Friday, January 17, 2014

वाटणी.

   वाटणी.
   बाबुराव हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होते डॉक्टर च्या सांगण्यावरून बाबुरावांच्या पत्नीला  चारही मुलांना बोलाऊन घेण्यात आले. सगळेजण जमा झाल्यावर डॉक्टरच्या समोरच  बाबुराव निरवानिरवीचे बोलू लागले.म्हणाले “ मी आता मरणार आहे तेंव्हा तुम्ही सगळेजण एकमेकाना सांभाळा व आपल्या आईला अंतर देऊ नका.काळजी घ्या. “
बायकोकडे वळून तिला म्हणाले  –
“बर का ग, डेक्कनच्या चार बिल्डिंग तुझ्याकडेच राहू दे!, सहकार नगरचे सगळे बंगले थोरल्या व
दोन नंबरच्याला देऊन टाक! शिवाजीनगर मधली दुकाने तीन नंबरला व बिबवेवाडी ची सगळी दुकाने
 व चाळी चार नंबर ला दे! चल आता मी निघतो ,माझी जायची वेळ झाली.”
बाबुरावांचे ऐश्वर्य ऐकून व त्यांनी आपल्या  मालमत्तेची मुलांमध्ये केलेली वाटणी पाहून डॉक्टर फारच प्रभावित झाले.त्यांना अगदी गहिवरून आले. थोड्याच वेळात बाबुरावांचे निधन झाले. डॉक्टरने
बाबुरावांच्या  मुलांना सांगितले-
 “आपल्या वडिलांचे क्रियाकर्म व्यवस्थितपणे होऊ दे, पैसे काय पळून जात नाहीत, हॉस्पिटल चे बील सावकाश पाठवून द्या!”
बाबुराव जाऊन चार महिने झाले तरी बिलाचे पैसे मिळाले नाही म्हणून डॉक्टर ने शेवटी बाबुरावांच्या
पत्नीला गाठले व खडसावले -
“ काय हो ताई, बाबुरावांनी केवढी तरी मालमत्ता तुम्हा सगळ्याना वाटली तरीसुध्दा माझे बिलाचे पैसे अजून का दिले नाही?”
बायको गरजली –
“ कसली डोंबलाची मालमत्ता घेऊन बसलात डॉक्टर? अहो त्यांचा पेपर टाकायचा धंदा आहे! त्याची
वाटणी करून गेले ते!!!!!!!!!”

                     .........प्रल्हाद दुधाळ.

Thursday, January 16, 2014

आयुष्यातली चिडचिड!!!

      आयुष्यातली चिडचिड!!!
      गोष्टी अगदी किरकोळ असतात पण आपल्या मनासारखे घडले नाही की आपण अगदी डिस्टर्ब
होऊन जातो. सकाळी सकाळी असे काही घडले की पूर्ण दिवस आपण बिघडलेल्या मूडमध्ये
 घालवतो.जणू काय आपले सर्वस्व हरवले आहे! खर तर आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे
एवढ्या तेवढ्याने डिस्टर्ब होण्याइतपत माणसाच्या सहनशक्ती चा ऱ्हास झाला आहे का? या प्रश्नाचे
 उत्तर कटू असले तरी हो असेच आहे! खाली काही असे प्रसंग दिले आहेत.
    १.सकाळी उठून घरातली सगळी कामे उरकायची असतात व कामावर जायचे असते तशातच
 नेहमीच्या वेळी कामवाली येत नाही.आता घरातली जास्तीची कामेही करावी लागणार या नुसत्या
 विचाराने आपला रागाचा पारा चढतो पण आपल्या हातात चिडचीड करण्याशिवाय काहीच नसत मग
 स्वत:शी बडबड करत, मोलकरणी च्या नावाने खडे फोडत,नशिबाला दोष देत कशीबशी कामे उरकून
 ओफिस गाठले जाते. सकाळी सकाळी मूड बिघडल्यामुळे अखंड दिवस चिडचिड होते.
    २.आपल्याला कुठेतरी घाईत जायचे असते पण ऐनवेळी बाईक चालू होत नाही किक मारून मारून
पाय दुखायला लागतो पण बाईक जाम चालू नाही होत! रागारागाने बाईकला लाथ मारून रिक्षाला हात
 करतो पण एकसुद्धा रिक्षा थांबत नाही आपण चिडतो.खूप प्रयत्नानंतर रिक्षा मिळते व ऑफिस गाठतो
 पण सकाळी सकाळी झालेल्या घटनांनी मूड खराब झालेला असतो तो सारा दिवस आपण चिडचिड
 करत  घालवतो.
      ३.रात्री झोपताना ठरवलेले असते कि सकाळी लवकर उठायचे व भराभर उरकून ऑफिसला
 जाण्यापूर्वी बँकेत जायचे आपण सकाळी उठतो घाईघाईने आन्हिके उरकतो व निघताना बँकेच्या
 कामाची कागदपत्रे शोधायला लागतो नेहमीच्या जागेवर कागदपत्रे मिळत नाहीत.आपल्याला खात्री
असते की कागदपत्रे त्याच जागेवर ठेवली होती कुणी हलवायाचीही शक्यता नसते तरीही मिळत नाही.
 खूप प्रयत्नांनंतरही कागदपत्रे सापडत नाहीत व बँकेचे काम पुढे ढकलावे लागते.मनासारखे घडले नाही
म्हणून मूड खराब होतो दिवसभर उगीच चिडचिड केली जाते.
      ४.आपल्याला कुठेतरी गडबडीने पोचायचे असते. सगळ्यात सोयीस्कर बसमध्ये आपण बसतो
 बस निघते अर्धे अंतर पार होते व ट्राफिक मध्ये अडकते कुठलीतरी मिरवणूक रस्त्यावर चालू असते
 व त्यामुळे  ट्राफिक दुसऱ्या मार्गाने वळवले जाते अपेक्षित ठिकाणी पोहोचायला आपल्याला तिप्पट
वेळ लागते व ज्या कामासाठी हा आटापिटा केला होता ते काम होत नाही.आपण भरपूर चिडतो.
 चिडचिड  करत रहातो.  
       वरील प्रसंग हे केवळ उदाहरणादाखल  दिले आहेत, आपल्या आयुष्यात असे किंवा अजून
वेगळ्या प्रकारचे अनेक प्रसंग येतात ज्या प्रसंगांनी आपण ताबडतोब डिस्टर्ब होऊन जातो. अनेक वेळा
आपण अशा परिस्थितीत अडकतो की, फक्त चिडचिड करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरलेले
 नसते. असे काही प्रसंग असतात की.त्यासाठी सरकारी गलथानपणा कारणीभूत असतो. आपण
 अशावेळी आपल्याकडील संवेदनाहीन शासनयंत्रणा, कामचुकारपणा, भ्रष्ट व्यवस्था व एकूण
व्यवस्थेबाबत तोंडसुख घेतो. भरपूर चिडतो. आयुष्यातले असे अनेक दिवस आपण चिडचिडेपणा
करण्यात वाया घालवतो. थोडा शांत डोक्याने विचार करून पहा बर की आपली त्या त्या प्रसंगी
 झालेली चिडचिड जरी स्वाभाविक असली तरी टाळता येऊ शकत होती का? चिडचिडेपणामुळे खरच
किती फायदा झाला का? चिडचिडेपणा केल्यानंतर आपण आजूबाजूंच्या लोकांशी,ऑफिसमधील
 व्यक्तींशी,आपल्या घरातील माणसांशी कसे वागलो आणि तसे वागणे योग्य होते की अयोग्य होते?
ज्यांच्यावर आपण चिडलो त्या व्यक्ती परिस्थिती चिडण्यायोग्य होण्यासाठी कितपत जबाबदार होत्या?
      मला व्यक्तीश: असे वाटते की ज्या ज्या प्रसंगी आपली चिडचिड होते, त्या पैकी शेकडा नव्वद
  वेळा ती चिडचिड आपण टाळू शकतो. माझे हे वाक्य थोडे अविवेकी वाटेल, पण बऱ्याचदा तर समोर
 आलेल्या प्रसंगाना काही अंशी स्वत: आपणच कारणीभूत असतो. साधारणपणे सत्तर टक्के प्रसंगी
 आपण केलेली चिडचिड किंवा दिलेल्या प्रतिक्रिया अनाठायी असतात! आपण जो त्रागा करतो त्यातून
व्यवस्थ्या तर किंचितही बदलत नाहीच पण केलेल्या त्राग्यामुळे आपलेच मनस्वास्थ्य बिघडते! एकदा
 असे वारंवार घडायला लागले की तुमच्या वागण्या बोलण्यातही हा त्रागा आपला प्रभाव दाखवायला
लागतो! नकारात्मक विचारसरणी कडे आपला प्रवास सुरु होऊ शकतो. मनोकायिक आजार आपला
 पिच्छा सुरु करू शकतात! हेकट स्वभावाचा म्हणूनही आपली प्रतिमा समाजात होऊ शकते!!!
    आता वर दिलेल्या प्रसंगासंबंधी आपण काही करू शकतो का हे पाहू-
१.       आपली कामवाली सुद्धा एक माणूस आहे म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्यात ज्या समस्या येऊ शकतात त्या समस्या कामवालीला ही येऊ शकतात हे प्रथम लक्षात घ्या. आजारपण वा इत्तर आकस्मिक कारणामुळे असा एखादा दिवस तिला तुमच्याकडे कामासाठी येणे शक्य झाले नसेल. तसे तुम्हाला कळवणे आवश्यक होते पण तेवढे गांभीर्य किंवा समज कदाचित त्या अशिक्षित व्यक्तीकडे नसेल असे समजा त्या पायी तुम्ही का डिस्टर्ब होता? ती न आल्यामुळे आता खोळंबा झाला आहेच पण त्याबद्दल त्रागा करण्यापेक्षा समोर जी परिस्थिती आहे तिचा प्रथम स्वीकार करा.आता तुम्हाला काय करणे शक्य आहे ते पहा.घरातली काही कामे वाटून द्यायचा प्रयत्न करा व घरातल्या सदस्यांना तशी सवय लावा. पुरेसा वेळ हातात नसेल तर ती कामे लगेच करण्याचा अट्टाहास सोडून द्या! विचार करा की ही कामे नंतर केल्याने काय असे आभाळ कोसळणार आहे? आणि हातात पुरेसा वेळ असेल तर... घ्या की मजा घरातली कामे करायची! मस्तपैकी आवडती गाणी लावा! संगीताच्या ठेक्यावर फिरवा हातातला झाडू घरही ! एखाद्या दिवशी फिरू द्या की भांड्यावर आपुलकीचा हात! कण्हत कुथत आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यापेक्षा त्यातला आनंद घेऊन सामोरे जा.चिडचिडेपणा करून अनमोल आयुष्यातला अख्खा दिवस वाया का घालवायचा!
२.       योग्य नियोजन केले तर कोणतेच काम घाईचे असू शकत नाही! होते काय की आपण प्रत्येक काम करताना ते करण्याचा शेवटचा दिवस कोणता आहे हे बघून प्रायोरिटीज ठरवतो.आणि मग आयत्या वेळी येणार्या अडचणींचा विचार न करता कामांचे नियोजन करतो. बाईक ला एक इंजिन आहे आणि त्याला त्रांत्रिक समस्या नक्कीच सांगून येत नाही. सर्व गोष्टी गृहीत धरून वेळेचे नियोजन केले तर अनेक प्रसंगी होणारी घाई टाळू शकते. आणि त्यातूनही असा काही प्रसंग वाट्याला आला तर चिडचिडेपणा करून काय हाती लागणार आहे? त्यापेक्षा एक आव्हान म्हणून पर्याय शोधा! मनस्वास्थ्य बिघडून घेतल्याने मार्ग तर सुचणार नाहीच पण दिवस मात्र बरबाद होईल. लवकर निघा, वेळेत पोहचा.आलीच काही समस्या तरीही तर शांत डोक्याने विचार करा कारण प्रत्येक समस्येवर किमान एक योग्य उत्तर असतेच असते. पाणी आपल्या मार्गानेच जाणार असते पण आनंद मिळवण्यासाठी त्यावर कारंजे फुलवायला काय हरकत आहे?
३.       येथेही नियोजनाच्या अभावामुळेच चिडचिड होण्याचा प्रसंग उद्भवलेला आहे. महत्वाच्या वस्तू  योग्य वेळी पटकन सापडण्यासाठी योग्य ते नियोजन हवेच.पण स्वत:च्या स्मरणशक्तीवर अवास्तव विसंबून राहिल्यामुळे असे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी महत्वाच्या कामांच्या व कागदपत्रांच्या नोंदी खिशातल्या डायरीत ठेवल्या तर निश्चितच फायद्याचे राहील. लिहिण्याचा कंटाळा असला तर  मोबाईलमध्ये अशा नोंदी ठेवणे सहज शक्य आहे ज्यायोगे वेळेचे नियोजन करता येईल व ऐन वेळी होणारी धावपळ व मनस्ताप चिडचिड टाळता येऊ शकेल.
४.       आपण गजबजलेल्या शहरात रहातो.रस्ते वाहनांनी भरून वाहात असतात सार्वजनिक वहातुक व्यवस्थ्या वाढत्या लोकसंखेच्या प्रमाणापुढे अपुरी आहे. गैरव्यवस्थापन, अनागोंदी भ्रष्टाचार या गोष्टी तर आपल्या देशासाठी शाप ठरत आहेत पण आपणही याच व्यवस्थेचा भाग आहोत हे प्रथम मान्य करणे आवश्यक आहे. भर रस्त्यातल्या मिरवणुका, अतिक्रमणे, बेशिस्त वहातुक या गोष्टींचा सामना करतच आपल्याला जगायचं आहे! हे सगळ बदलायला हव यात दुमत असायचे कारण नाही, पण आपण करत असलेल्या वांझोट्या त्राग्यामुळे यामध्ये काहीच फरक पडणार नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. व्यवस्थेविरुद्ध  तक्रार करणे,निषेध व्यक्त करणे निश्चितच आवश्यक आहे पण स्वत:वर फक्त चिडून काहीच साध्य होणार नाही. गैरव्यवस्थेचा
तुमच्या जीवनावर होणारा परिणाम जर टाळता येत असेल तर त्या पर्यायी जीवन शैलीचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे!
      वरील काही उदाहरणे सोडा पण एरवीसुद्धा आपल्या दररोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात ज्या क्षणी आपला मनाचा तोल ढळतो, राग येतो,चीड येते थोडक्यात षडरिपुंची बाधा होते आणि  मग भावनेच्या भरात सारासार विवेकबुध्दी न वापरता आपण काहीच्या काही वागतो. मागचा पुढचा विचार न करता बोलतो, हमरीतुमरीवर येतो ,कधी शब्दांनी तर कधी शब्दश: मार देतो किंवा मार खातो. वेळ निघून जाते आणि मग आपण त्या त्या प्रसंगी असे कसे वागलो याबद्दल पश्चाताप करायची वेळ येते!
   थोड तारतम्याने निर्णय घेतले, परिस्थितीचे भान ठेऊन टोकाच्या  प्रतिक्रिया टाळल्या तर आपले जगणे बरेचसे सहज होईल.सुखाचे होईल की नाही माहीत नाही पण आनंदाचे तरी होईल. कारण –
आपणच आपल जगण, अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
हा तसा, ती तशी, उगाचच  बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचदा, भुईलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट, करीत असतो जीवनाची फरफट,
चडफडत धुसफुसत जगत असतो, जगण अवघड करत असतो!
तेंव्हा आपल्या जीवनात  चिडचिडेपणा कसा टाळायचा याचा जरूर विचार करायलाच हवा!
तुम्हाला काय वाटते ????

                                  ............प्रल्हाद दुधाळ.
प्रकाशित.... ई  सकाळ २३/८/२०१६