Sunday, November 3, 2013

एका ’पक्या’ची दिवाळी……

एका ’पक्या’ची दिवाळी……
धुरळा उडवत यस्टी आली आणि थांब्यावर करकचून ब्रेक मारत थांबली.इतका वेळ झाडाखाली पेंगुळलेल्या पक्याने सदऱ्यावरची माती झटकून आशेने यस्टी च्या दरवाजाकडे पाहिले.या शेवटच्या यस्टीतही भाऊ आलेला नसल्याच  पाहून पक्याच तोंड अजूनच सुकल. सकाळपासून जेवढ्या गाड्या थांबल्या त्यामध्ये त्याने भावाला शोधला पण तो काही दिसला नाही.दिवाळी सुरु झाली होती. आठवडाभर मेहनत करून पक्यान कळकाच्या कांब्या तासून आकाशदिवा तयार केला होता.त्याला रंगीत कागद चिकटवायला कागद आणायचा होता. गव्हाच्या पिठाची खळ पण करायची होती .
 त्याने आईला पैसे मागितलं तर पाठीत जोरात धपाटा मिळाला होता.दिवाळीला भाऊ आला की तो आकाश कंदील तयार करणार होता.दिवाळीला भावाकडून नवे कपडे,फटाके अन मिठाई हे सगळ यावर्षी तरी नक्की मिळेल अस त्याला वाटत होत. गेल्या दोन दिवाळ्यांना भाऊ आला नव्हता. आईन दोन्ही वर्षी फक्त कापण्या करून दिवाळी केली होती.पक्यान आजूबाजूच्या पोरानी वाजवलेल्या व फुसक्या निघालेल्या लवंगी फटाक्यांची दारू काढून पेटवली व आपली फटाक्यांची हौस भागवली होती. शाळेत घालायचे जुने कपडेच धुवून तांब्याने इस्त्री करून घातले होते.यंदा भाऊ दिवाळीला येणार असल्याचे आई कुणाला तरी सांगताना पक्यान ऐकल होत त्यामुळे तो सकाळपासून रस्त्यावर येणारी प्रत्येक गाडी बघत होता.शेवटच्या गाडीतही भाऊ दिसला नाही हे बघून पक्याला तर रडायलाच आल. वाडीतल्या जवळ जवळ सगळ्या घराचे चाकरमानी दिवाळीला घरी आले होते. यस्टीतून उतरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद होता.मुंबईला कामाला असलेली बरीच मंडळी काहीबाही घेऊन आली होती.बऱ्याच घरात चाकरमान्याने आपुलकीने आणलेल्या नव्या कपड्यांच्या व मिक्स मिठाईच्या पिशव्या खोलल्या होत्या. एरवी सुनसान असलेल्या वाडीत हळूहळू चैतन्य पसरत होत. पक्यान सकाळी सकाळी आईच नव्या कपड्यावरून डोकं खाल्ल होत. आईन डोळ्याला पदर लाऊन बहुतेक आज भाऊ कपडे घेऊन येईल असे सांगितले होते त्यामुळे सकाळपासूनच तो रस्त्यावरच्या मातीची पर्वा न करता वाट पहात होता; पण शेवटची गाडी गेली आणि पक्याच अवसान संपलं. पाय ओढत तो कसाबसा घराकडे निघाला.अंधार होऊ लागला होता. रस्त्यात धुराबाच घर लागलं. कालच त्याचा मिलिटरीत असलेला भाऊ आला होता.धुराबा नवे कपडे घालून भुईनाळा पेटवत होता. जवळ भरलेली फुलबाजाची पिशवीही होती. धुराबा पक्याचा वर्गमित्र; पण आज त्याला पक्याकड लक्ष द्यायला वेळ नव्हता.पक्याच्या घरातन बुंदी तळताना येतो तसा वास येत होता. पक्यान धुराबाकड आशाळभूतपणे पाहिले पण तो आपल्याच मस्तीत भुईनाळा लावण्यात मग्न होता. पक्या अजूनच केविलवाणा होऊन पुढे चालायला लागला. पुढच घर बाळूआबाच होत.या घरासमोरचे अंगण शेणाने सारवले होते. सासरी आलेल्या आबांच्या मुलीने दारात झकास रंगीत रांगोळी काढली होती. कळकाच्या बांबूवर मोठा आकाशदिवा ऐटीत लावला होता. घरात भरपूर गडबड चालली होती. आपल्या दिवाळीचे कसे होणार हा विचार मनात येताच पक्या पुढे निघाला. रस्त्याने चालताना प्रत्येक घरात व घराबाहेर चाललेला दिवाळीचा जल्लोष पाहून पक्या अधिकच निराश होत होता.सगळी वाडी आनंदात हसत खिदळत असताना आपल्याच घरी अशी परिस्थिती का? हे अडनिड वयाच्या पक्याला समजत नव्हते. आपल्याला आपली आई जमेल तेवढे कष्ट करून शाळेत पाठवते याची पक्याला जाणीव होती; पण आपल्याच नशिबाला हे असे भोग का?  हा प्रश्न मात्र कायम त्याला छळत राहायचा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर त्याला आपल्या या कमनशिबाबद्दल नव्याने चीड निर्माण झाली होती. वडील लहान असतानाच गेलेले, ज्यांच्यावर भविष्याची भिस्त होती त्या मोठ्या भावाने त्याच्या लग्नानंतर गाव व घराकडे फिरवलेली पाठ. बहिणीच्या लग्नासाठी होती नव्हती ती शेती गहाण पडलेली आणि या सर्व परिस्थितीवर मात करून आपल्यासाठी खस्ता खाणारी आपली खंबीर आई! पक्याला लहान असूनही या सर्व गोष्टींची जाणीव होती. आपल्यासाठी आपली आई पहाटे उठून हाळीपाटी करून शेजारच्या गावात भाज्या विकते, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते, गोधड्या शिवून देते, कुरडया व शेवया वळून देते.या सर्व कामातून येणाऱ्या मोबदल्यातून कसाबसा दोघांचा घास मिळतो हे पक्याला माहीत होते; पण आपल्या घरी साधी दिवाळीसुद्धा साजरी करता येऊ नये म्हणजे काय?
तिरमिरीत आतल्या आत रडतच पक्या घराकडे निघाला. आपल्या काडाच्या झोपडीजवळ आला तेंव्हा त्याला कापण्याचा खमंग वास आला. घरासमोर सडा टाकलेला होता. दरवाजात पक्याने आधीच तयार केलेल्या एरंडाच्या बियांचा दिवा लावला होता.
आई चुलीवर ठेवलेल्या तव्यातून धपाटे भाजून काढत होती.परातीत लालभडक कापण्या तळून नुकत्याच ठेवल्या होत्या.आईच्या चेहऱ्याकडे पाहून पक्याचा राग कुठल्या कुठे गेला त्याने आईला मागून विळखा घातला.मायेने आईने पक्याला कापण्या आणि धपाटे खाऊ घातले.सकाळपासून उपाशीतपासी राहून शिणलेल्या पक्याच्या तोंडावर कापण्या व धपाटे खाऊन तरतरी आली. ग्लासभर पाणी पिऊन पक्याला एकदम बरे वाटले.
  पक्या विचार करू लागला या परिस्थितीमधून फक्त आपणच मार्ग काढू शकतो.आईची इच्छा पूर्ण करून शिक्षण घ्ययाला हवे. होईल तेव्हढी तडजोड करून कुणाला उगीच दोष न देता जे भोग आपल्या नशिबात आहेत त्यांना हसतमुखाने सामोरे जायला हवे.त्याने निश्चय केला, बास, आता नशिबाला दोष नाही द्यायचा! आपले नशीब आपणच बदलू शकतो! शिकायचे! पडेल ते कष्ट करायचे, प्रगती करायची जमेल तेव्हढी इत्तरांना मदत करायची.त्या रात्री  पक्याला एकदम शांत झोप लागली.स्वप्नात त्याने धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली स्वत:साठी आणि आईसाठी भरपूर कपडे खरेदी केली. फटाक्यांची आतषबाजी केली.भरपूर पंचपक्वान्ने खाल्ली. त्याची आई पूर्ण गावाला सांगत होती-
"माझ्या कष्टाचे चीज झाले.पक्याने माझे नाव राखले.पुत्र असावा तर असा!"
पक्याला सकाळी जाग आली.एकदम हलके वाटत होते.भराभर घरातली कामे उरकून तो शाळेत गेला. भरपूर अभ्यास करू लागला.त्याला आईची इच्छा पूर्ण करायची होती ..........
...........प्रल्हाद दुधाळ.
            ९४२३०१२०२०.