला मार्ग सांगितला.
" काय , पाच रूपयाचे तिकिट देवू ?"
" हो , द्या पाच  रूपयाचे तिकिट, तेव्हढीच पी एम पी एल ला देणगी !"
' काय वेडा माणूस आहे ' अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहीले मशीनमधून पाच रूपयाचे तिकिट काढून माझ्या हातात दिले. आजूबाजूचे पॅसेंजर ' काय जिरवली ' असा भाव चेहऱ्यावर ठेवत हसत होते !
     ..... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, July 28, 2016

दिलको देखो ......

दिल को देखो ......
       कॉलेजात पहिल्या वर्षात शिकत होतो.आर्थिकदृष्ट्या होस्टेलमधे रहाणे अथवा जेवनासाठी  मेस लावणे मुळीच परवडणारे नव्हते.येरवडा भागात एका झोपडपट्टीत रहात होतो. त्या वस्तीत रहात असताना तेथे  अनेक मित्र कायमचे जोडले गेले. तेथेच माझी आणि सुरेशची ओळख झाली,पुढे  त्याच्याशी घनिष्ट मैत्री झाल्री .दिसायला एकदम गोरागोमटा, साडेपाच फूट उंची शिवाय आकर्षक  बोलणे यामुळे त्याची समोरच्या व्यक्तीवर  प्रथमदर्शनीच छाप पडायची! त्या भागातल्या नगरसेवकाची व याची चांगली ओळख होती त्यामुळे त्याचा  सामाजिक व राजकिय क्षेत्रातही राबता असायचा. आम्ही दोघे कॉलेजचा वेळ सोडून कायम बरोबरच असायचो.आमची मैत्री पुढे एवढी वाढली की आयुष्यातल्या अगदी खाजगी गोष्टीही तो माझ्याशी शेअर करू लागला. माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान असलेला सुरेश आय टी आय मधे कंपोझरचा कोर्स करत होता. तेथेच सुरेशला माया भेटली. सुरूवातीला गृपमधे डब्यातली भाजी शेअर करता करता या दोघांची चांगलीच गट्टी  जमली. तिची डायरी एकदा सुरेशने मला दाखवायला आणली होती. सुरेशने वर्णन केले होते त्यापेक्षा तिचे अक्षर कित्येक पटीने सुंदर होते. त्या डायरीत तिने लिहिलेल्या सुंदर कविता होत्या, मराठी व हिंदी शेरोशायरी होती, अनेक सुंदर स्केचेस होती. त्या डायरीत मी अक्षरश: हरवून गेलो होतो. सुरेशला एक संवेदनशील मैत्रीण लाभली होती. फावल्या वेळेत ते दोघे कुठे कुठे फिरत होते. सुरेशकडून मला त्यांच्या भटकंतीची बितंबातमी दररोज कळत होती.
- आज आम्ही चित्रकलेचे प्रदर्शन पाहिले.
- आज पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो.
- आज पांचाळेश्वर लेणी पाहीली
- पर्वतीवर गेलो होतो.
- सारसबागेत,बंडगार्डनमधे गेलो इत्यादी इत्यादी.
नंतर नंतर त्यांची रविवार व सुट्टीच्या दिवशीही भटकंती सुरू झाली दुसऱ्या दिवशी विचारले की वृतांत  मिळायचा. पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गड किल्ल्यांवर, कार्ले भाजे लेणी, मंदिरे पाहून झाली होती . तिने लिहिलेली नवीन कविता लगेच सुरेश आणून मला वाचायला द्यायचा. तिचे  उच्च विचार. तिचे सर्व क्षेत्रातले ज्ञान. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण, मुख्य म्हणजे कलासक्त वृत्ती यावर सुरेश भरभरून बोलायचा. एवढी चांगली मैत्रीण त्याला लाभली याचा मला हेवाही वाटायचा. आय टी आय चा दोन वर्षाचा कोर्स झाल्यावर सुरेश व ती दोघानीही एन सी टी व्ही टी या  कोर्स ला ॲडमिशन घेतले. सुरेश आणि माया आता एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. सुरेश रविवारीही घरी  थांबत नाही हे पाहून त्याच्या आईने मला त्याबद्दल विचारले पण त्याच्या कोर्स व त्याचे क्लास असे काहीबाही सांगून मी वेळ निभावून नेली.
  दरम्यानच्या काळात मी दुसरीकडे रहायला गेलो आणि सुरेशबरोबरच्या दररोज होणाऱ्या भेटी बंद झाल्या. कधीतरी तो मला माझ्या ऑफिसात भेटायला यायचा.माया व तो याशिवाय त्याच्या बोलण्यत दुसरा विषयच नसायचा . मी त्याची प्रेमकहाणी ऐकत रहायचो.
      एक दिवस मधल्या सुट्टीत आचार्य अत्रे सभागृहात ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तके चाळत होतोमाझ्या ऑफिसच्या अगदी शेजारीच हे सभागृह असल्यामुळे ग्रंथप्रदर्शन भरले की दररोज मी मधल्या सुट्टीत तेथे जायचो. तर, त्या दिवशी  अशीच पुस्तके चाळत असताना सुरेश मला दिसला. त्याच्या बरोबर एक मुलगी होती. सावळा म्हणता येणार नाही असा काळा रंग, जेमतेम पाचेक फूट उंची, तिचे डोळे मात्र बोलके होते. सुरेशच्या आकर्षक व्यक्तींत्वापुढे तीचे कुरूपपण अजुनच अधोरेखीत होत होते. आजुबाजूचे लोकही तिरक्या नजरेने या विजोड जोडीकडे बघत होते! मी सुरेशच्या समोर गेलो. त्याने मायाची ओळख करून दिली.
" सुरेशच्या तोंडी तुमचे नाव ऐकलय खूप वेळा!"
तिचा आवाज एकदम सुंदर होता! अगदी रेडिओवरील अनाउंसर बोलल्याचा भास झाला.
समोरच्या हॉटेलमध्ये त्या दोघाना चहाला घेवून गेलो. मायाची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झालेली होती त्या प्रतिमेला प्रत्यक्ष मायाच्या दर्शनाने छेद गेला होता!त्या दोघांना मात्र माझ्या मनात चाललेल्या विचारांची खबरबात असायचे कारण नव्हते!
     सुरेश आणि माया आपल्या भावविश्वात दंग होते. थोडावेळ गप्पा मारून ते दोघे निघून गेले. माझ्या मनातले विचारचक्र मात्र थांबले नव्हते. या  दोघांची ही प्रेमकहाणी सफल संपूर्ण होईल? माया मनाने अत्यंत सुंदर होती,सर्वगुणसंपन्न होती,पण फक्त मनाच्या सौंदर्यावरच यांचे प्रेम यशस्वी होईल का  हा नव्याने समोर आलेला गुंता मला चांगलाच छळू लागला. बाजूला कुठेतरी गाणे लागले होते....
" दिलको देखो, चेहरा ना देखो, चेहरा ना देखो, चेहरे ने लाखोंको लूटा,
दिल सच्चा और चेहरा झुटा, दिल सच्चा और चेहरा झुटा!"
मी मनोमन देवाजवळ प्रार्थना केली ....
" देवा यांचे प्रेम असेच बहरत राहू दे, जालिम जमान्याची त्याला नजर लागू देवू नको!"
          ....... प्रल्हाद दुधाळ .

Wednesday, July 27, 2016

समस्या.

समस्या.
  खूप दिवसांनी त्या भागात गेलो होतो.पूर्वी अगदी खेडेगाव असलेल्या गावाच्या माळरानावर एकापेक्षा एक बड्या बिल्डर्सचे गृहप्रकल्प उभे राहिले होते.गावातील मोकळ्या जमिनी विकून आलेल्या पैशांमुळे संपूर्ण गावाचा कायापालट झालेला दिसत होता. पूर्वी अगदी जुन्या घरांच्या जागी छोटी मोठी बंगलेवजा घरे उभी राहिली होती.घरांसमोर आलिशान मोटारी उभ्या होत्या.येथून तीनचार किलोमीटरवर हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले होते आणि तेथे काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सच्या बडया पैकेजेसनी ही कमाल केली होती.याच गावातल्या एका तशा दूरच्या नातेवाईकाकडे भगवानकडे जवळ जवळ सहा सात वर्षानंतर मी गेलो होतो.भगवानच्या साध्या घराचेही आता आलिशान बंगल्यात रूपांतर झाले होते. कोपऱ्या कोपऱ्यात नव्याने आलेली सुबत्ता दिसत होती.या कुटूंबात फारसे कुणी शिकले सवरलेले नव्हते.या भागाचे शहरीकरण जसे जसे होवू लागले,तसे जमिनीला भाव मिळू लागले,झालच तर बायकोला भरपूर सोने नाणे घेवून दिले होते,आपली श्रीमंती आल्यागेल्याच्या नजरेत भरेल, अशा प्रकारे या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जात होते.भगवान स्वत: व तरुण मुलगा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या व अंगठ्या घालून मिरवत होते. त्यानेही मोठ्या उत्साहात,त्याचे सगळे ऐश्वर्य मला दाखवले.त्याचे नवे  घर तसे हायवेला लागून होते.घराला लागून दोन एकरचा पट्टा अजून त्याने सांभाळून ठेवला होता.हायवे च्या कडेने त्याच्या जमिनीवर जाहिरात एजन्सीचे मोठे मोठे सहा फलक तेथे लावले होते.
       मी कुतूहलाने त्या फलकांबद्द्ल,त्यातून होणारे उत्पन्न, त्याची कराराची पद्धत याबद्दल त्याला विचारले. त्याने उत्साहात माहिती द्यायला सुरुवात केली.
“हो,या बोर्डाचे दोनेक लाख भाड्याचे मिळतात ना!” त्याने माहिती दिली.
“मग आता पोराचे लग्न करून टाकायचं की!” मी मजेत त्याला छेडलं.
“ लग्न करायचं हो,पण कुठ जुळतच नाही ना!”
मला प्रश्न पडला. एवढ्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे लग्न जुळायला खर तर कसलीच अडचण यायला नको,पण हा तर म्हणतो जुळत नाही!
“का? न जुळायला काय झाल? मुलगा दिसायला चांगला आहे,पैसा आडका आहे मग अजून काय पाहिजे?”
“अहो तीच तर समस्या आहे, आजकाल नुसत्या पैशाला कोण विचारतो?आता पुर्वीसारख कुणी राह्यलय का? भरपूर पोरी पाह्यल्या पण कुणी हो म्हणेल तर शप्पथ!”
“ चुकून एखादी मुलगी पसंत पडली की समोरची पार्टी विचारते, पोरगा किती  शिकलाय? तो काय काम करतो? आम्ही सांगतो- आता खर सांगायचं तर पोरग चवथीपर्यंत शिकलय, आणि एवढा पैसा आहे काय करायचं शिक्षण आणि नोकरी!”
आम्ही सांगून पाह्यल, “पोराला दोन लाख रुपये कमाई आहे त्याला काम करायची काय गरजच नाही! समोरची पार्टी विचार करून सांगतो म्हणते आणि पुढे काय बोलतच नाही हो!”
“काही जण तोंडावर बोलतात,ही श्रीमंती बापजाद्यांची जमीन विकून आलीये,पोराच कर्तुत्व काय आहे? गप्प बसाया लागतंय बघा!” त्याने आपली व्यथा मोकळेपणी सांगितली.
मी  विचारात पडलो लोकांचे काय चुकीचे आहे.शहरांच्या आजूबाजूच्या गावात अशी हजारो कुटुंबे नक्की असतील ज्यांना या समस्येला सामोरे जावे लागत असेल.तात्पुरता आलेला पैसा चैनीत आणि ऐशोआरामात खर्च झाल्यावर या लोकांचे भवितव्य काय? आत्ताच अनेक अशा गावातले शेतकरी आपल्या जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.आपण विकलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग सोसायटीच्या गेटवर वाचमनगिरी करत आहेत.घरातली बायकामाणसे धुण्याभांड्याची कामे करून आपली गुजराण करत आहेत! या भगवानचे तरी असे काही होवू नये असे मला मनोमन वाटत होते!
“बघा की एखादी पोरगी पहाण्यात असली तर!, आपल्याला हुंडाबिंडा काही नको,फक्त आम्हाला शोभल असं झोकात लग्न करून दिले की बास!”
समोरचा चहा संपवत मी म्हणालो –
“ हो  नक्की बघतो की!”
मी काढता पाय घेतला!

      ------- प्रल्हाद  दुधाळ.

Tuesday, July 26, 2016

राग.

                   राग.
                मला पूर्वी प्रचंड राग यायचा,पण तो राग शक्यतो व्यक्त होवू नये याची मी काळजी घ्यायचो.खूप वेळा असा आलेला राग मी गप्प गिळायचो! विसेक वर्षापूर्वीपर्यंत अगदीच टोकाची राग येणारी घटना घडलेली असेल, आणि समोरच्याचे वागणे तेवढेच अन्याय्य असेल,तर मागचा पुढचा विचार न करता समोरच्याला "योग्य" भाषेत वाजवायची तयारी असायची! मुळात ग्रामीण भागात बालपण गेल्याने हे रांगडेपण वागण्यात होते, अशा वेळी.समोरचा माणूस माझ्या किरकोळ तब्बेतीपेक्षा धिप्पाड असला, तब्बेतीने कितीही चांगला असला तरी त्याला गावरान भाषेत उत्तर द्यायचो.अजून एक, जर मी अशावेळी उपाशी असलो,की मग विचारायला नको, हा राग दुप्पट वेगात यायचा! शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरात आलो पोटभर सकस खायला लागलो भरपूर सकस वाचायला लागलो, अनेक चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो शिवाय माझा मूळ स्वभाव शांत असल्याने पुढे वयाच्या तिशी पस्तीशीनंतर मात्र प्रत्येक सिच्युएशनचे विश्लेषण करण्याची सवय वाढली.एक प्रकारची परिपक्वता आली आणि नकळत ती वागण्या बोलण्यात दिसायला लागली. आता आयुष्यात छपन्न पावसाळे पाहून झालेत जीवनातले अनेक चढ उतार अनुभवून झालेत एक प्रकारचे स्थैर्य आल्यामुळे असेल पण रागावर चांगलेच नियंत्रण आले आहे! आता जरी थोडीफार सटकली तरी समोरच्याच्या भूमिकेत जावून पहातो व आपोआपच राग आवरला जातो!
एक लक्षात आलय----
आपणच आपल जगण अवघड करत असतो,
 पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
तो 'तसा ' ती ' तशी' उगाचच बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचंदा भुइलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट,करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो, जगण अवघड करत असतो!

------प्रल्हाद दुधाळ.

Monday, July 25, 2016

पुस्तके आणि मी.

वाचले म्हणून वाचलो!   

वाचले म्हणून वाचलो!   

   वय वर्षे सहा झाल्यावर मी माझ्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जायला लागलो आणि पाटीपेन्सिलच्या माध्यमातून पहिल्यांदा अक्षर ओळख झाली.
लिहावाचायला शिकलो तेंव्हापासून ते आजतागायत टप्प्याटप्प्याने माझी शब्दांशी दोस्ती वाढतच गेली.अगदी सुरुवातीला दुकानातून वाणसामान बांधून आलेल्या कागदावर एक एक शब्द जुळवत वाचायला लागलो आणि मग वाचायचा चाळाच लागला! जेथे कुठे मराठीत काही लिहिलेले आढळेल ते शब्द जुळवून वाचायचा छंदच जडला!साधारण तिसरी चौथीत असताना कुणीतरी रद्दीत फेकून दिलेले ‘चांदोबा’ मासिक हातात मिळाले आणि त्याच्या वाचनात हरवून गेलो.त्यातली विक्रम वेताळाची,परोपकारी गंपूची गोष्ट पुन्हा पुन्हा वाचत रहायचो. माझे गाव आडवळणी खेडेगाव असल्याने त्याकाळी  इत्तर काही वाचायला मिळणे अगदीच दुरापास्त होते, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकेच पुन्हा पुन्हा वाचत रहायचो त्यामुळे शाळेत वेगळा अभ्यास करायची कधी गरजच पडायची नाही! हा वाचनाचा छंद(व्यसन म्हणा हवं तर!) असा काही जडला की, हातात येईल ते अधाशासारखे वाचून काढायचो.गावात लायब्ररी वगैरे असायचा प्रश्नच नव्हता, गावात एक दोन घरी ’सकाळ’ यायचा पण त्याचे लांबूनच दर्शन व्हायचे! त्यामुळे अर्थातच वाचनाच्या आवडीवर मर्यादा पडायच्या. हातात येईल ते वाचायच्या या सवयीमुळे चांगले सकस साहित्य वाचलेच,पण हातात आले म्हणून त्या वयात वाचायला नको असे पिवळ्या वेष्टनात येणारे साहित्यही (त्यातले कळत नव्हते तरी!) मी वाचले! आता सांगायला काहीच हरकत नाही,पण सातवीत असताना हातात मिळालेले “नवविवाहितांचा वाटाडया” असे शीर्षक असलेले पुस्तकही वाचले होते! याशिवाय कुठेतरी मिळालेली काकोडकरांची, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकेही मी मन लावून वाचली.आठवीनंतर हायस्कूलमध्ये शिकायला गेलो.शाळेची लायब्ररी होती पण तेथे कथा कादंबऱ्या फारशा नव्हत्या.मला इंग्रजी शिकवायला विद्यासागर नावाचे शिक्षक होते त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा बराच खजिना होता माझी वाचनाची आवड त्यांना माहीत झाल्यानंतर ते मला सुट्टीत वाचायला एखादे पुस्तक हमखास द्यायचे. दरम्यानच्या काळात माझ्यापेक्षा दोन वर्ग पुढे असणारा माझा एक चुलत चुलत भाऊ मुंबईहून शिक्षणासाठी गावी आला.त्यालाही  वाचनाची प्रचंड आवड होती शिवाय त्या काळी माझ्यासाठी दुर्मिळ असणारी वि.स.खांडेकर,शिवाजी सावंत,रणजीत देसाई,अत्रे,पुलं,सुहास शिरवळकर  इत्यादी प्रसिध्द लेखकांची अनेक पुस्तके त्याच्याकडे होती.त्याने हा सगळा खजिना मला उपलब्ध करून दिला आणि मी अक्षरश: तहानभूक विसरून वाचायला लागलो.त्याच्याकडची सगळी पुस्तके अधाशासारखी वाचून काढली!
   या वाचनामुळे माझ्यावर नकळत चांगले संस्कार होत गेले.ईश्वरी आशिर्वाद होते त्यामुळे मुळातच प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायची आंतरिक सवय होती,चांगल्या वाईटातला फरक करता यायचा,त्यामुळे जरी वाईट काही वाचले तरी त्याचा आयुष्यावर दुष्परिणाम झाला नाही ही केवळ ईश्वरी कृपाच होती असे मी मानतो... 
    दहावीपर्यंत घरीच होतो त्यामुळे आईचे चांगले संस्कार व वचकही होता,पण पुढे एकटा घराबाहेर राहायला लागल्यावर कोणाचाही धाक नव्हता.त्या वयात वाईट संगतीचा परिणाम होणे अगदी सहज शक्य होते,परंतु सतत पुस्तकांच्या संगतीत असल्यामूळे अशा बिघडण्यापासून वाचलो! शाळेत असताना दारू,गांजा अशी चौफेर व्यसने असलेली,नकळत्या वयात नको ती लफडीकुलंगडी करणारी अनेक मुले आजूबाजूला होती.पुढे कॉलेजला असताना किंबहुना नोकरीला लागल्यानंतरही काही वर्षे  पुण्यातल्या  येरवडा भागात, झोपडपट्टीत राहिलो.अनेक मित्राना विविध व्यसने होती,पण झालेल्या वाचनसंस्कारामुळे त्या वाईट सवयीं आत्मसात करायचा मोह कधीच झाला नाही!
    चांगले संस्कार करायला जवळ कुणी वडीलधारे नव्हते,पण जीवनातली ही कसर पुस्तकांनी भरून काढली.वाचनाच्या नादात बऱ्याचदा स्वयंपाकच करायचा राहून जायचा(हाताने भाजी भाकरी बनवून खायचो) आणि मग उपाशीच रहायला लागायचं,वाचनाने मी अक्षरशः झपाटलेला होतो!

 त्या झोपडपट्टीत हौस म्हणून मी एका गणेशोत्सव मंडळातर्फे जुन्या पुस्तकांची लायब्ररी सुट्टीच्या दिवशी मी सुरू केलि व बरेच दिवस चालवली.पुढे टेलिफोन खात्यात नोकरीला लागल्यावर ऑफिसमध्ये असलेल्या रिक्रिएशन क्लबच्या लायब्ररीमधल्या पुस्तकांचा खजिना हाती आला आणि माझ्या वाचनाचा झपाटा अजूनच वाढला.दरवर्षी नवी पुस्तके खरेदी करताना क्लबचे लोक मला पुस्तके निवडायला नेवू लागले त्यामुळे त्या काळी गाजत असलेल्या लेखकांची एकूणएक पुस्तके निवडून मी वाचून काढली.नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत पुस्तके विकत घेणे अथवा खाजगी लायब्ररी लावणे परवडणारे नव्हते, पण गेले तीस वर्षे मी नियमित लायब्ररी लावली आहे. वीसेक वर्षापासून माझ्याकडे घरपोच लायब्ररी लावली  आहे. आठवड्याला माझ्या आवडीची चार पुस्तके/मासिके त्या लायब्ररीतून मिळतात.ऑफिसच्या लायब्ररीतली पुस्तकेही असतातच.गेली सात आठ वर्षे नियमितपणे आवडलेली पुस्तके विकत घेवून वाचतो.घरी दोनशेच्यावर पुस्तकांचा संग्रह तयार झाला आहे.कुणाच्याही वाढदिवसाला गिफ्ट म्हणून इत्तर काही देण्याऐवजी योग्य असे पुस्तक द्यायला मला आवडते.तशी तर सगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात,पण त्यातल्या त्यात गाजलेल्या मोठ्या लोकांची आत्मचरित्रे तसेच मानसशास्रावर आधारीत लेख, कथा, कादंबऱ्या व वैचारिक लेखन वाचायला विशेष आवडते.अशिक्षित अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मी अत्यंत प्रतिकूल वातावरणात राहून स्वत:ची वैचारिक अध्यात्मिक आर्थिक व सामाजिक प्रगती साधू शकलो ते केवळ सकस वाचनाच्या जोरावर! ग्रंथ हेच माझे खरे गुरू होते आणि आहेत!

   मराठी साहित्याच्या त्या प्रचंड ज्ञानसागरातले माझ्या हाताला लागले तेव्हढेच अल्पसे कदाचित मी वाचले असेल, पण ही एक अखंड साधना आहे आणि ती चालूच राहील!

खरंच भरपूर वाचले म्हणून अनेक प्रसंगी मी वाचलो!   

पुस्तकांमुळेच झाला .....कायापालट -
अक्षरशत्रू समाजात
दोन घास मिळण्याची जेथे भ्रांत
गावंढ्या आडवळणी गावात
शिकून कुणाच भलं झाल्याची
गंधवार्ताही नसलेल्या माणसांत
जन्म घेतलेला मी .....
दारिद्र्याचा कलंक कपाळी
वर्षानुवर्षे अश्वथाम्याच्या जखमेसारखा!
पण हे सगळे .....
तुला भेटण्याच्याआधी.....
अपघातानेच  झाली अक्षरओळख.....
त्यानंतर तू  भेटलास ...
भेटत राहीलास ...
तुझ्या सहवासाची चटकच लागली
तहानभूक विसरून तुझ्यात रमू लागलो
तुझ्यामुळेच ज्ञानभांडार झाले खुले
एकामागोमाग एक ....
 ......तुला वाचत राहीलो
......लालसा ज्ञानाची भागवत राहीलो
तुझ्यामुळेच प्रगतीचा रस्ता दिसला
चालत राहीलो तुझ्या साथीने
आयुष्यात एक एक पायरी चढत राहीलो
हे असच चालत राहील ...
अविरतपणे!
 ............ प्रल्हाद  दुधाळ. 
 5/9 रुणवाल पार्क मा.यार्ड पुणे ३७.

          (९४२३०१२०२०)

Friday, July 22, 2016

दुकानदारी.

                                     दुकानदारी.

   साताठ वर्षापूर्वी मी शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी माझ्या मेव्हण्याच्या स्टेशनरी दुकानात जावून बसायचो. गिऱ्हाइकांची गर्दी वाढली तर मी त्याला मदतही करायचो.हळूहळू मला या दुकानातल्या वस्तू, त्यांच्या किमती,होलसेल मार्केट या धंद्यातले मार्जिन इत्यादीबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली. आपणही धंदा करू शकू असे वाटायला लागले! कधी मेव्हण्याला दुसरे काही काम असेल तर मी त्याला सुट्टी द्यायला लागलो.अशावेळी संपूर्ण दुकान सांभाळण्यापर्यंत माझा  आत्मविश्वास वाढला होता.तर अशाच एका रविवारी मी दुकान उघडले व दुपारपर्यंत व्यवस्थित दुकान चालवले.तो शाळा कॉलेजेसचा दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम होता, त्यामुळे स्टेशनरीला तशीही फारशी मागणी नव्हती. निवांत बसलो असताना साधारणपणे तिसरी चौथीच्या वर्गात असावीत अशी दोन मुले दुकानात आली. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले.नेहमीचे काका दुकानात नाहीत हे पाहून एकाने विचारले.
“ते दररोज असतात ते काका नाहीत का आज?”
“का ,काही काम होत का त्यांच्याकडे?”
“नाही,असंच विचारलं,दिसले नाही म्हणून!”
दुसऱ्याने विचारले-
“काका, व्हाईटनर  आहे का हो?”
“हो आहे की, पंधरा रुपये.”
“दाखवा की”
मी त्याला पंधरा रुपये किमतीचे व्हाईटनर दाखवले.
“हे नाही हो दोन बाटल्यावाले व्हाईटनर पाहिजे.”
मी आतून मोठे व्हाईटनर काढून दाखवले.त्याने ते हातात घेवून दोन्ही बाटल्या आहेत का पाहून घेतले.
“कितीला आहे?”
मी खोक्यावर किंमत बघून सांगितले-
“बावीस रुपये!”
“काय कमी नाही का, काका.”
“नाही रे बाबा,ते दुकानवाले काका रागावतील ना?”
त्याने खिशातल्या पैशाचा अंदाज घेतला.
“बर काका,दोन मोठे व्हाईटनर द्या!”
मी त्याच्याकडून पन्नासची नोट घेतली.वरचे सहा रुपये आणि दोन बाटल्या त्याच्या हवाली केल्या. दोन्ही मुले उड्या मारत निघून गेली.
अर्धा तास झाला असेल नसेल साधारण त्याच वयाचा एक मुलगा आला.
“काका, व्हाईटनर आहे का हो?”
“हो आहे की, मोठा का छोटा?”
“मोठ्या तीन बाटल्या द्या!”
त्याने मोजून सहासष्ट रुपये आणले होते.
मी त्याला तीन बाटल्या काढून दिल्या.तो निघून गेला.
पंधरा वीस मिनिटानंतर  अजून एक थोडा मोठा मुलगा आला.त्याने चार बाटल्या व्हाईटनर मागितले. मी कुतुहलाने त्याला विचारले.
“एवढे व्हाईटनर कशाला लागतंय रे.”
“काका,अहो त्या पलीकडच्या रस्त्यावर प्रिंटींग प्रेस आहे तेथे लागतंय!”
मी त्याला चार बाटल्या व्हाईटनर काढून दिले.
दुकान दुपारी बंद होईपर्यंत अजून सहा बाटल्या व्हाईटनर विकले गेले!
सुट्ट्यांचा  सिझन असूनही गल्ल्यात या व्हाईटनर विक्रीमुळे बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते त्यामुळे आपला रविवार कामाला आला याचे वेगळे समाधान वाटत होते.दुकान बंद करून मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसला गेलो. दुपारी मेहुण्याचा फोन आला.
“ अहो त्या कपाटात व्हाईटनर होते ते सगळे विकले का?”
“हो सगळ्या बाटल्या विकल्या की!” मी थोड्या फुशारकीतच सांगितले!
“छोटी मुले आली होती का घ्यायला?”
“हो,अरे तीन चार मुलेच आली होती.त्यांनाच विकले की! का? काय झाले?”
“अहो,त्या पोरांना नाही द्यायचे व्हाईटनर!”
“का नाही द्यायचे?” माझा इनोसंट प्रश्न!
“अहो ही मुले या व्हाईटनरच्या बाटलीत एक थिनरची बाटली असते ना ते पिवून नशा करतात! मी अशा लहान मुलांना अजिबात व्हाईटनर विकत नाही, सरळ नाही म्हणून सांगतो,मी दुकानात नाही याचा बरोबर फायदा घेतला कारट्यांनी!”
माझा मेहुणा हळहळत होता!
मी फोन बंद केला.
बापरे, म्हणजे मी नकळत का होईना,या पोरांच्या नशापानाला मदत केली होती!
माझी दुकानदारी केल्याची मिजास ताबडतोब उतरली!
                                                     ........ प्रल्हाद दुधाळ.






Wednesday, July 6, 2016

मोबाईलची घाई नको ग बाई

मोबाईलची घाई नको ग बाई ....
      मागच्या आठवड्यात एका दुकानासमोर उभा होतो.एक काका दुकानदाराला आपल्या मुलाबद्दल सांगत होते-

"माझा  मुलगा फक्त चार वर्षांचा आहे  पण फारच हुशार आहे बर का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो.फोटोसुध्दा काढतो, एवढेच काय मोबाईल मधले  सैराटचे “झिंगाट” गाणे सुध्दा त्याला  लावता येते! काय नाचतो तो त्या गाण्यावर ,एकदम झिंगाट !"
मोबाईलबाबत आपल्या पाल्याचे असे कौतुक अनेक पालक अगदी  उत्साहात करत असतात.आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल किंवा कॉंप्युटर वा लॅपटॉप अगदी लहान वयातही सफाईदारपणे वापरू शकतो याचा आजकालच्या पालकांना नको इतका अभिमान वाटत असतो! ते काका सांगत होते ते बरोबरच होते.आजच्या काळात अगदी  लहान वयातही  नव्या तंत्रज्ञानाविषयी मुलांना खूप समज आहे.अनेक पालक आपल्या  पाल्याला आवर्जून या वस्तू घेवून देतात! पण खरच अशा लहान वयात मुलांच्या हातात असा आधुनिक सुविधा असलेला मोबाईल देणे बरोबर आहे का? मोबाईल हे साधन माहितीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरलेले असले तरी लहान मुलावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहेत. ज्या वयात मुलांनी विविध संस्कारक्षम गोष्टी, कथा ऐकायच्या,अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे आपल्या भविष्यातील आयुष्याचा पाया पक्का करायचा त्या वयात मुले चित्रपटांमधील उडती गाणी ऐकताना-पाहताना दिसतात.गेम खेळताना दिसतात.मुलांना एक वेळ कविता पाठ नसतील; पण चित्रपटांची गाणी तोंडपाठ असतात. मोबाईलवर ही गाणी सातत्याने ऐकल्यामुळेच हे घडते.मोबाईल वापरामुळे मुलांच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच पण त्यांच्या आरोग्यावर व एकंदरीत व्यक्तिमत्वावर अत्यंत दुरगामी वाईट परिणाम होवू शकतात हे पालकांना कळायला हवे. मोबाईलचे डोळ्यांना दिसणाऱ्या या दुष्परिणामाशिवाय इत्तर अनेक वाईट परिणाम आहेत.
 मोबाईल फोनचे धोके : तुम्ही सिगारेट, तंबाखूची जाहिरात पाहिलीत का? त्यावर स्पष्ट लिहिले आहे की, ‘सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सर होतो.’ तशीच आता मोबाइल वापरणार्‍यांसाठीही सुचना देण्याची वेळ आली आहे, एवढे मोबाईलचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत आणि वयाच्या सोळा वर्षापर्यंत हे दुष्परिणाम दुप्पट वेगाने घातक आहेत!   मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा शरीरावर  खूपच वाईट परिणाम होतो  या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत.अनेक रिसर्च प्रोजेक्ट यावर कसून संशोधन करीत आहेत व त्याची माहिती जगासमोर ठेवत आहेत. धोक्याच्या इशार्‍याची घंटा वाजवत आहेत. लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी,टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावरही  वाईट परिणाम होतो.
  फिनलॅँड रेडिएशन अ‍ॅँड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटीच्या अहवालानुसार मोबाईल अतिवापरामुळे मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकसून जात आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते व ते पेशी खराबीचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणार्‍या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्णतापमान वाढते व लोकल ब्लडफ्लो वाढतो. त्यामुळे अ‍ॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो. मोटोरोला कंपनीने सांगितले की रेडिएशन जास्त प्रमाणात की पॅड व माउथ पीसमधून पाझरत असते. हेच रेडिएशन मेंदूपेशींमध्ये जबरदस्तीने घुसतात. डोळे, कान या पेशीत शिरतात. डोळे व कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूकपेशी असतात. मायक्रोव्हेवना अत्यंत संवेदनशील असतात.लहान मुलांच्यात तर त्याचा भयानक परिणाम होतो. उत्सर्जक किरणे लिव्हर, मूत्रपिंडाकडे जातात.छातीजवळ, खिशात किंवा पॅँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलमधील  किरण उत्सर्जनामुळे अवयव खराब होतात. ज्या कानाला मोबाइल ठेवता त्या बाजूला ट्यूमर होण्याचा धोका खूप आहे.
रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित : रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित होते. पेशीची कार्यक्षमता कमी होते.त्याशिवाय थकवा, गळावट, झोपेतील अनियमितता, लक्ष न लागणे, एकाग्रतेचा अभाव, पटकन प्रतिक्रया न निर्माण होणे,डोकदुखी, बैचनी, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.
स्मरणशक्ती कमी होते : स्पॅनिश शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडपणा, मूड बदलणे वाढते व ते डिप्रेशनकडे जातात. त्यांची वागणूक व शिकण्याची क्षमता मंदावते, कमी होते. त्यामुळे  खोडकर, हट्टी मुलांना मोबाइल देताना पालकांनी काळजी घ्यावी. जी मुले सातव्या महिन्यात जन्मलेली आहेत, त्यांना बालपणात व नंतर मोबाइल देताना पालकांनी जास्त काळजी घ्यावी.

तर अशा प्रकारे मोबाईल लहान मुलांसाठी घातक तर आहेच पण मोठया माणसांसाठीसुध्दा याचा अतिवापर धोक्याचा आहे. त्यामुळे -----

वाटला जरी जरूरी वापरावा तो जपून

वेड त्याच लागल की,अभ्यासाचं खर नाही....

व्हिडीओ गाणी गेम सिनेमा वाटे जरी भारी  

बालपणी मोबाईलची घाई नको ग बाई....
      --्--- प्रल्हाद  दुधाळ
   (नातवाला लिहून दिलेला निबंध)

Sunday, July 3, 2016

आठवणीतला एक पाऊस

आयुष्यात अक्षरशः छपन्न  पावसाळे पाहीले आहेत! कारण माझे वय  छपन्न  वर्षे आहे! आठवणीतले पावसाळे आणि पावसाच्या भरपूर आठवणी आहेत. एक आठवण मात्र अशी आहे  ती आठवली की मी माझ्यावरच हसतो. मी अकरावीला लोणंद  जि सातारा येथे शिकत होतोआता ऐकायला जरा वेगळे वाटेल पण हे खरे आहे की मी चारेक वर्षाचा असताना पोहायला शिकलो होतो पण सायकल चालवायला मात्र अकरावीत असताना म्हणजे सतराव्या वर्षी शिकलो! तर झाले काय की मी भाड्याने सायकल घेवून तेथून पाचेक किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर बहीण रहायची तिच्याकडे निघालो होतो . जून ची सुरूवात होती, तसे पावसाचे चिन्ह  दिसत नव्हते . तो रस्ता म्हणजे जेमतेम पायवाटच होती. मी नुकताच सायकल चालवायला शिकलो होतो त्यामुळे बिचकत बिचकत चाललो होतो. जेमतेम दोनेक किलोमीटर गेलो असेल,जोरदार वारा सुटला आणि पाठोपाठ टप्पोर्या थेंबांचा वादळी पाऊस सुरू झाला! आजूबाजूला अजिबात वस्ती नव्हती. मी हातात सायकल धरून चालायला लागलो, वरून पाऊस झोडपत होता. अचानक जोरात वारा आला आणि माझ्या हातातली सायकल वाऱ्याने लांब जावून पडली! .मी पळत जावून सायकल पकडली ,उभी केली, पुन्हा जोरात वादळ आले पुन्हा सायकल लांब बांधाच्या पलिकडे पडली. मी सायकल उचलून वाटेवर आणायचो,परत ती हवेने लांब जावून पडायची असे पाच सहा वेळा झाले! वरून पावसाच्या धारांचा मार बसत होता .दोन तीन वेळा मी सुध्दा धडपडलो!हाताचे कोपरे व घुडगे चांगलेच सोलपटले  होते! ही झटापट चांगली अर्धा तास चालली होती !हा वळवाचा पावूस आला तसा अचानक गेला, पुन्हा लख्ख उन पडले . मी कसाबसा सायकल हातात धरून वस्तीपर्यंत पोहोचलो. तिथे पावसाचा टिप्पुस नव्हता! त्या अर्ध्या तासात माझी  जी त्रेधातिरपीट झाली  ती बघायला कुणीच  नव्हते त्यामुळे हायापायाला काय लागले  ते सागणेही  अवघड झाले होते . ही घटना आठवली की मला  हसू  येते !
.....प्रल्हाद दुधाळ