Sunday, February 16, 2014

नाही म्हणायला शिका!

                                                            नाही म्हणायला शिका!

   एक गोष्ट नक्की आहे की, जर माणसाला स्वत:बद्दल आत्मविश्वास असेल तरच तो इत्तरांवर विश्वास ठेऊ शकतो! मला असे वाटते की,जेंव्हा  कधी आपला कुणी नातेवाईक,मित्र,वा दररोज संपर्कात येणारा जवळचा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल काही सांगतो,त्यावेळी अशा बोलण्यावर  विश्वास ठेवण्यापूर्वी  व त्याप्रमाणे वागण्यापुर्वी, त्या सांगितलेल्या गोष्टीबद्दल शहानिशा करायला हवी. याशिवाय त्याबद्दल आपल्या अंतर्मनाचा कौलही घेणे आवश्यक आहे, पण असे घडत नाही! खर तर कुणी एखादी गोष्ट करायला सांगीतली तरी ती करायची की नाही या बद्दल निर्णय घेण्यापूर्वी वा तो निर्णय घेतल्या नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची,बऱ्या वाईट परिणामांची तसेच संभाव्य फायदे अथवा तोट्यांची जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी.एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवणे आयुष्यभरासाठी अडचणीचे होऊ शकते!
      साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की,समोरच्या व्यक्तीवर अजिबात विश्वासच ठेवायचा नाही की काय? प्रत्यक्ष जीवनात समोरच्या व्यक्तीवर असा अविश्वास दाखवणे सोपे आहे का? मला वाटते की, अशावेळी समोरच्या व्यक्तीवर सरळपणे अविश्वास न दाखवता सौम्य भाषेत विचार करण्यासाठी वेळ मागून घेणे केंव्हाही चांगले! अशामुळे होते काय की,त्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीबाबत शांतपणे विचार करता येतो.त्या बाबीमुळे  होणारे संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो.जनलज्जा व भिडेखातर कोणतीही चिकित्सा न करता कुठल्याही बाबतीत अतिविश्वास ठेवला तर बऱ्याचदा आपल्या पदरी नको तो  मनस्ताप व निराशा येऊ शकते,म्हणून आयुष्यात अशावेळी थोडासा वाईटपणा घेऊन,योग्य तेथे स्पष्ट भाषेत नकार द्यायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे! अशाप्रकारे विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर सहसा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.आपल्याला प्रश्न पडला असेल की हे ज्ञान मला कुठून मिळाले?आणि ते मी येथे का पाजळतो आहे? हा प्रश्न अगदी साहजिक आहे,तर आता सांगायला हरकत नाही की ही अक्कल मी विकत घेतलेली आहे! शहाणपणा अनुभवातुन आलेला आहे! बाबतीत मला आलेले अनुभव अजून काही लोकांनाही आलेले असतील आणि त्यावरून कुणाची होणारी संभाव्य फसवणूक तरी टाळली जाईल!
     तर, एकदा माझा एक ऑफिसमधील सहकारी माझ्याकडे आला.त्याने माझ्यासाठी एक फॉर्म आणला होता. तो फॉर्म कुठल्यातरी इन्स्युरंस कंपनीचा होता.त्याने त्या स्कीमबद्दल व त्यानंतर मला होणाऱ्या संभाव्य फायद्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.त्या स्कीम प्रमाणे मी फक्त तीन हजार रुपये एकदाच भरायचे होते व त्या बदल्यात मला कंपनी कडून तीन हजार रुपये किमतीचे साबण,तेल,पेस्ट इत्यादी रोजच्या घरगुती वापराच्या वस्तू डिस्काऊंट वर मिळणार होत्या! शिवाय माझा एक लाख रुपयांचा जीवनभरचा अपघात विमा ती कंपनी देणार होती.या फायद्याशिवाय जर मी त्या प्रकारचा फॉर्म आणखी कुणाला दिला व एक ग्राहक मिळवून दिला तर कंपनीकडून मला एक हजार रुपये परत मिळणार होते! ज्याने माझ्याकडे ही स्कीम आणली तो माझा सहकारी अगदी दररोजच्या संबंधातला असल्यामुळे मला त्याला नाही म्हणता आले नाही आणि भिडेखातर मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तीन हजाराचा चेक त्याला दिला.आठ-दहा दिवसातच मला एक ब्रीफकेस घरपोच मिळाली! त्यामध्ये मी आयुष्यात कधीही न पाहिलेल्या ब्रांड च्या वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या होत्या.
याशिवाय स्कीम मध्ये कबुल केल्याप्रमाणे अपघात विमा प्रमाणपत्रही होते.केवळ भिडेखातर केलेल्या या व्यवहारामध्ये मला दिलेला फॉर्म मी न वाचताच सह्या केल्या होत्या.येथे मी माझ्या त्या सहकाऱ्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला होता.नंतर लक्षात आले की मिळालेल्या वस्तू या अगदीच सुमार दर्जाच्या होत्या! विम्यासाठीच्या अटी व शर्ती अत्यंत फसव्या स्वरूपाच्या होत्या.याशिवाय या विम्याचे दर वर्षी नुतनीकरण सुध्दा करणे आवश्यक होते! आपण आपल्या अगदी जवळच्या माणसाकडून अत्यंत पद्धतशीरपणे फसवले गेलो आहे याची आणि याबद्दल भिडेखातर गप्पही राहावे लागणार असल्याची जाणीव होईपर्यंत उशीर झाला होता! थोडक्यात तोंड दाबून बुक्क्यांचा मारअसा तो प्रकार होता. आपल्याला फसवले गेले व आपण अगदी सहजपणे फसलो गेलो या गोष्टीचा अर्थातच खूप मानसिक त्रास झाला! पण एका अनुभवाने शहाणा झाला तर माणूस कसला! हा अनुभव पुरेसा नव्हता की काय कोण जाणे, म्हणून वेळोवेळी अशाच प्रकारे अनेक मित्रांकडून व अगदी जवळच्या माणसांकडून   विविध मल्टीलेवल मार्केटिंग व आभासी फायद्याच्या योजना मला सांगितल्या गेल्या व भाग घेण्याबद्दल गळ घातली गेली व यांना कसे काय नाही म्हणायचे?या भिडेखातर मी पुन्हा पुन्हा फसत राहिलो!स्वभावात असलेला मुखदुर्बळपणा कायमच मला संकटात ढकलत राहिला! असे अनेक आर्थिक व मानसिक फटके बसल्यानंतर मी एकदाचा नाहीम्हणायला शिकलो! थोडक्यात मी आता जो शहाणपणा तुम्हाला शिकवतो आहे त्याची अक्कल मला हजारो रुपयांना विकत घ्यावी लागली आहे! अशा प्रकारच्या नवनवीन फसव्या स्कीम मार्केटमध्ये येत असतात.त्याचे पद्धतशीरपणे मार्केटिंग केले जाते.आपल्या अगदी जवळचा माणूस त्या जाळ्यात ओढला जातो व पुढच्या टप्प्यातील चेनसाठी तो तुमची निवड करतो! ती स्कीम त्यालाही अर्धवटच माहीत असते पण तो पोटतिडकीने तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत असतो! कंपनीचे डायरेक्टर्स म्हणून अनेक नामांकित लोकांची यादी दाखवली जाते.आत्तापर्यंत फायदा झालेल्या लोकांची भली मोठ्ठी यादी यावेळी वाचून दाखवली जाते.पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला बोलावले जाते.आकर्षक पेहरावातल्या मधाळ बोलणाऱ्या कंपनी च्या रिप्रेझेंटेटिवज् कडून अत्यंत लाघवी भाषेत तुमचे स्वागत केले जाते.स्कीम बद्दल अत्यंत आकर्षक प्रेझेन्टेशन ऑडीओ व विडीओज च्या स्वरूपात सादर केले जाते.डायरेक्टर बोर्डावर असलेल्या मोठ्या मोठ्या लोकांची नावे पाहून नाही म्हटले तरी स्कीमवर तुमचा विश्वास बसतो.साखरपेरणी करून होणाऱ्या संभाव्य फायद्यांचे अत्यंत आकर्षक गाजर दाखवले जाते.तेथील एकूण भपकेबाज  वातावरण पाहून तुम्ही कंपनी च्या जाळ्यात अलगद फसता.एखादी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? असा विचार करून तसेच जी व्यक्ती तुम्हाला तेथपर्यंत घेऊन गेलेली असते त्याचे मन राखण्यासाठी तुम्ही त्या स्कीम मध्ये भाग घेता.कधी कधी अशा स्कीम्स मध्ये हजारो रुपये कर्ज काढून गुंतवले जातात.अशा स्कीम्स मध्ये सुरुवातीला काही लोकांना फायदाही झालेला असतो त्यांचे बँक पासबुक पाहून मोठया विश्वासाने तुम्ही तेथे गुतंवणूक करता.येथे तुमची आर्थिक गुंतवणूक असतेच पण एक नवे स्वप्नही तुम्ही विश्वासाने खरेदी केलेले असते! जेंव्हा तुम्ही अशा स्कीम मध्ये फसले गेल्याचे लक्षात येते तेंव्हा आर्थिक नुकसानीबरोबरच तुमचा विश्वासघातसुध्दा झालेला असतो! पण वेळ गेलेली असते ज्या व्यक्ती मार्फत तुम्ही या जाळ्यात फसलेला असता ती एक तर तुमच्या अतिशय जवळची असते शिवाय अनेकदा या फसवणुकीची ती व्यक्ती सुध्दा शिकार झालेली असते!
  मल्टी लेवल मार्केटिंग हे केवळ एक उदाहरण झाले,पण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण केवळ ‘वाईटपणा घ्यायला नको’ म्हणून मनाविरुध्द निर्णय घेत असतो! कधी कुणाला विश्वासाने सांगितलेल्या गुपिताचा तुमची अगदी जवळची विश्वासातली व्यक्ती तुमच्या विरुध्द वापर करते,तर कधी कुणाला त्याच्या अडचणीत विश्वासाने दिलेले पैसे बुडवले जातात.जवळच्या माणसाबरोबर केलेल्या भागीदारी व्यवसायात फसवणूक होते.नातेसंबंधात अशा फसवणुकीच्या व विश्वासघाताच्या अनेक घटना घडत असतात. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता आपल्याला अशा फसवणुकीला सामोरे जावे लागते. विश्वासघातामुळे नात्यात तसेच मैत्रीत कायमचा दुरावा निर्माण होतो.अशा विश्वासघाताने आर्थिक नुकसानीपेक्षाही मनावर झालेली जखम खूप खोलवर असते.नंतर कितीही उपचार केले तरी ती सहजपणे भरून येत नाही. म्हणूनच अशा जखमा होऊच नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.विश्वासाने विश्वास ठेवता येतील अशी माणसे जोडायला हवीत.
  हे खरे आहे की,कधी कधी आयुष्यात असे काही व्यवहार करावे लागतात की ते करताना समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायलाच लागतो तेथे तुमच्या समोर दुसरा पर्यायच नसतो.अशा व्यवहारांमध्ये तशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते कारण एकमेकांवरच्या विश्वासावरच अशा व्यवहारांच्या इमारती उभारल्या जातात.पण त्यातूनही झालीच काही फसवणूक,तर ती टाळणे बऱ्याचदा तुमच्या हातात नसते.ती एक प्रकारे अपरिहार्यता असते,तेथे विश्वास ठेवल्याशिवाय व्यवहाराच पुढे सरकणार नसतो! पण जेथे सहज शक्य आहे तेथे तरी आपण कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे तरी नक्कीच ठरवू शकतो!
    प्रश्न आर्थिक असो,भावनिक असो किंवा इत्तर कुठल्याही प्रकारचा असो कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधीत बाबीची योग्य त्या निकषांवर खातरजमा करायला हवी.कोणी कुणाबद्दल काही बरे वा वाईट मत व्यक्त केले तर तेच तुमचे मत बनवणे धोकादायक ठरू शकते.पूर्वग्रह न बाळगता आपल्या स्वत:च्या नजरेने व अनुभवाच्या कसोटीवर घासून त्रयस्थपणे समोरच्या व्यक्तीची पारख करणे थोड्या अभ्यासानंतर सहज शक्य आहे! व्यवहारात किंवा नातेसंबंधात आजूबाजूला उठणाऱ्या वावड्यांवर विसंबून विश्वास ठेवणे संबंधीत व्यवहार अथवा नातेसंबंध अडचणीत आणू शकते म्हणून अंधपणे विश्वास ठेवण्यांऐवजी तारतम्याने विचारपूर्वक आत्मविश्वासाने निर्णय घेणे शहाणपणाचे ठरते.
  आता वरील विवेचनावरून "सहजासहजी कुणावर विश्वासच ठेवायचा नाही का?" असा विचार मनात येणे साहजिक आहे."चुकून विश्वासायोग्य व्यक्तीवर अविश्वास दाखवला तर संबंधात  दुरावा नाही का येणार?"  तर येथे मी पुन्हा सांगतो की,माणसे ओळखण्याची कला तुमची तुम्हालाच आत्मसात करावी लागेल! देहबोलीचा (बॉडी-लँग्वेज) थोडाफार अभ्यास केल्यास विश्वासायोग्य कोण आणि अयोग्य कोण हे तुम्ही सहज ओळखू शकाल. एवढे मात्र नक्की की तुम्हाला या जगात जर आनंदात जगायचे असेल तर योग्य तेथे नाही म्हणता आलेच पाहिजे! आणि कोणत्याही गोष्टीला हो किंवा नाही म्हणायचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे!
तुम्हाला काय वाटते!
                                        ..........प्रल्हाद दुधाळ, पुणे.
                                                ९४२३०१२०२०.

Thursday, February 6, 2014

कौतुक

कौतुक
                चांगल्या गुणांचे कौतुक होणे ही माणसाची एक मानसिक गरज आहे. जेंव्हा एखादे चांगले काम माणसाच्या हातून घडते,एखाद्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले जाते, एखादा महत्वाचा पुरस्कार मिळतो, किंवा यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात नाव  होते तेंव्हा आजूबाजूच्या लोकांकडून आपले कौतुक व्हावे असे वाटणे साहजिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीच्या आसपास वावरणारे नातेवाईक,मित्रमंडळी,शेजारी,शिक्षक, सहकर्मचारी यांनी दिलेली पाठीवरची थाप जीवनात खूपच मोलाची असते. अशा कौतुकामुळे अंगावर मुठभर मांस चढते. अशी व्यक्ती मिळालेल्या प्रोत्साहनामुळे दुप्पट वेगाने प्रगती करू शकते. आजूबाजूच्या लोकांपेक्षाही अशा व्यक्तीचे जेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती जसे आई,वडील,भाऊ,बहिण,पत्नी,मुले यांच्याकडून कौतुक होते तेंव्हा माणसाला आयुष्य  कृतार्थ झाल्यासारखे वाटते.त्याला नवी उर्जा मिळते.   
                  पालक आपले मुल लहान असताना  मुलाने टाकलेले पहिले पाऊल,मुलाच्या तोंडातून आलेला पहिला बोबडा शब्द, टाकलेले पहिले पाउल,लिहिलेले पहिले अक्षर तसेच मुलाच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहानसहान प्रगतीच्या टप्प्यावर यांचे भरभरून कौतुक करताना दिसतात आजकाल तर अशा क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ चित्रण करून असे प्रसंग जतन केले  जातात. जीवनाच्या पुढच्या टप्प्यात मुलांच्या  शिक्षणातल्या प्रगतीच्या काळात तर मुलांना अशा कौतुकाची फारच गरज असते.चांगल्या यशाबद्दल शाबासकी तर मिळायलाच हवी  पण एखाद्या अपयशाच्या क्षणी मुलांना मानसिक आधार व पुढच्या वेळी जादा प्रयत्नासाठी प्रेरणा द्यायची ही तयारी पालकाने ठेवायला हवी.
                                                लहानपणी कौतुक होण्यासाठी लायकी असूनही जर योग्य त्या व्यक्ती कडून अशी शाबासकी मिळाली नाही तर अशी मुले एकलकोंडी होऊ शकतात.आपल्यात  काहीतरी कमी असल्याची भावना अशा मुलांच्या मनात घर करू शकते व सर्व काही ठीक असूनही आत्मविश्वास कमी होण्यासाठी अशा घटना कारणीभूत होऊ शकतात म्हणूनच पालकांनी योग्य गोष्टींचे कौतुक तर आवश्यक तिथे मानसिक आधार आपल्या पाल्याला द्यायला हवा.
                                                योग्य त्या प्रसंगी कौतुक होणे आवश्यक आहे हे खरे आहे पण उठसुठ फक्त कौतुकच होत राहिले तरीही धोकादायक आहे. म्हणजेच शाबासकी देण्यायोग्य गोष्टी असतील तरच कौतुक व्हायलाच हवे पण जेथे आवश्यक आहे तेथे त्याच्यातली कमतरता सुध्दा संबंधीताला कळायला हवी. थोडक्यात यशाबरोबरच अपयश पचविण्याची व अपयशाच्या प्रसंगी ज्या संभाव्य परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याची जाणीव व मानसिकता सुध्दा अंगी असायला हवी हे सांगायला हवे, नाहीतर नेहमी कौतुकच वाट्याला आलेली व्यक्ती जेंव्हा समाजात वावरायला लागेल तेंव्हा जेंव्हा एखाद्या पसंगी झालेली टीका/अपमान  अथवा मिळणार्या प्रतिक्रिया अशा व्यक्ती सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे लहानपणापासूनच योग्य त्या वयात यश,अपयश व त्याबरोबरीने येणारे कौतुक किंवा टीका अथवा मिळणारे अन्य प्रतिसाद याची कल्पना व अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी या संबंधी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलायला हवे.वास्तवाची जाणीव कायम मनावर बिंबवायला हवी . आपल्या पाल्याचे खोटे खोटे कौतुक करून तुम्ही त्याला तात्पुरता आनंद देऊ शकाल पण याच तुमच्या वागण्यामुळे त्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करत आहात हे सुध्दा तितकेच खरे आहे. एकदा सतत यश मिळत गेले की त्या यशाची सवय लागते आणि जेंव्हा एखादे अपयश समोर उभे राहील तेंव्हा अशा व्यक्तीला जगणे अवघड होऊ शकेल!
                  बऱ्याच ठिकाणी ज्या व्यक्तीकडून फायदा होणार असेल त्या व्यक्तीचे खुशमस्करे त्याच्या भोवती  आपल्या फायद्यासाठी गोळा होतात. खोटेखोटे गुणगान करून अशा माणसाच्या मर्जीत रहाण्याचा प्रयत्न असे खुशमस्करे करत रहातात. त्यासाठी कौतुक/स्तुती करायचा एकही प्रसंग सोडत नाहीत. असे होणारे कौतुक हे बर्याचदा ‘ हरबर्याच्या झाडावर चढवणे असते पण संबंधिताला जर अशा कौतुकाबद्दल जाणीव नसेल तर अशी व्यक्ती वास्तवाशी फारकत घेऊन एका आभासी जगात रहायला लागते. अशावेळी यशाचा कैफ चढायला वेळ लागत नाही.अशा व्यक्तीचा भ्रमाचा भोपळा जेंव्हा कधी फुटतो  तेंव्हा मात्र अशा लोकांची अवस्थ्या वाईट होऊन जाते. वेळीच अशा स्तुतीपासून सावध रहायला हवे.
                  योग्य वेळी व योग्य बाबतीत झालेल्या कौतुकामुळे पुढील प्रगतीसाठी प्रेरणा मिळते.अधिक जोमाने प्रयत्न केले जातात तर कौतुकास पात्र असूनही जर योग्य वयात अपेक्षित असलेली शाबासकीची थाप पाठीवर मिळाली नाही तर माणूस स्वत:ला बदनसीब समजायला लागतो. अशा व्यक्तीची कौतुकाची भूक अपूर्णच रहाते. आजूबाजूला जर किरकोळ बाबतीतही कौतुक होणारे असतील तर त्यांच्याशी स्वत:ची तुलना केली जाते एकप्रकारचा न्यूनगंड येतो आणि माणूस नैराश्याची शिकार होऊ शकतो.
                  एक व्यक्ती म्हणून विचार करतो तेंव्हा असे लक्षात येते की जीवनात सामान्यपणे प्रत्येकाच्या आयुष्यात  अशा कौतुकास्पद कामगिरीचे, उत्तुंग यशाचे, जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकांक्षांच्या पूर्तीचे, छोट्या मोठ्या पुरस्कारांचे प्रसंग येत असतात व त्या त्या प्रसंगी आपल्याला शाबासकी मिळावी लोकांकडून कौतुक व्हावे असे वाटते. तसेच बऱ्याचदा अपयशाला सामोरे जाणारेही आजूबाजूला असतात .एक संवेदनाशील माणूस म्हणून तुमच्या आजूबाजूच्या अशा यशस्वी व्यक्तींचे जरूर कौतुक करा. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करा तर अपयशाच्या प्रसंगी गरजूना आधार द्या. अपयश ही बऱ्याचदा यशाची पायरी असते हे समजून घ्या व लोकाना समजावा.
                  कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक तर व्हायलाच हवे! तुम्हाला काय वाटते?
                                          .....प्रल्हाद दुधाळ,पुणे.