Thursday, September 25, 2014

आपणच आपले वैरी.

                             आपणच आपले वैरी!
           सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप लागेपर्यंत आपण अजाणतेपणी सतत कुठला ना कुठला विचार करत असतो.कधी जाणीवपूर्वक निरीक्षण केले आहे का या मनात सतत चालू असलेल्या आपल्या विचारांचं? शेकडा नव्वद लोक आपल्या मनात जे वेगवेगळे विचार येतात त्याबद्दल अनभिज्ञच असतात. या सततच्या विचार शृंखलेतील अनेक विचार हे आपल्या मनात अगदी विनाकारण आलेले असतात असे मला वाटते. या विचारांमध्ये बहुसंख्य विचार हे नकारात्मक स्वरूपाचे असतात. त्यातले अनेक विचार हे आपल्या भूतकाळाशी संबंधीत असतात तर काही विचार हे भाविष्याकालाशी संबंधीत असतात. भूतकाळ असो वा भविष्यकाळ,मनात येणाऱ्या सकारात्मक विचारांनी फारसा फरक पडत नाही पण नकारात्मक विचारांनी मात्र माणसाच्या जीवनावर अनेक विपरीत परिणाम दिसू शकतात.भूतकाळ निराशाग्रस्त बनवतो तर भविष्यकाळ चिंताग्रस्त बनवतो.वास्तव जीवनात कवडीमोलाचे असलेले असे नकारात्मक विचार माणसाला तणावग्रस्त व हताश बनवतात आणि हाताशी असलेले वर्तमान काळातील अनेक अनमोल आनंदाचे क्षण अशा विचारांमुळे अक्षरशः मातीमोल होतात.असे का घडत असावे यावर अनेक तज्ञ व मानसशास्रज्ञ अभ्यास करून आपले निष्कर्ष समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी देत आले आहेत व माणसाला निराशेतून बाहेर काढण्यासाठी त्यांचा उपयोग करत आहेत व करत रहातील यात शंका नाही, पण रोजच्या व्यावहारिक जगामध्ये वावरत असताना एक सामान्य माणूस म्हणून आपण स्वत: काय करू शकतो का? अशा चुकीच्या विचारप्रणालीचा जीवनावर होणारा परिणाम कसा सुसह्य करता येईल?
        मला असं वाटत की आपल्या मनातील या विविध प्रकारच्या विचारांना काही प्रमाणात आपणच काबूत ठेउ शकतो.आवश्यकता आहे ती त्या दिशेने केलेल्या जाणीवपूर्वक करायच्या प्रयत्नांची! मुळात आपल्या मनात येणाऱ्या या विचारांचा उगम कसा होत असावा याचे काही आडाखे! ही केवळ वरवर केलेली चिकित्सा आहे.कदाचित मानसशास्र काही वेगळे सांगत असेल!
        आपल्या मनात भूतकाळाशी निगडीत असलेले नकारात्मक विचार हे आपल्या गत आयुष्यातल्या घटनांमुळे आलेले असू शकतात.ज्या प्रकारचे आयुष्य आपण अपेक्षिले होते जी स्वप्ने पाहिली होती,त्यापेक्षा वेगळे आयुष्य जर वास्तव जीवनात वाट्याला आलेले असेल तर झालेले अपेक्षाभंग, वाट्याला आलेली अवहेलना, उपभोगलेली गरीबी,दैन्य, जाणता अजाणता वाट्याला आलेली उपेक्षा,कुणाकडून तरी झालेला अन्याय वा मानसिक वा शाररीक छळ व त्यापोटी झालेला मनस्ताप,संताप,तेजोभंगाचे क्षण व त्यावेळच्या अगतिकतेपोटी झालेली मानसिक व शाररीक कुचंबणा वा अत्याचार इत्यादी अनेक कारणामुळे असे नकारात्मक विचार आपल्या मनात येत रहातात.असे वाईट प्रकारचे जगणे आपल्या एकट्याच्याच वाट्याला का यावे आपले नशिबच खराब! अशा विचारांमुळे व्यवस्थेची चीड व संताप मनात दबलेला असतो व त्यापोटी छोट्या मोठ्या कारणांमुळे चिडचिड करत रहातो .निराशाग्रस्त मनस्थिती मुळे भविष्यकाळात सुद्धा असेच घडत राहील अशी भीती त्याला छळत रहाते.तो नसत्या चिंता करत रहातो. अशा व्यक्तीच्या लहरी वागण्यामुळे त्याची अगदी जवळच्या व्यक्ती सुध्दा दूर रहाणे पसंत करतात.असा माणूस स्वत:च्या नशिबाला दोष देत रहातो.सतत विचारचक्रात राहिल्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी तुसडेपणाने वागले जाते.त्याच्या जीवनात सध्या असलेल्या लोकांचा खर तर झालेल्या गोष्टींशी वा भूतकाळातल्या त्या परिस्थितीशी संबंध नसतो पण निराशाग्रस्त मानसिक स्थिती मुळे आपल्या सभोवताली असलेली सगळी माणसे आपली वैरी आहेत व जेव्हढा म्हणून संताप व्यक्त करता येईल तेव्हढा समोर येणाऱ्या माणसावर काढला जातो.पुढचा मागचा विचार न करता लोकांना तोडून बोलले जाते, वडिलधारे व प्रतिष्ठीत माणसांचे सुध्दा अपमान केले जातात.अशा निराशाग्रस्त माणसाशी आपण नक्की कसे वागावे हे समजत नसल्यामुळे आजूबाजूची अगदी जवळची माणसेही गोंधळून जातात.शक्यतो सहानुभूतीने मार्ग काढायचा प्रयत्न केला जातो उपचार केले जातात पण जर संबंधिताकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही तर हळू हळू माणसे कंटाळतात आणि अशा व्यक्तीपासून मनाने व शरीराने दूर होऊ लागतात.अशावेळी त्या निराशाग्रस्त माणसाला खर तर सहानुभूतीने समजून घेणे आवश्यक असते.त्या व्यक्तीची मनस्थिती सुधारण्यासाठी समुपदेशन, योगोपचार, ध्यान अथवा योग्य ते मानसिक उपचार करणे गरजेचे असते पण समोर येणाऱ्या स्फोटक प्रतिक्रिया टाळण्यासाठी अशा व्यक्तीच्या जवळचे लोकच तुटले जातात आणि याचा अधिक प्रतिकूल परिणाम होत जातो.परिस्थिती अजूनच बिघडत जाते.या सगळ्या गोंधळात संबंधित व्यक्ती आपले वर्तमान जगणे विसरून जाते.खर तर संबंधीत माणसाने आपला निसटून गेलेला भूतकाळ व आभासी भविष्यकाळ यापेक्षा आपला वास्तवात समोर असलेला वर्तमानकाळ कसा आहे व तो अधिक चांगल्या प्रकारे कसा जगता येईल याचा विचार करायला हवा,आपल्यासाठी धडपडणारी माणसे,चिंताग्रस्त नातेवाईक आपला जोडीदार यांच्या प्रयत्नाना सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.जे काही चालले आहे ते आपल्या सुखासाठी चालले आहे,आपल्या आताच्या विचारसरणीमुळे आपल्या जिवाभावाच्या लोकांचे आयुष्यही पणाला लागते आहे हे समजून सकारात्मकतेकडे आपले विचार कसे वळवता येतील ते पहाणे आवश्यक असते पण असे घडताना दिसत नाही असा माणूस आपली सदसदविवेकबुद्धी वापरणे विसरून गेलेला असतो.अविवेकी वागण्यामुळे तो स्वत:चे व आपल्या जवळच्या माणसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत असतो याची त्याला जाणीवच नसते! काय करू शकतो आपण आपल्या जीवनात / आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी व आपल्या आनंदी व समाधानी जीवनासाठी?
मला असे वाटते की आयुष्यात कोणत्याही प्रकारे निराशा टाळण्यासाठी माणसाने फक्त वर्तमानात जगणे आवश्यक आहे.आपल्या जीवनात उगवलेला फक्त आजचा दिवसच माझे आयुष्य आहे उद्या मी जिवंत असेलच असा भरवसा नाही आणि त्यामुळे आजचा हा दिवस आनंदात व समाधानात कसा जाईल असा जाणीवपूर्वक विचार करून आपले वागणे बोलणे ठेवले तर आयुष्यातला प्रत्येक दिवस नव्याने जगता येईल!
      आयुष्य सुखी समाधानी व आनंदी होण्यासाठी वास्तवात जगणे आवश्यक आहे.आभासी स्वप्नात राहून अपेक्षाभंगाला सामोरे जाण्यापेक्षा व निराशाग्रस्त होण्यापेक्षा वास्तवाचा स्वीकार करून जे आयुष्य समोर आहे ते समरसतेने जगून आपल्या आयुष्याचं सोन करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे.आपल्याला जे जे मिळाले आहे, जी माणसे आपल्या आयुष्यात आली आहेत, जी परिस्थिती आपण अनुभवतो आहे त्या सर्वांबद्दल जाणीवपूर्वक सतत आभारी राहायला हवे .
आयुष्यात आपला अनेक भल्याबुऱ्या माणसांशी सबंध येतो. कधी प्रसंगानुरूप काही माणसे भेटतात आणि असे हे संबंध तात्पुरत्या स्वरूपाचे असतात तर काही माणसे अगदी कायमची आपल्याशी जोडली जातात उदा.जोडीदार,नातेवाईक,कुटुंबिय,शेजारी इत्यादी. या माणसांच्या चांगल्या वाईट वागण्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर बरा वाईट परिणाम होत असतो.काही ठिकाणी आपण पूर्वगृह बाळगलेले असतात तर काही ठिकाणी आपल्याबद्दल गैरसमज असतात.होत काय की,आपल्या अपेक्षेप्रमाणे अथवा म्हणण्याप्रमाणे/मताप्रमाणे समोरचा माणूस वागला की तो आपल्याला जवळचा वाटायला लागतो. मग लांगुलचालन करत गोडगोड बोलणारी सभोवतालची माणसे जवळची आणि परखडपणे वागणारी, वेळ प्रसंगी कटू असले तरी सत्य बोलून वाईटपणा घेऊन आपल्याला वास्तवाबद्दल जाणीव देणारी,सतत आपल्या भल्यासाठी जागरूक असलेली माणसे, आपले हितचिंतक हे लोक वाईट असल्याचा समज आपण करून घेतो आणि मग आपल्या भल्यासाठी झगडणाऱ्या जवळच्या माणसांनाही आपण कलुषित नजरेने बघायला लागतो.अशा माणसांबद्दल झालेल्या वाईट मतामुळे त्यांनी कितीही प्रेमाने वागायचा प्रयत्न केला तरी आपल्या नजरेत ते वाईटच ठरवले जातात.त्यांनी सांगितलेले ऐकायचे नाही ते म्हणतील त्याच्या विरुध्द वागायचे असे प्रकार सुरू होतात.एक प्रकारे त्यांना शत्रुपक्षाची वागणूक दिली जाते. एक निश्चित आहे की या जगात सर्वगुणसंपन्न असे कुणीही नाही.प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष असतातच. आपण जर फक्त दोष पहात राहिलो तर नातेसंबंध बिघडतच जाणार त्यामुळे दोषांच्या ऐवजी आजबाजूच्या माणसातले फक्त गुणच पाहिले तर असे होणार नाही. असे घडण्यासाठी प्रथम आपले स्वत:चे आत्मपरीक्षण करून आपल्यातील सद्गुणांची गुणांची एक यादी करायला हवी. या चांगल्या गुणांबद्दल स्वत:चा अभिमान असायला हवा. याबरोबरच आपल्या अवतीभवती दररोज संपर्कात असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या मधले चांगले गुण यांचीही यादी करून परत परत वाचायला हवी.सरावाने आपल्याला दुसऱ्यातील चांगले गुण पहाण्याची सवय लागेल.त्यामुळे आपोआपच आपण संपर्कात येणाऱ्या प्रत्येक जवळच्या/दूरच्या व्यक्तीकडे सकारात्मक नजरेने बघायला लागू त्याबरोबरच समोरच्या व्यक्तीचे वागणे व त्यामागची परिस्थिती,अशा परिस्थिती मधील अपरिहार्यता, त्यामागचे विचार असा सर्व बाजूंनी विचार करायला प्रवृत्त होउ. एका त्रयस्थ्य भूमिकेतून प्रत्येक घटनेकडे पहायची, दुसरीही काही बाजू असू शकते व ती समजून घेणयाची सवय लागेल. अशी सवय जेंव्हा होईल तेंव्हा आपण शांतपणे प्रत्येक बाबीचा विचार करायला प्रवृत्त होऊ आणि असे घडेल तेंव्हा गैरसमजाला वाव रहाणारच नाही. आपल्याबद्दल आपल्या सुखी आयुष्याबद्दल आपली माणसे किती जागरूक आहेत ते आपल्याला किती जपत आहेत हे नव्याने समजेल. सुसंवाद साधला गेल्यामुळे नातेसंबंध दृढ होतील आणि अशा निकोप नातें संबंधामुळे व्यक्त होणे सहज सोपे होउन जाईल व निराशाग्रस्त होण्याचाही प्रश्न उरणार नाही.
आपल्या जीवनात आपण बरीच छोटी मोठी स्वप्ने पाहिलेली असतात.एका सुंदर आनंदी व समाधानी जीवनासाठी जे जे आवश्यक आहे, ते आपणासमोर हात जोडून उभे असायला हवे असे वाटते. यशस्वी जीवनाचे आपण काही ठोकताळे बांधलेले असतात! जसे की माझे असे आयुष्य असले की मी स्वर्गीय सुखात असेल. माझा जोडीदार असाच असायला हवा. माझ्याकडे एवढी संपती असायला हवी. माझे आलिशान घर हवे.मला अशा अशा प्रकारच्या मित्र मैत्रिणी लाभायला हव्यात. माझे जीवन असे हवे,इत्यादी इत्यादी. अशी भरपूर स्वप्ने/आशा/अपेक्षा घेऊन आपण जेंव्हा व्यावहारिक जगात प्रवेश करतो त्यावेळी वास्तवाचे भान येते व एक एक स्वप्न जसे पाहिले होते त्या स्वरूपात प्रत्यक्षात येण्यातल्या अडचणी समोर यायला लागतात.समोर पर्याय येतात पण ते स्वीकारायची मानसिक तयारीच केली नसेल तर घोर अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागते.वास्तव आयुष्य हे आभासी स्वप्नांपेक्षा वेगळे असू शकते आणि ते आयुष्य जशा प्रकारे समोर येईल तसे ते स्वीकारायची आधीच तयारी असायला हवी.असेच जगले तर मी सुखी व समाधानी हा अट्टाहास माणसाला निराशाग्रस्त जीवनाकडे घेऊन जातो. मोठी स्वप्ने,मोठ्या अपेक्षा असायला काहीच हरकत नाही आणि अशा स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्नही करावेत.आयुष्यात यशामागे यश मिळवण्याची धुंदीच काही और असते पण आपण मृगजळामागे तर धावत नाही ना? हे सुध्दा मध्ये मध्ये तपासून बघायला हवे. आभासी सुखाच्या मागे धावता धावता दमछाक झाल्यावर “ अरे आपले हाताशी असलेले सुख उपभोगायाचेच राहून गेले !” असे व्हायला नको म्हणून आपली बलस्थाने व आपल्यातले न्यून याची योग्य जाण असायला हवी.आपले अंतिम धेय्य जर आनंदी जीवन हे आहे तर हा आनंद कशा कशात आहे.तो मिळविण्याचे आपण ठरवलेले मार्ग, केलेली अपेक्षा,यावर विचार करायला हवा. आनंद मिळवण्याच्या पर्यायी वाटांची माहितीसुध्दा ठेवायला हवी.
पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली तर आनंदच आनंद, पण नाही पोहचता आल स्वप्नापर्यंत तर निराश व्हायचं नाही तर ज्या टप्प्यापर्यंत  आपण पोहचलो त्यांचा आनंदोत्सव सुध्दा साजरा करायची मनाची तयारी असायला हवी. आपली सुख समाधान व आनंदाची व्याख्या समयोचित बदलण्याची मानसिक तयारी हवी. नियतीने जे जीवन समोर वाढून ठेवले आहे त्याचा कृतज्ञतेने स्वीकार करून एक एक क्षण साजरा केला तर निराशा कुठल्या कुठे पळून जाईल.
तर आपणच आपल्या नशिबाला दोष देत आपल्या आयुष्याचे वैरी होऊन निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी आपल्या अनमोल अशा मानव जीवनातील सुखी समाधानी व आनंदी जीवनासाठी प्रथम स्वत:ला ओळखायला हवे. आनंदासाठी कुणाच्या मागे पळण्यापेक्षा आपल्या जीवनातले आनंदाचे क्षण वेचायला हवेत साजरे करता यायला हवेत .आपले मन स्थिर ठेउन समोर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक समस्येचं आपल्याला मिळालेली एक संधी म्हणून आव्हान स्वीकारायला हव. समस्या आपल्यावर स्वार होण्याऐवजी आपण परिस्थितीवर स्वार होउन समस्या हाताळल्या तर समस्येच्या योग्य सामाधानापर्यंत सहजपणे पोहचता येईल यात शंका नाही.आपल्यातल्या दोषांची चर्चा न करता आपल्यातल्या कला गुणांवर लक्ष केंद्रित करणे जमायला हवे. जी माणसे आपल्या आयुष्यात आली आहेत त्यांना जाणून घ्यायला हवे. मनाचे दरवाजे उघडे ठेऊन माणसे ओळखायला हवीत.प्रथम स्वत:वर प्रेम करायला हव आपोआपच आकर्षणाच्या नियमाने जीवन प्रेम आनंद व सुखसमृधी ने भरून जाईल! नाही का?
....................प्रल्हाद दुधाळ.