Friday, July 31, 2015

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने....

गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने ...
आज गुरुपोर्णिमा,आपल्या गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! आपल्या आयुष्यात अनेक गुरूतुल्य व्यक्ती येतात, कळत नकळत चांगले संस्कार करत रहातात.मी जेंव्हा या निमित्ताने माझ्या आयुष्याचा विचार करतो तेंव्हा लक्षात येते, अरे मी आज जो काही आहे तसा घडण्यामधे माझ्या आईवडिलांचा व शिक्षकांचा वाटा तर नक्कीच आहे,पण या माझ्या गुरूंबरोबरच असे अनेक लोक आहेत त्यानी मला जगणे शिकवले.वडीलांचा सहवास फार नाही लाभला,पण जो काही तेरा चौदा वयापर्यंत लाभला त्या सहवासात मी खूप काही शिकलो . मी प्रत्येक क्षणी डोके थंड ठेवून निर्णय घायला शिकलो,घाई घाईने, रागात असताना वा खुप आनंदात असताना घेतलेले निर्णय हे बहुतांशी  भावनेच्या भरातले असतात आणि त्याचा पुढे आयुष्यात त्रासच होवू शकतो, हे फार कमी वयातच मी शिकलेलो होतो.आई बद्द्ल काय बोलू ?आपल्याला  जीवनात जर काही चांगले घडवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही.समोर उभ्या राहिलेल्या जटील समस्येला कुणीतरी आयते उत्तर देईल यावर तिचा मुळीच भरवसा नव्हता ! आपला मार्ग आपण स्वत: शोधायचा, आलेला प्रत्येक दिवस नवा म्हणुन जगायचा,आत्मसन्मान विकून मिळालेले सोनेही  मातीमोलाचे असते.अशी अमुल्य शिकवण अगदी लहान वयातच मिळाल्यामुळे कायम वास्तवात जगायची सवय लागली.आलेला दिवस साजरा करून आनंदात कसे रहायचे हे मी आईकडून शिकलो.आई आणि वडिलांशिवाय आजूबाजूचे भाऊबंद नवे नवे संस्कार करत राहिले .भाऊबंदकी मधील भांडणातुनही मला सदेश मिळाला -असे वागणे बरे नाही! शाळेत अक्षर ओळख झालीच पण आमची शाळा ही शेती शाळा असल्यामुळे शेतातली खुरपणी, काढणी सारखी कामे करायला मिळाली.लिहावाचायला शिकलो तसा अवांतर वाचनाचीही आवड तयार झाली.हाती येईल ते, अगदी त्या वयात जे वाचू नये, तेही वाचले गेले पण त्यामुळे चांगल्या वाईटातला फरक कळण्याइतपत जाणीवा समृध्द होत गेल्या .मी येथे कुणाचे  नाव घेणे प्रशस्त होणार नाही, पण असेही गुरूजी मला लाभले जे वर्ग चालू असताना दारू प्यायचे! पण अशा लोकांकडूनही मला कसे वागू नये याचे संस्कार मिळाले.शाळेत वर्गात चांगली मुले होतीच त्यांच्याकडून चांगले शिकलोच, पण वर्गात अशीही मुले होती जी तंबाखू खात,गांजा ओढत,जुगार खेळत, एवढेच काय दारूसुध्दा पीत असत.त्यांच्या सोबत राहून शालेय अभ्यासात प्रथम क्रमांकाने पास होत राहीलो.  व्यसने माणसाचा विनाश करू शकतात, त्यांच्या वाट्याला आयुष्यात कधीच जायचे नाही, याची खुणगाठ त्या अर्धवट वयातच बांधली गेली.त्या व्यसनांची चव आपणही अजमावून पहावी हा मोह मात्र कधीच झाला नाही! याचे श्रेय अर्थातच अशी बुध्दी देणार्या त्या निर्मिकाचे! चोरी करू नये ,खोटे बोलू नये ,वाईट सवयी च्या वाटेला जावू नये,स्वत:चे काम स्वत: करावे,आयुष्यात फुकट मिळालेली कोणतीच गोष्ट समाधान देवू शकत नाही,अशा अनेक चांगल्या गोष्टी तो निर्मिक मला सतत शिकवत होता. अनुभवातुन शहाणपणाचे संस्कार होत होते.वयाच्या सोळाव्या वर्षी मी शिक्षणासाठी घराबाहेर पडलो, एकटा राहीलो पण पुस्तकांच्या रूपाने मला एक गुरू, एक सच्चा मित्र  भेटत राहीला आणि या वाचन संस्काराने मला आयुष्यात कधीच  वाकडे पावूल टाकू दिले नाही.हायस्कुल जीवनात व उच्च माध्यमिक शिक्षणा पर्यंत रयत शिक्षण संस्थ्येच्या शाळेत शिकलो.स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद असलेल्या या संस्थ्येने स्वाभिमान जागा ठेवून व कष्ट करून जगायला शिकविले.रयतच्या सेवाभावी गुरुजनांचे माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे!पुढे कॉलेजला पुण्यात आलो.आबासाहेब गरवारे कॉलेजमधे शिकत असताना पुणेरी संस्कार आपोआप झाले.आधी ग्रामीण शिवराळ भाषा तोंडात असायची, ती जावून जाणीवपुर्वक चांगल्या पुणेरी मराठी भाषेत बोलू लागलो.वाचनाच्या कक्षा रुंदावल्या.कविता लिहिण्याचे सातत्य वाढले.जरी मी गरवारे कॉलेज मधे शिकत होतो, पण रहात होतो येरवड्यातील नागपूर चाळ या वसाहतीत! झोपडपट्टीचे जीवन जवळून अनुभवले. इथे अनेक प्रकारचे मित्र जोडले गेले.या मित्रांत सिनेमा तिकिटाचा काळाबाजार करणारे होते ,बिगारी काम करणारे होते ,रिक्षा चालवणारे होते तसेच काहीच कामधंदा नसलेले व  स्वयंघोषित छोटे मोठे 'दादा'ही होते.व्यवसाय काहीही असो,मनाने अत्यंत श्रीमंत असलेले हे मित्र माणुस कसा असावा आणि तो कसा नसावा याचे संस्कार करत राहिले.त्यांच्यातले चांगले गुण घेत राहिलो  हेसुध्दा माझे गुरूच होते  की !पुढे नोकरी करताना अनेक अधिकारी भेटले, खुप काही शिकवून गेले. चांगला कर्मचारी व चांगला अधिकारी कसा असावा,हाताखालच्या कर्मचार्यांकडून काम करून घेत असतानाच माणुसकीची जोपासनाही कशी होवू शकते! ग्राहकसेवेचे महत्व व समाधान देणारी सेवा दिल्यानंतर मिळणारे समाधान,इत्यादी बाबी कुणाकुणाकडून शिकत राहीलो,अजुनही शिकतो आहे.
   आतापर्यंतच्या जीवनात एक गोष्ट नक्कीच समजली की अवतीभवती असणारा प्रत्येक माणुस हा आपला गुरूच असतो.प्रत्येक माणसात गुणदोष हे असतातच! प्रत्येकात असणारे चांगले गुण आत्मसात करायचे असतात तर दुर्गूणाचे निरिक्षण करून आपल्यात तर असे दोष नाहीत ना याचे आत्मपरिक्षण करायचे असते.असलेच काही तसे दोष तर ते दूर करून प्रगती साधायची असते!
    माझ्या आयुष्यातील अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरूजनाना आजच्या गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने साष्टांग दंडवत!
                      .....प्रल्हाद दुधाळ (31 जूलै 2015 )

Wednesday, July 29, 2015

आठवणीतला बेंदूर

आठवणीतला बेंदूर
  आज गावाकडे बेंदूर साजरा होतोय अशी बातमी वाचली.आणि बेंदूर या सणाबद्दल लिहावेसे वाटले. आपल्या शेतात वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सण साजरा केला जात असावा.काही ठिकाणी तो बैलपोळा म्हणून श्रावण अमावास्या  या दिवशी तर काही ठिकाणी भाद्रपद अमावास्येला साजरा केला जातो.कालौघात आता शेतीच्या कामांचे यांत्रिकीकरण झाले आहे आणि बैलांचे महत्वही ,पण एक काळ  असा होता की शेती पूर्णपणे बैलांवर अवलंबून होती. मोटेला बैल जुंपून शेताला पाणी दिले जायचे.नांगरणी,पेरणी,कोळपणी इत्यादी कामे बैलाकडून करून घेतली जायचीच पण त्या काळी  बैलगाडी वा छकडा हे वहातुकीचे महत्वाचे साधन होते.थोडीफार शेती असलेल्या शेतकऱ्याच्या दावणीला खिलारी बैलजोडी हमखास असायची! अजूनही काही शेतकरी बैल पाळतात. माझ्या लहानपणी गावात बेंदूर अगदी धुमधडाक्यात साजरा व्हायचा. तो थोडाफार आठवणीत असलेला बेंदूर आजच्या दिवशी आठवला त्याची ही उजळणी .......
      आषाढ महिन्यात पावसाची संततधार चालू असायची.शेतात उगवलेल्या पिकाने  हळूहळू बाळसे धरायला सुरवात केलेली असे.डोंगरदऱ्या,शेते व माळराने हिरव्या रंगात न्हालेली असत.नदीनाल्यांना पूर आलेला असायचा आणि मग बेंदूर सणाची चाहूल लागायची. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आणि या मित्रासाठी बेंदराच्या निमित्ताने बाजारातून बेगडाचा कागद,फुगे,रंगीत गोंडे,जलरंग व ऐटबाज झुलीची खरेदी व्हायची.लहान मुले कुंभारवाड्यातून मातीचे खिलारे  बैल घेवून त्यांना सजवत असत.बेंदराच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत असायचा. शेतकरी पहाटे उठून बैलाच्या खांद्याला तेल/तूप व हळद लावून मालिश करत त्याला प्रमाणे न्हावू घालत.बैलाच्या अंगावर वेगवेगळे रंगीत छाप उठवले जायचे.शिंगाना हिंगुळ लावून ती रंगवली जायची. मग शिंगांना रंगीत बेगड, गोंडे व फुगे लावून दिमाखात सजवले जायचे.पाठीवर रंगीत कलाकुसर व आरसे असलेल्या झुली टाकल्या जायच्या. प्रत्येकजण आपला बैल मिरवणुकीत चांगला दिसायला हवा म्हणून प्रयत्न करत असे.ठरलेल्या वेळी सगळे शेतकरी आपल्या बैलजोड्या घेवून मिरवणुकीला येत. वाजंत्री, ढोलताशाचा गजर होवून मिरवणूक सुरू व्हायची. कधी कधी मिरवणुकीत कुणाची बैलजोडी पहिली उभी रहाणार यावरून वादही  व्हायचे.एखाद्या वर्षी अगदी मारामाऱ्या सुध्दा व्हायच्या.जाणकार प्रतिष्ठीत लोक अशावेळी मध्यस्ती करून भांडणे मिटवत व मिरवणूक सुरू होत असे. प्रथम वाजंत्री मग ढोलताशा, लेझीमपथक, गावाच्या मुख्य रस्त्याने धुमधडाक्यात ही मिरवणूक निघायची.उखळी दारूचे आवाज घुमायचे,फटाक्यांच्या माळा पेटवल्या जायच्या.मिरवणुकीतील बैल अशा आवाजांना बुजायाचे आणि मालकांना आपले बैल सांभाळणे मुश्कील होवून जायचे.आख्खे गाव ही मिरवणूक बघायला रस्त्याच्या दुतर्फा उभे असायचे.मुले नाचायची, सर्वजण मिरवणुकीची मजा लुटायचे.
      दीडदोन तास ही मिरवणूक चालायची ग्रामदेवतेचे दर्शन घेवून मिरवणुकीची सांगता व्हायची. बैलजोडी घरी येताच बैलांच्या पायावर पाणी घातले जायचे.घरातील महिला बैलांना पंचारतीने ओवाळत त्यांना पुरणपोळी खायला घालत व मग घरात सर्वजण पुरणपोळीचा आरामात आस्वाद घेत असत.तर अशा प्रकारे बळीराजा आपल्या मित्राची बैलाची वर्षातल्या बेंदराच्या  सणाला कृतज्ञतापुर्वक पूजा करत असे.अजूनही बेंदूर साजरा होतो पण आता बैलजोडी पाळणारे शेतकरी कमी झालेत!पण आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेल्या या सणाला तोड नाही!

                                          .....प्रल्हाद दुधाळ.(२९ जुलै  २०१५)      

Monday, July 27, 2015

विठ्ठल भेट.

विठ्ठल भेट.
 मी पूजाअर्चा वा कर्मकांडात फार कधी रमलो नाही,पण मी नास्तिकही नाही!परमेश्वर नावाची एक महाशक्ती अस्तित्वात आहे आणि आपल्या अस्तित्वाची चुणूक वरचेवर आपल्या जीवनात तो दाखवत असतो.आपल्याला तो भेटतही असतो असे मला विश्वासपूर्वक वाटते.
   आपण नक्की विचाराल मग तुला भेटला का कधी हा परमेश्वर? तर याचे उत्तर आहे-हो!
मला अनेकवेळा तो पांडुरंग भेटला आहे! कधी तो समोर आला आहे,तर कधी अदृश्यपणे माझ्या मागे समर्थपणे उभा राहून त्याने मार्ग दाखवला आहे.बहुतेक वेळा तो समोर येऊनही मी त्याला तसे ओळखले नाही, पण त्या त्या प्रसंगाचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा जाणवते, ‘अरे मला तो नक्की भेटून गेला,मार्ग दाखवून गेला,मदत करून गेला,आनंद व समाधान देवून गेला,पण मला त्या क्षणी त्याला नाही ओळखता आले!
.......हो,......तो सावळा विठ्ठल मला अनेकदा भेटून गेला,....अजूनही भेटतो क्षणोक्षणी.....
....कधी तो दोन दिवसाचा उपाशी असताना भाकरीच्या रुपात येवून भूक भागवून गेला,आर्थिक अडचणीच्या वेळी उधारी-पाधारीची सोय करून गेला.पालनपोषण करायला आई,बहीण,भावंडे,विविध नातेवाईकांच्या रूपात भेटला.....
मला शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कर्मवीर विद्यालय परिंचे,मालोजीराजे विद्यालय लोणंद तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नीरा या माझ्या शाळांच्या रूपाने भेटला,हायस्कूल स्कॉलरशिपरूपी मदत,कधी एखादे आदर्श विद्यार्थी सारखे बक्षीसही देउन गेला.
प्रसंगी आपल्या पगारातून माझी फी भरणाऱ्या पडवळ सरांच्या रूपाने,व जीव तोडून शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांच्या रूपाने भेटला.
वेळोवेळी शहाणपण व हुशारी देवून चांगल्या वाईटातला फरक करू शकणाऱ्या विवेकरूपाने भेटला.
.....हो ......मला विठ्ठल नक्कीच भेटला!.......
कधी भाकरी होवून,नोकरी होवून,मित्र होवून,संधी होवून,अनुभव देवून या ना त्या रूपाने तो भेटतच असतो....
मी त्याला हात जोडो अथवा ना जोडो, त्याचा हात कायमच डोक्यावर ..आशीर्वाद देण्यासाठी!....
संकटसमयी तो दाखवतो मार्ग....संधी देवून सिद्ध करायला लावतो- कर्तुत्व......
मार्ग दाखवतो,कधी कधी परीक्षाही घेतो, हरायला लागलो तर..... आधारही देतो तो!.....
पावलापावलावर तो भेटतच रहातो .....मार्गदर्शन करत रहातो .....
आजूबाजूला त्याचे आस्तित्व आहे, या जबरदस्त विश्वासावर मी चालत रहातो....आत्मविश्वासाने.....
त्या अदृश्य भगवंताचा मी कायमच आहे कृतज्ञ!......
.....पहा आत्ताही तो आहे माझ्याबरोबर .....तुमच्या रूपाने !........
          ......प्रल्हाद दुधाळ.( २७/०७/२०१५ आषाढी एकादशी.)                         




Saturday, July 25, 2015

पोपटमामा.

     पोपटमामा.
परवा खूप दिवसांनी गावाला गेलो होतो.थोडा निवांतपणा असला की मी गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी विनाकारण चक्कर मारतो.अगदी मारुतीच्या देवळापासून ते सरकारी दवाखाण्यापर्यंत हा फेरफटका असतो.मला आवडते असे करायला.रस्त्याने चालत असताना पावलोपावली बालपणीची एक एक आठवण येते,बालपणीच्या आठवणीत रमत गमत फिरणं खूपच आनंददायक असतं!
तर त्या दिवशीही असाच रमत गमत चाललो होतो.आजूबाजूला काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. आपल्याच गावात आता आपल्याला न ओळखणारे खुपजण आहेत हे प्रकर्षाने जाणवले.अचानक समोर एक ओळखीचा चेहरा दिसला.मला पहाताच त्याच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य पसरले.आमच्या शाळेचा सेवानिवृत्त शिपाई होता तो!पांढरा मळकट पायजमा,फिक्कट निळा सदरा, डोक्यावर टोपी असा पेहराव! आम्ही त्याला पोपटमामा म्हणायचो.
“नमस्कार,कधी आलायस?”
“नमस्कार नमस्कार मामा,आजच आलोय, कसं चाललंय मामा?”
“ठीक आहे.आता रिटायर होवून पाच वर्षे झाली बघ.थोरल्याच लग्न केलं यंदा.धाकटासुध्दा लागलाय कामाला!” “तूझ कसं काय, ठीक ना?”
त्याने आपुलकीने विचारले.मी मात्र भूतकाळात अगदी शालेय जीवनात हरवलो ....
मी आठवीत हायस्कूलमधे प्रवेश घेतला होता.एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल होते ते. तोपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं त्यामुळे हायस्कूलचा खाकी पांढरा युनिफॉर्म व इनशर्ट हे सगळ अगदीच नवीन होत आमच्यासाठी! त्यात शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड नावाचे सर होते ते खूपच कडक होते.सहा फूट उंच व धिप्पाड! लांब लांब मिशा व कानावर तसेच लांब लांब केस! हातात वेताची काठी घेवून हे सर सकाळी पावणेसातला हायस्कूलच्या गेटवर उभे राहायचे.सात वाजून अगदी एक मिनिट उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना सर गेटच्या बाहेर उभे करायचे.साधारण सव्वा सात वाजेपर्यंत असे वीस पंचवीस विद्यार्थी तरी सापडायचे! मग हे सर त्यांना ओळीत उभे करून वेताच्या काठीने पायांवर फटके मारायचे. अगदी त्यांचे हात दुखेपर्यंत सपासप काठी मारत राहायचे! अगदी दररोज असा मार खाण्याचा कार्यक्रम असायचा शाळेचा शिपाई असलेल्या पोपटमामाला हे सगळे असह्य व्हायचे पण सरांसमोर बोलायची त्याचीच काय कुणाचीही हिंम्मत नव्हती. इत्तर शिक्षकानाही मुलांना असे गुरांसारखे मारणे आवडत नव्हते पण सांगायचे कसे,म्हणून तेही गप्प बसत.काही तरी करून मुलांना अशा दररोज पडणाऱ्या मारापासून वाचवायला हवे असे या पोपटमामाला अगदी मनापासून वाटत होते.मग त्याने या गोष्टीचा थोडा अभ्यास केला.बरीच मुले शाळेची घंटा वाजली की घरातून निघत अगदी धावत पळत शाळेत पोहचत,पण जे विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नसत ते नेमके सरांच्या तावडीत सापडायचे व भरपूर मार खायचे,जास्त करून थंडीच्या सिझनला जेंव्हा दिवस उशीरा उगवतो तेंव्हा अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढते हे मामाच्या लक्षात आले .मग त्याने यावर एक उपाय शोधला.
सकाळी सातच्या शाळेची घंटा पावणेसातलाच वाजायला लागली. पावणे सात ते सात अशी पंधरा मिनिटे हे मामा घंटा वाजवत रहायला लागले.गावातील अगदी शेवटच्या आळीतली मुलेही बेल सुरू झाल्याबरोबर पळत निघाली तर सात वाजायच्या आत शाळेत पोहोचू लागली.याचे चांगले परिणाम दिसायला लागले. मार खाव्या लागणाऱ्या मुलांच्या संखेत लक्षणीय घट झाली.अर्थात यासाठी पोपटमामाचे सर्वानी कौतुकच केले.....
“ अरे कसला विचार चाललाय?” मामाच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही मामा!” मी हसलो.
“चल, शेतात जायचंय, भेटत जा,असाच आला की” ...मामाने माझा निरोप घेतला.
मी पुढे चालायला लागलो.बालपणीच्या आठवणीना उजाळा देत देत एक एक पाउल पडत होते.....
. ........प्रल्हाद दुधाळ.

     

Tuesday, July 7, 2015

एक सकाळ.....

एक सकाळ........ शायरीत चिंब ....’चपराक’ समुहात .....
  .............मंगळवार सात जुलै २०१५...
सकाळी उरकून ऑफिसला पळायची घाई.मधून मधून एक डोळा Whats App वर....
‘चपराक’ गृप वर कविता मालपाणी यांचा शायराना अपडेट ...
एक सुबह ऐसी भी हो ...
जहा आंख जिंदा रहने के लिये नही.
पर ...जिंदगी जिने के लिये खुले ...
यावर विनोद पंचभाई सरांचा “बहोत अच्छे!” चा दिलखुलास प्रतिसाद.सकाळची मरगळ कुठल्या कुठे पळाली .....!
प्रा.बी.एन.चौधरींचे वारीचे अभंग .....
जगण्याचे अभंग .
आशा व निराशा,सोबत चालती,
जीवाशी खेळीती,जन्मभर.
यश अपयश,नियतीच्या हाती,
कष्टाशी तू नाती,तोडू नको.
पाप आणि पुण्य,तुझ्याच रे हाती,
बाळग तू भीती,जगताना.
सत्याशी असत्य,रोज येथे खेटे,
सत्यालाच भेटे,विजयश्री.
जन्म आणि मृत्यू,कुणाला चुकला,
मानव धाकला,देवा पुढे.
सुख दु:ख फेरा,वाटतो टळावा,
सन्मार्ग धरावा,भ.ना.म्हणे.
  चौधरी सरांच्या भक्ती नामाने दिवसाची सुरुवात तर भन्नाट झाली.आता चहा नाष्टाही झाला होता. ऑफिसची तयारी करता करता परत मोबाईल हातात ...
 अरुण कमलापुरकर सरांची जगण्याच्या अभंगाना दिलखुलास दाद ....
“ज्ञानियाचा वा तुक्याचा ,
तोच भनाचा वंश आहे”
 आता रस्त्यावर ........ऑफिसच्या गाडीची वाट पहाता पहाता .....राखी येवलेंचा  अपडेट .....
सांसो का टूटना  आम बात है गालिब !जहा अपने बदल जाये ....मौत उसी को कहते है!
     त्यावर विजयश्री दिवटे व अरुण कमलापूरकर यांचा “सही” व “बहोत खूब”
त्यावर राखी येवले .....
चलो बिखरने देते है ...आज जिंदगी को ....संभालने की भी एक हद होती है!
.... वा!ss  .....आज online महफिल रंगणार असे दिसते! ऑफिसची गाडी आली, हातात मोबाईल समोर ठेवूनच बसलो ...
राखी येवलेंचा पुढचा अपडेट ......

घर म्हणजे दोघांच असतं
दोघांनी सावरायला लागतं
एक घोरत पडतं
दुसऱ्याला मात्र डब्यासाठी उठावं लागत.
त्यावर .......चौधरी सर ......
मौत से कहना की हम से नाराजगी खत्म कर ले ....
वो लोगही बदल गये ...जिनके लिये हम जिया करते थे.....
.......क्या बात है, ......या शायराना अंदाजाला online सदस्यांचा जोरदार प्रतिसाद ...
राखी येवले ......
बहुत कठीन है जहां मे सभी को खुश रखना,
कि लोग रब पे भी तो उंगलिया उठाते है!
त्यावर चौधरीजी .....
कुछ जख्म इन्सानके कभी नही भरते ....
बस इन्सान उसे छिपानेका  हुनर सिख जाता है!
आता समूह व्यवस्थ्यापक घनश्याम पाटील यांचा जोरदार सहभाग .....
तिने दिलेले घाव
कुणालाही दाखवायचे नसतात...
मग ते कितीही असोत
कधीही मोजायचे नसतात....
.......वा!..... आता महफिलीला अजूनच चार चांद लागणार असं दिसतंय!....
अरुण कमलापूरकरांचे म्हणणे .....
मुकाटपणे सोसायचे असतात,प्रतिघाव द्यायचे नसतात!.....
आणि मग घावांवरून सदस्यांची थोडी चेष्टा मस्करी!
आता मलाही  वाटायला लागलं......... उतरायलाच हवं या महाफिलीत ......
कशाला हवी घावांची बात
आपले ओठ आपलेच दात! 
 .........जमलं बहुतेक! ........
सर्वानी ‘वाssss ‘ म्हटलं!  एक दोन स्माईली सुध्दा! .... आता पुढे जायला हरकत नाही! .....
...गिनती कशास त्या घावांची?
यादी कशी वाचू त्या नावांची?
त्यावर घनश्यामजी ......
आपलाच माल अन आपलाच तराजू
कोणाला तोलून दावायचं?
खपला तर खपला,नायतर सांगा
कोणाला बोलून दावायचं?
..........खरंच......रोकडा सवाल!
...आता पुढे लिहू का? बघू  काय म्हणतायेत ....


काही घाव सोसण्यात मजा असते
स्फुंदता स्फुंदता हसण्यात मजा असते!
यावर पाटील साहेबांचा.... “वाह! क्या बात है! कबूल!!” आता मजा वाढायला लागली......
..आता विनोद पंचभाई महफिलीत ....
अब तहजीब कहां
रह गयी जमाने मे!
शहर मी पाठशालासे जादा
मधुशालाए जो है!!
......यावर ....राखी येवले ....
बिकती है ना खुशी
कही ..ना कही गम बिकता है!
“लोग गलतफहमी में है ...कि शायद
कही मरहम बिकता है ...!!        
............... सदस्यांचे वाहss वाह....
.....आता माझ, चुकतमाकत हिंदी   .....
वह मधुशाला
वह महाफिले रही कहां
अब रास्ते पर ही
ठेले लगते है!
माझी गाडी आता ऑफिस च्या गेटवर आली आहे.आता शायरी सोडून दिवसभर रुटीन आयुष्य!.
तरीही ...
शेरो शायरी ने मजा फार आली
ट्राफिक मधून गाडी पार झाली!
    तरी पुढचे दोन शेर वाचलेच ...... ........सरिता कमळापूरकर यांचा ....
जे घाव सोशीले ते होते जरी फुलांचे
संवेदना उण्या का तो भार पेलण्याला
ते सूर भैरवीचे नव्हते कधी वियोगी
नयनात पूर तरी का आतुर सांडण्याला
.........नंतर.... बी एन चौधरी सर, .....
वो करीब ही न आये तो इजहार क्या करते!
खुद बने निशाणा तो शिकार क्या करते!
मार गये पर खुली रखी आंखे अपनी!
इससे जादा इंतजार क्या करते!
........आणि शेवटी विनोदजींचा सिक्सर .....
उस चांद को गुरुर है की ,उसके पास नूर है.....
तो हमे भी गुरुर है, क्योंकी
हमारे पास एडमीन जैसा कोहिनूर है!.......
वा काय महफिल जमलीय!........पण आता काम सुरू करायलाच हवे ....
“आण रे बाबा त्या फायली!” ....ही ऑफिसमधील कामांची महफिल सुध्दा जमवायला हवीच की .....
............ आयुष्याची महफिल सजवण्यासाठी.....!!!

     ........प्रल्हाद दुधाळ.(९४२३०१२०२०)