Thursday, August 13, 2015

ओळख ....एक संकट!

ओळख ....एक संकट!
कुणीतरी म्हणाले,  आपापली ओळख करून द्या .....
.....आपली ओळख आपणच करून द्यायची?.....
फारच अवघड काम असते हो ते!
आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या घटना लिहायच्या, तर भीती असते आपल्याकडून कुणी दुखावले तर जाणार नाही ना?समाजातल्या आपल्या आजच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला धक्का तर लागणार नाही ना?
स्वत: भोगलेलं सगळ अगदी खर खर काही सांगाव,तर सगळेजण म्हणतील लागला भरल्यापोटी रडायला!
मी काय काय केलं, हे सांगावं तर म्हणतील, लागला स्वत:ची टिमकी वाजवायला!
उत्साहाने स्वत:चे कर्तूत्व सांगाव तर आरोप होउ शकतो उगीच बढाया मारतोय अशी!
 ....त्यामुळे मी जर मला कुणी स्वत:ची ओळख करून द्या, म्हटलं की खूप बुजतो!
तशी जर वेळच आली तर नाव,गाव,व्यवसाय,छंद सांगून थोडक्यात उरकतो!
.......पण, तरीही कधीतरी वाटत रहाते, आपण आज जसे आहोत,जसे दिसतो किंवा ज्या सामाजिक वा आर्थिक परिस्थितीत वावरतो किंवा असल्याचे भासवतो तीच आजूबाजूला आपली ओळख असते,जे दिसते तसेच होते आणि आहे तसेच आपण समाजाला माहीत असतो.पण ती ओळख निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रवासाचे काय? हा प्रवास माझ्यासाठी तरी खूप मोठा व खूप महत्वाचा आहे! माझ्या या प्रवासातल्या टप्प्यांशी कुणाला काही देणे घेणे असायचे कारण नाही! बाहेरून माझ्याकडे  त्रयस्थ्य म्हणून  बघणाऱ्या माणसाला मी जेथे आहे,जसा आहे तो  पल्ला अगदीच किरकोळीतला वाटू शकतो!, त्यामुळे मला असे वाटते की, एखाद्या माणसाच्या कर्तुत्वाचे मूल्यमापन करताना तो सध्या ज्या ठिकाणी आहे त्यावरून न करता, त्याने आयुष्याची सुरवात कोठून केली याची व त्याच्या आताच्या स्थितीत येईपर्यंतच्या त्याने केलेल्या प्रवासाचेही मूल्यमापनही  महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की लोक आजच्या देखाव्याला आणि दिखाव्यालाच खूप  महत्व देतात, शिवाय कुणालाच आपल्या गतइतिहासात डोकावायला तसे आवडत नाहीच! असो.
  खरच,काय ओळख आहे माझी? भारत सरकारच्या एका कंपनीत मी उपविभागीय अभियंता आहे, एक कुटुंब वत्सल माणूस म्हणून लोक मला ओळखतात,कविता लेख लिहितो,कथा लिहितो म्हणून फेसबुकवरील मित्र व ओळखणारे  एक धडपडणारा साहित्यिक माणूस म्हणून मला थोडेफार ओळखतात,रहाण्याच्या ठिकाणी व समाजात एक मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंब, ज्याचे सगळे सदस्य पगारदार आहेत व त्यामुळे त्यांना काय कमी असणार? अशीही ओळख आहे!
   पण माझी ही ओळख ही वरवरची आहे असे वाटते एका अल्पभूधारक निरीक्षर कुटुंबात परिंचे नावाच्या छोट्या खेड्यात  जन्मलेला मी! सहा भावंडातले शेंडेफळ.शेवटच्या बहीणीचे लग्नही मी चौथी पाचवीत असतानाच झाले होते व त्यापायी सगळी होती नव्हती ती शेती सावकाराकडे  गहाण पडलेली होती.हातातोंडाची गाठ पडणेही अवघड होते.खायचे म्हणाल तर बालपणी हुलग्याच माडगे,राशनच्या लाल गव्हाची रोटी, लाल मिलोची भाकरी,दुष्काळी कामावरची सुकडी, अशी एकेक ऐश होती! त्यातच आठवीत असतानाच पितृछत्र हरपले. दोन विवाहित बंधू पुण्यामुंबईत किरकोळ नोकरीत होते,पण त्यांचाच आपल्या अस्तित्वाचा लढा चालू होता! आपापल्या संसाराचे गाडे ढकलण्यातच त्यांची कमाई संपायची,त्यामुळे माझी आई मोलमजुरी करून, भाजीपाला विकून  मला वाढवत होती.सर्वात महत्वाचे म्हणजे शिकायला प्रोत्साहन देत होती.गरीबीतही अभिमानाने व वास्तवात राहून जगता येते हे शिकवत होती! सातवीत पी.एस.सी. परीक्षेत केंद्रात पहिला आलो.पहिली ते दहावी कायम प्रथम क्रमांकाने उतीर्ण होत होतो, त्यामुळे शिक्षक लोकांचा मी कायमच आवडता व शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो असे माझे बालपण होते! हायस्कूलमध्ये स्कॉलरशिप मिळायची,नादारीची सवलत होती, यामुळे शिकायला मिळाले.वेळोवेळी व आत्यंतिक गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी ओळखीची,बिनओळखीची माणसे व शिक्षक देवाने  पाठवल्यासारखी आपण होवून होवून मदतीला धावली  म्हणून उच्चमाध्यमिकपर्यंत शिकू शकलो.पुढे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना मिळालेली पहिली सरकारी नोकरी पकडली.पुणे टेलिफोन्स मधे टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करता करता पदवीही मिळवली .त्या काळात झोपडपट्टीत रहात होतो.स्वत:च्या  हाताने स्वयंपाक  करून खात होतो.एक भाकरी व बेसनाची पोळी हाच दररोजचा मेनू असायचा.त्या वस्तीत आमचे एक सार्वजनिक गणपती मंडळ होते.तेथे अनेक चांगले मित्र भेटले तसेच स्वत: व्यसनी,जुगारी,गुन्हेगारी वृत्ती असलेले पण मनाने अत्यंत श्रीमंत असलेले  मित्रही भेटले.प्रत्येक मित्रातल्या फक्त  चांगुलपणाशी  मैत्री केली.अख्खे आयुष्य बिघडवू  शकत  होते असे  काही  मोहाचे क्षणही  समोर आले,पण परमेश्वर कृपेने त्या  वाटा टाळत गेलो. नोकरीच्या ठिकाणी खात्याअंतर्गत प्रमोशनच्या काही संधी उपलब्ध होत्या.मी परीक्षा देवून फोन इन्स्पेक्टर झालो.पुढे जुनिअर टेलिकॉम ऑफिसर या पदावर बढती मिळवली.नंतर आजच्या उपअभियंता पदापर्यंत पोहचलो.माझी नोकरी जास्त करून  ग्राहकसेवा क्षेत्रातली होती.त्या काळी सात सात वर्षे टेलिफोन ची प्रतीक्षा यादी असायची.माझ्या सेक्शन मधील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी मिळेल असा माझा कटाक्ष असायचा.मी एक सरकारी सेवक आहे आणि लोकांना चांगली व तत्पर सेवा देण्यासाठी माझी नेमणूक झालेली आहे याचे भान ठेवून मी लोकांना सेवा देत आलो.पुण्यातील विविध भागात काम करत असताना अनेक टेलिफोन ग्राहकांशी कायमची मैत्री झाली.ग्राहक सेवा केंद्रात काम करताना  नोकरीतले अतीव समाधान  मिळवले.एक कार्यक्षम अधिकारी म्हणून समोर आपली कामे व अडचणी घेवून येणारे ग्राहक, वरचे अधिकारी तसेच हाताखालच्या स्टाफमधे जो मान सन्मान मिळाला तो खूप समाधान देवून जातो.नोकरी बरोबरच कामगार चळवळीत क्रियाशील होतो.अधिकारी संघटनेचा पदाधीकारी म्हणूनही काम केले.नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात ऑफिसच्या एकांकिका स्पर्धेतील एकांकिकेत छोट्या मोठ्या भूमिका केल्या.लहानपणापासून  असलेली  लेखन व वाचनाची आवडही  जोपासत राहिलो.खूप वाचतो तसेच  काहीबाही लिहित रहातो.आत्तापर्यंत दोन कवितासंग्रह व वीसेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.काही कथाही लिहिल्या आहेत.गद्य,पद्य व चारोळ्यांसाठी प्रत्येकी एक ब्लॉग,असे तीन ब्लॉग लिहितो.भविष्यातही लेखन करायचा संकल्प आहे. स्व-प्रगती साधतानाच एकत्र कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या व निभावल्या. मला  माझ्या आयुष्यात जे मिळू शकले नाही ते ते  सगळे माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला.समाजात हात कायम यथाशक्ती  'देता' ठेवला.
       सध्या माझा मुलगा सौफ्टवेअर इंजिनीअर आहे, तर सून होमिओपथिक डॉक्टर आहे.एक सुखी कुटुंबाचा कर्ता पुरूष म्हणून समाजात नाव  मिळाले आहे.या सर्व प्रवासात मला माझ्या पत्नीचे प्रचंड सहकार्य होते.स्वत: नोकरी करत  असतानाच माझ्या प्रत्येक निर्णयात,यशात तिने  मोलाची साथ दिली म्हणूनच मी हे दिवस पाहू शकलो.मला  जे काही  चांगले करावेसे वाटले ते करत आलो आहे.जेथे वाढलो ,शिकलो, ज्या समाजाने  पडत्या काळात मदत केली, त्या समाजाचे  मी  काहीतरी देणे लागतो याची जाणीव आहे, या जाणीवेतून मी ज्या  शाळेत शिकलो त्या शाळेला  दरवर्षी काहीतरी यथाशक्ती मदत करत असतो.आयुष्यात आजपर्यंत  खूप माणसे जोडली आहेत आणि अजूनही जोडतो आहे.खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव आहे. यासाठी आवश्यक ती उर्जा  व  बळ त्या निर्मिकाने मला देत  राहावे हीच प्रार्थना करत असतो.
माझ्याच एका कवितेत  माझ्याबद्दल सांगायचे तर ......   
काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे!
लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही,
हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे!
जगलो असे जमले जसे!
गरीबीची लाज नाही, ऐश्वर्याचा माज नाही,
सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे.
जगलो असे जमले जसे!
हवेत इमले बांधले नाही, मॄगजळामागे धावलो नाही,
शब्दात कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे!
जगलो असे जमले जसे!
भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तवाला सोडले नाही,
 विवेकाला तोडले नाही, वागावे लागले जशास तसे!
जगलो असे जमले जसे!
वावगा कधी हट्ट नाही, तड्जोडीला ना नाही,
रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे!
जगलो असे जमले जसे!
      ......प्रल्हाद दुधाळ.


  

Sunday, August 2, 2015

अतरंगी मित्र.

अतरंगी मित्र ....
  आज फ्रेंडशीप डे आहे .पाश्चात्य देशातील आपण अंगीकार केलेल्या अनेक पध्दतीत मला हे वेगवेगळे डेज साजरे करण्याची पध्दत आवडते.फादर्स डे,मदर्स डे ,डॉटर्स डे ,व्हॅलेंटाईन डे,इत्यादि इत्यादि....तर आज फ्रेंडशीप डे! ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप किंवा आपल्या भाषेत मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो.वाढत्या जागतिकरणात आता  ही वेगवेगळे डे साजरे करण्याची पध्दत आपल्याही अंगवळणी पडली आहे.असो,तर या आजच्या मैत्रीदिनाच्या सर्व मित्र व मैत्रिणीना मनापासुन शुभेच्छा!
    या निमित्ताने मला माझ्या एका अतरंगी इब्लिस मित्रांची आठवण झाली.एका एका मित्रावर एक एक लेख लिहिता येईल पण थोडक्या शब्दात मी या माझ्या मित्राने व त्याच्याबरोबर खेळत असलेल्या आम्हा सवंगड्यानी  केलेला आचरटपणा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.यातील सर्व पात्रे काल्पनिक असून कोणत्याही जीवंत वा मृत व्यक्तीच्या स्वभावाशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा!
     वय वर्ष पाच ,अजून शाळेत घातले नव्हते त्यामुळे केवळ हुंदाडणे चालू असायचे.साधारणपणे माझ्या वयाचे पाच सहा तरी सवंगडी बरोबर असतील.पालक आम्हाला चार घास खायला घालून खेळायला पिटाळायचे व घराला कुलूप घालून शेतात कामाला जायचे.मग आमचेच राज्य! जसा मूड फिरेल तसा खेळ खेळला जायचा.चिखलात लोळणे व्हायचे.नदीतली आंघोळ व्हायची,चिंचा बोरांच्या झाडावर दगड मारायचे,वाळायला घातलेल्या शेंगा खायच्या.मारामारी करायची .कट्टी फू व्हायची,घडीत सर्वजण पुन्हा  एकत्र!असे एक एक उद्योग चालायचे !
     तर एक दिवस आमची ही बालगॅंग उसाच्या चघाळाच्या ढिगावर खेळत होती.खेळता खेळता आम्ही त्या ढिगात बरेच आत गेलो होतो.आमच्या गॅंगमधे एक बिलिंदर बाळ होते.वयाच्या मानाने त्याची बुध्दी जरा जास्तच काम करायची! तर या हुषार बाळाला खेळता खेळता एक भला मोठा रबरी लाल रंगाचा एक मोठ्ठा फुगा चघाळाच्या ढिगात दिसला.त्याने ढकलत ढकलत तो फुगा थोड्या सपाट भागात आणला .बाकीची बाळेही त्याला मदत करायला लागली .त्या फुग्यावर बसून आम्ही घोडा घोडा खेळायला लागलो.खुप मजा येत होती.बाकी सगळे खेळत होतो पण आमच्यातले ते हुषार बाळ मात्र जवळच्या गोठ्यात गेले होते.तेथून त्याने एक खिळा व एक दांडा तुटलेला एक  कप आणला.एक मोठा दगडही आणला.आम्ही सगळेजण बुचकळ्यात पडलो होतो.त्याने सगळ्याना बाजूला ढकलले व फुग्याचा ताबा घेतला. खिळा फुग्यावर ठेवून तो दगडाने खिळ्यावर मारू लागला.त्याला फुगा घट्ट धरून बाकीची बाळेही मदत करू लागली.बराच वेळ प्रयत्न केल्यावर त्या फुग्याला एक बारीक छिद्र पडले आणि त्यातून पाण्यासारखे काहीतरी पडू लागले.आता हुषार बाळाला अजूनच चेव आला.तो त्या फुग्यावर बसून फुग्यावर दाब देवू लागला.दाबले की फुग्याच्या  छिद्रातुन  तो द्रव पदार्थाची धार बाहेर पडायची हे आमचे बाळ त्या धारेत कप धरायचे व थोडा द्रव कपात आला की तो ते प्यायचा.आम्ही सगळे स्तब्ध होवून या बाळाचे चाळे बावळटासारखे बघत होतो.तो हसत खिदळत थोडे थोडे पाणी पित राहीला.बाकीची बाळेही चेकाळली व धारेची चव घेवून बघू लागली.माझ्याकडे कप आला तेंव्हा त्याच्या उग्र वासावरून ही दारू की काय म्हणतात ते असावे अशी शंका आली.मला तो वास चांगला वाटला नाही त्यामुळे कप परत दिला.आता आमच्या त्या हुषार बाळाने फुगा जोरात दाबून कारंजे उडवले सर्वांचे कपडे ओले केले बराच वेळ हा खेळ चालू राहीला.फुगा रिकामा झाला होता."ए कार्ट्यानो काय दंगा चाललाय?" कुणीतरी ओरडले आणि मी लांब धुम ठोकली!
    थोड्या वेळाने हुषार बाळाचा जोराजोरात भोकाड पसरल्याचा आवाज यायला लागला.बहूतेक त्याची आई त्याला झोडपत होती!
    थोडे मोठे झाल्यावर जे समजले ते असे होते. त्या हुषार बाळाच्या शेतावर सालाने कामाला असलेला एक कामगार फावल्या वेळात दारू गाळायचा व फुगे भरून असे कुठे कुठे लपवायचा.त्यातलाच एक आम्हाला सापडला होता आणि आमच्या सवंगड्यांची त्यावर झोकात पार्टी झाली होती! हा माझा बालमित्र सहावी पर्यंतच शिकू शकला.मधल्या काळात अस्सल दारूडा म्हणून बदनाम होता.आता तो व्यसनमुक्त झाला आहे!
(काल्पनिक)
                               ......प्रल्हाद दुधाळ.